कहाणी छत्तीसगडच्या राजिमची

त्यावेळचा तिथला राजा जगत्पाल सश्रद्ध....या मूर्तीविहीन मंदिरात येत असे. एकदा भगवान विष्णूंनी त्याला स्वप्नात येऊन दृष्टांत दिला.....या मंदिरात माझ्या मूर्तीची स्थापना कर. माझी मूर्ती तुला राजिम या तेलिणीच्या घाण्यावर ठेवलेली मिळेल.- आशुतोष बापट

कहाणी छत्तीसगडच्या राजिमची

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

पद्मपुरी नावाचं एक गाव. तिथे रत्नाकर नावाचा राजा. राजा मोठा धार्मिक वृत्तीचा. यज्ञ-याग नियमित करणारा. त्याच्या यज्ञात राक्षस त्रास देऊ लागले. मग राजाने ‘राजीव लोचन’ (कमलनयन) रूपातील विष्णूला साकडं घातलं. देव धावून आले आणि राक्षसांचे निर्दालन करून यज्ञातील विघ्ने दूर केली. राजा सद्गदित.....म्हणाला, “देवा ज्या रुपात तू आत्ता इथे आला आहेस त्याच रूपात तू इथे कायम आमच्याजवळ राहा" देव म्हणाला ‘तथास्तु’. विश्वकर्मा.....देवांचा स्थपती. त्याने रातोरात मंदिर बांधलं.....राजा कृतकृत्य... इथल्या विष्णूमूर्तीची ख्याती सर्वदूर पसरली. ती कीर्ति ऐकून शेजारच्या कांकेरचा राजा इथे आला. त्याला ती मूर्ती अतिशय आवडली. इतकी सुंदर मूर्ती आपल्याजवळच हवीच..... पुजाऱ्यांकडे मूर्तीची मागणी केली. पुजाऱ्यांनी साफ नकार दिला. राजाने जबरदस्तीने ती मूर्ती पळवली. ही मूर्ती घेऊन राजा नौकेत बसून महानदीतून निघाला....... नाव बुडाली आणि राजाही बुडाला. मंदिरातून मूर्ती चोरली गेली तरीही गावकरी मूर्ती नसलेल्या त्या मंदिरात जाऊन मनोभावे पूजा करत राहिले. राजिम नावाची एक तेलीण त्यांपैकीच एक. राजिम ही मोठी विष्णूभक्त होती. ती आपल्या घाण्यावर तेल काढून उपजीविका करत होती. राजिम एकदा नदीवर स्नान करायला गेलेली असताना तिला पाण्यात एक शिळा सापडली. तिने ती उचलून आपल्या घरी आणली आणि तेल काढायच्या उखळावर वजन म्हणून ठेवली..... ती शिळा म्हणजे खरेतर विष्णूची मूर्ती... ती शिळा घाण्यावर ठेवल्यापासून राजिमच्या तेलाची विक्री एकदम वाढली. तिची मोठी भरभराट झाली.

त्यावेळचा तिथला राजा जगत्पाल सश्रद्ध....या मूर्तीविहीन मंदिरात येत असे. एकदा भगवान विष्णूंनी त्याला स्वप्नात येऊन दृष्टांत दिला.....या मंदिरात माझ्या मूर्तीची स्थापना कर. माझी मूर्ती तुला राजिम या तेलिणीच्या घाण्यावर ठेवलेली मिळेल. राजा तेलीणीकडे आला आणि देवाचा दृष्टांत सांगितला....त्या घाणीवर ठेवलेल्या शिळेची मागणी केली. आता देवाची आज्ञा आणि स्वतः राजा मागायला आला म्हटल्यावर त्याला नाही तरी कसे म्हणायचे. तिची ही आस्था पाहून राजाने त्या मूर्तीच्या वजनाइतके सोने तिला देऊ केले. राजाची आज्ञा म्हणून तेलीण कशीबशी तयार झाली. तराजू आणला गेला. एका पारड्यात ती मूर्ती आणि दुसऱ्या पारड्यात सोने टाकायला सुरुवात झाली. पण कितीही सोने टाकले तरी मूर्तीचे पारडे काही वर येईना. देवाने पुन्हा राजाला दृष्टांत दिला आणि सांगितले की तुला संपत्तीचा गर्व झालाय.....तो बाजूला सारून आता त्या सोन्यावर फक्त एक तुळशीपत्र ठेव. राजा खजिल..... त्याने तुळशीपत्र ठेवल्यावर मूर्तीचे पारडे वर आले. पण विष्णूची अनन्य भक्त असलेल्या राजिम तेलीणीने ही संपत्ती राजाला परत केली. तिने राजाला एक विनंती केली...या देवाबरोबर माझे नाव जोडले जावे. राजाने ते आनंदाने मान्य केले. पद्मपुरी गावाचे ‘राजिम’ नाव झाले. आणि देव झाला राजिमचा राजीवलोचन ! पुढे राजिम या देवळात नियमित देवाच्या दर्शनाला येत राहिली आणि एके दिवशी देवाच्या मूर्तीकडे बघत असतानाच त्याच्या चरणी विलीन झाली....!!

महानदी, सोंधुर आणि पैरी अशा त्रिवेणी संगमावर वसले आहे राजीवलोचन मंदिर. मंदिर मोठे देखणे.... दोन प्राकार असलेले.....प्राकाराच्या मध्यभागी एका चौथऱ्यावर राजीवलोचन मंदिर. मंदिरात दोन शिलालेख..... त्यातील माहितीवरून असे समजते की इ.स.च्या आठव्या शतकात नळवंशीय राजा विलासतुंग याने हे मंदिर बांधले. मंदिरावर असलेली शिल्पकला मात्र अफाट आहे. मंदिरात जाण्यासाठी जो दरवाजा आहे तो प्रशस्त आहे. त्यावर केलेले कोरीवकाम अफलातून. ललाट बिंबावर गजलक्ष्मीचे शिल्प... तिच्या वरच्या बाजूला बरोबर मध्ये हातात सर्प घेतलेला गरूड... त्याच्याही वर कोरलेली शेषशायी विष्णूची मूर्ती....केवळ अफलातून.... इथून पायऱ्या उतरून आतल्या प्रांगणात जातो. तिथून समोरच एका चौथऱ्यावर बांधलेले मंदिर...शिवाय जवळच राजिम तेलीणीचे मंदिर. त्यात एका दगडावर तिचा तेलाचा घाणा कोरलेला..... मंदिर प्राक्रारात अजूनही काही मंदिरे......नदीच्या मधोमध कुलेश्वर महादेवाचे मंदिर...त्याची कथा अजून निराळी...इथे देवाला बेलपत्र वाहताना विष्णूचं नाव घेतात !... लोमश ऋषींचा दाखला देतात यासाठी..... सगळा मामला विचित्रच.....छत्तीसगड आहेच असा आगळावेगळा.....

इथे सांगण्यासारखं बघण्यासारखं अजून भरपूर आहे.... पण सध्या इतकंच !!

- आशुतोष बापट