राजर्षी शाहू महाराज

राजघराण्यातील जन्म लाभूनही सामान्य लोकांचा कैवार असलेले राजे म्हणजे कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव असून ते कागलचे श्रीमंत जयसिंगराव आबासाहेब घाटगे यांचे पुत्र होते.

राजर्षी शाहू महाराज

Marathi Buzz Shop

Marathi Buzz Shop

छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव असून ते कागलचे श्रीमंत जयसिंगराव आबासाहेब घाटगे यांचे पुत्र होते. त्यांच्या मातोश्रींचे नाव राधाबाई असून त्या मुधोळच्या राजघराण्यातील होत्या. त्यांचा जन्म १८७४ साली झाला व त्यांचे वय दहा वर्षे असताना म्हणजे १८७४ साली कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी आनंदीबाई यांनी दत्तक घेतले व दत्तकविधानानंतर त्यांचे नाव शाहू असे ठेवण्यात आले.

शाहू महाराजांचे प्राथमिक शिक्षण कृ. भी. गोखले व फिटझिराल्ड यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. पुढील शिक्षणाकरिता ते राजकोट येथे गेले व त्यानंतर धारवाड येथे राहिले. यावेळी बडोद्याचे गुणाजीराव खानविलकर यांची नात लक्ष्मीबाई यांच्याशी शाहू महाराजांचा विवाह संपन्न झाला. ४ एप्रिल १८९४ साली शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला.

राज्याभिषेक प्राप्ती झाल्यावर शाहूमहाराजांनी संस्थानात अनेक समाजसुधारणा करण्यास सुरुवात केली. सुरुवातीस त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी घाटवळ येथे आश्रम उभारला. याशिवाय गंजन नावाच्या गवतापासून राळ तयार करणे, शेणगाव येथील कांताच्या कारखान्यास उत्तेजन देणे, पन्हाळ्यास कॉफीची लागवड, वेठबिगारी पद्धत बंद करणे, तुरुंगात सुधारणा, इनामदारांना कर्जमुक्त करण्याची योजना याशिवाय शाहूपुरीची स्थापना आणि शाहूछत्रपती मिल्स अशी अनेक कार्य त्यांनी सुरुवातीच्या काळात केली.

शाहू महाराजांच्या कार्यामुळे पुण्याच्या सार्वजनिक संस्थेने त्यांचा आदर सत्कार केला आणि १८९५ साली त्यांच्या हस्ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या शिलान्यासाचे अनावरण करण्यात आले आणि जी.सी.एस.आय. ही पदवी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. 

आपल्या जनतेची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी पूर्वी जी ठराविक वेळी भेटण्याची पद्धत होती ती यांनी मोडून जनतेला हवे तेव्हा भेट घेता यावी अशी मोकळीक दिली. १८९९ साली कोल्हापूर संस्थानात प्लेग व दुष्काळाची साथ आली होती मात्र योग्य उपाय करून त्यांनी दुष्काळ व प्लेगची साथ नियंत्रणात आणली.

त्याकाळी समाजाच्या सर्वच स्तरात शिक्षणाची व्यवस्था पोहोचली नव्हती मात्र शिक्षण हा समाजसुधारणेचा एक महत्वाचा मार्ग आहे व बहुजन समाजातील मुलानांही शिक्षणाचा लाभ मिळणे अत्यावश्यक आहे अशी शाहू महाराजांची धारणा होती त्यामुळे त्यांनी बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना आपल्या वाड्यात ठेवून त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली यानंतर व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस सुरु करून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी राहण्याची सोय केली. याशिवाय जैनांचे वसतिगृह, लिंगायत बोर्डिंग, नामदेव बोर्डिंग, राधाबाई सारस्वत बोर्डिंग, प्रभू बोर्डिंग, करंजकर विद्यार्थी वसतिगृह तसेच दलित समाजातील मुलांसाठी मिस क्लार्क बोर्डिंग अशी विविध जाती धर्मातील मुलांसाठी त्यांनी वसतिगृहे सुरु केली.

या वसतिगृहात शिकून तयार झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शेकडा पन्नास जागांचे आरक्षण देणारे छत्रपती शाहू महाराजच होते यासाठी सक्तीच्या शिक्षणाच्या शाळा सुरुवातीस करवीर, चिपरी येथे उभारण्यात आल्या. या शिक्षण कार्यासाठी त्याकाळी तब्बल ३ लाख रुपये खर्च येत असे मात्र मुलांच्या शिक्षणात कोणतीही कमी पडता कामा नये यासाठी त्यांनी प्रचंड प्रयत्न केले. शिक्षण हा उन्नतीचा खरा उपाय हे जाणून त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले याशिवाय पूर्वीची वतनी शिक्षकांची पद्धत कमी करून पगारी शिक्षकांची नियुक्ती करण्याची पद्धत शाहू महाराजांनी सुरु केली. 

अस्पृश्यता नष्ट व्हावी म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न नोंद घेण्यासारखे आहेत. त्याकाळी अस्पृश्याना जी वतने होती ती त्यांच्या पोटापाण्यासाठी पुरेशी नव्हती त्यामुळे त्यांना बलुते मागून आपला उदरनिर्वाह करावा लागत असे त्यामुळे त्यांनी बलुते पद्धत बंद केली व कुणाकडूनही सक्तीने काम करून घेऊ नये असा हुकूम काढला. याशिवाय दलित समाजाच्या शिक्षणाची व्यवस्था करून त्यांना नोकऱ्या दिल्या आणि दलित बांधवांसोबत भोजन करून एक नवा आदर्श प्रस्थापित केला.

समतावादी समाजसुधारक ही छत्रपती शाहू महाराजांची प्रमुख ओळख होती. त्याकाळात शिक्षण व समाजसुधारणा यांवर भर देऊन धर्मातील चुकीच्या रूढी परंपरांना दूर करणे या शाहू महाराजांच्या कार्याचा आदर्श घेणे ही एक चांगला समाज घडण्यासाठी लागणारी अत्यावश्यक बाब आहे. अशा या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे निधन ६ मे १९२२ साली मुंबई येथे झाले. छत्रपती शाहू महाराजांना आपल्यातून जाऊन आज १०० वर्षाहून अधिक काळ लोटला असला तरी त्यांचे विचार आजही महाराष्ट्राच्या तळागाळातील मनामनात रुजले आहेत.