जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट - आधुनिक मुंबईचे शिल्पकार

आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. जगन्नाथ शंकरशेट यांचे आडनाव मुरकुटे असे होते व मुंबईच्या दैवज्ञ ब्राह्मण (सोनार) समाजात त्यांचा जन्म झाला होता.

जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट - आधुनिक मुंबईचे शिल्पकार

जगन्नाथ शंकरशेट यांचे पूर्वज मूळचे मुरबाड येथील होते व त्यांचा पेढीचा व्यापार होता मात्र जगन्नाथ शंकरशेट यांचे आजोबा यांनी मुरबाडहून घोडबंदर येथे पेढी स्थलांतरीत केली आणि जगन्नाथ शंकरशेट यांचे वडील मुंबईस स्थायिक झाले.

१७९९ साली जेव्हा ब्रिटिशांकडून टिपू सुलतानाचा पराभव होऊन त्याचा मृत्यू झाला तेव्हा मुंबईतील सराफा बाजारात अतिशय उसळी निर्माण होऊन शंकरशेट यांना प्रचंड नफा झाला त्यामुळे शंकरशेट यांचे घराणे मुंबईतील एक श्रीमंत घराणे बनले. जगन्नाथ शंकरशेट यांच्या मातोश्रींचे नाव भवानीबाई असे होते मात्र त्यांच्या जन्मानंतर काही वर्षांतच भवानीबाईंचा मृत्यू झाला. आणि शंकरशेट यांच्या वयाच्या १८ व्या वर्षी त्यांचे वडील शंकरशेट यांचे निधन झाले आणि सर्व जबाबदारी नाना शंकरशेट यांच्यावर येऊन पडली. 

नाना शंकरशेट एक व्यावसायिक होतेच मात्र समाजसेवेची आवडही त्यांच्यात सुरुवातीपासून होती. मुंबईतील स्थानिक नागरिकांना शिक्षण प्राप्ती व्हावी या विचाराने प्रेरित होऊन नाना शंकरशेट यांनी १८२२ साली बॉंबे नेटिव्ह स्कुल बुक अँड सोसायटी ही पहिली संस्था काढली या संस्थेच्या निर्मितीत सदाशिव काशिनाथ छत्रे यांचे त्यांना साहाय्य झाले. कालांतराने बॉंबे नेटिव्ह स्कुल बुक अँड सोसायटी चे रूपांतर बॉंबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या शैक्षणीक संस्थेत झाले.

मुंबईत उच्च शिक्षणाची व्यवस्था व्हावी यासाठी फंड उभा करण्याचा विचार करून चार लाख त्रेचाळीस हजार इतका फंड जमा करून तो फंड उच्च शिक्षण निर्मितीसाठी वापरला गेला त्या फंडाचे नाना शंकरशेट ट्रस्टी होते या फंडातून सध्याच्या एल्फिस्टन कॉलेजची निर्मिती करण्यात आली. पुढे बॉंबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि एल्फिस्टन कॉलेज यांचे विलीनीकरण करून निर्माण झालेल्या सोसायटीचे नाव एल्फिस्टन इन्स्टिटयूट असे ठेवण्यात आले.

यानंतर तीन वर्षांनी बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना झाली तेव्हा दर वर्षी निवडणुकांमार्फत तीन स्थानिक सभासद संस्थेवर रुजू केले जात त्यावेळी सतत १६ वर्षे नाना शंकरशेट हे बोर्ड ऑफ एज्युकेशनचे स्थानिक सभासद म्हणून निवडून आले यावरून लोकांमध्ये त्यांच्याविषयी किती आदर होता हे लक्षात येते.

मुंबईत नाना शंकरशेट यांनी उचलेले क्रांतिकारी पाऊल म्हणजे १८४८ साली स्वतःच्या वाड्यात सुरु केलेली मुलींची शाळा. त्याकाळी मुलींचे शिक्षण हा विषय नसल्याने त्यांना लोकविरोधास तोंड द्यावे लागले होते मात्र त्यांनी कधी त्याची फिकीर बाळगली नाही. याशिवाय स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी व दि जगन्नाथ शंकरशेट फर्स्ट ग्रेड अँग्लो व्हर्नाक्युलर स्कुल या संस्थाही त्यांनी स्थापन केल्या.

शैक्षणिक कार्याबरोबरच पूर्वी खुनासारख्या खटल्यांचा निर्णय देण्यासाठी जी ज्युरी व्यवस्था होती त्यामध्ये ब्रिटिश ज्युरीच असत मात्र नाना शंकरशेट यांनी या व्यवस्थेत स्थानिक ज्युरी सुद्धा नेमण्याचा हक्क मिळवला. सतीप्रथेवर बंदी आणणाऱ्या कायद्याच्या निर्मितीत साहाय्य करणे, जस्टीस ऑफ द पीस होण्याचा अधिकार स्थानिकांना प्राप्त करून देणे आणि मुंबई शहराची आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी म्युनिसिपल कमिशनर म्हणून खूप मोठे कार्य केले.

१८५२ साली नाना शंकरशेट यांनी दि बॉंबे असोसिएशनची स्थापना केली याशिवाय अनेक संस्थांना सढळ हस्ते देणग्या देऊन त्यांनी जनमानसात त्याच्या नावाचा खूप आदर निर्माण केला. जगन्नाथ शंकरशेट यांचे विविध क्षेत्रातील कार्य पुढील पिढ्यांच्या स्मरणात राहावे यासाठी त्यांचे पुत्र विनायकराव यांनी मुंबई विद्यापीठात ठराविक रक्कम देऊन जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती सुरु केली. ही शिष्यवृत्ती मॅट्रिक च्या परीक्षेत संस्कृत हा विषय घेऊन प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांस दिली जात असे. या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेले अनेक विद्यार्थी पुढे भारतातील विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती म्हणून प्रसिद्ध झाले. 

मुंबईतील भाऊ दाजी लाड संग्रहालयास नाना शंकरशेट यांनी त्याकाळी पाच हजाराची देणगी दिली त्यावेळी संग्रहालयाची पहिली सभा व कोनशिला समारंभ नाना शंकरशेट यांच्या हस्ते संपन्न झाला. जगन्नाथ शंकरशेट यांचे स्मरण पुढील पिढीस राहावे म्हणून मुंबईच्या राणीच्या बागेत त्यांचा पुतळा उभारण्यात आला याशिवाय मुंबईतल्या एका रस्त्यालाही जगन्नाथ शंकरशेट रोड असे नाव देण्यात आले आहे. नाना शंकरशेट यांचे निधन ३१ जुलै १८६५ साली झाले.

मुंबईच्या विकासाचे श्रेय हे अनेकदा ब्रिटिशांना दिले जाते मात्र या विकासात नाना शंकरशेट यांचा महत्वाचा वाटा होता त्यामुळेच मुंबईच्या विकासासंबंधी कुठल्याही निर्णयाअगोदर ब्रिटिश सुद्धा नाना शंकरशेट यांच्याशी चर्चा करूनच पुढचे पाऊल उचलत ही मुंबईच्या विकासाचे शिल्पकार नाना शंकरशेट यांची महती आहे.