ओडीशाचे शनिशिंगणापूर – सियालिया

घराला दारे नाहीत म्हणून शनी शिंगणापूर हे गाव आपल्याकडे प्रसिद्ध झाले. पण असेच एक गाव ओडिशामधे सुद्धा वसलेले आहे. अगदीच आडबाजूला... सियालिया हे त्याचे नाव. भुवनेश्वरपासून १३० किमी अंतरावर केंद्रपाडा जिल्ह्यातील राजकणिका या तालुक्याच्या ठिकाणापासून फक्त ५ कि.मी. वर वसले आहे सियालिया.

ओडीशाचे शनिशिंगणापूर – सियालिया
सियालिया

या गावात दडलेले आहे एक आश्चर्य... या गावात जवळजवळ ८० घरे असून त्या कोणत्याही घराला दरवाजा नाही. अगदी आपल्या शनीशिंगणापूर सारखे.

गावाला दारे का नाहीत... अर्थात एक सुंदर लोककथा आणि त्यावर असलेली गाढ श्रद्धा.... या गावची देवता खोखराई ठकुरानी हिच्या वर गावकऱ्यांची प्रचंड श्रद्धा.

ही देवीच घराच्या उंबरठ्यावर बसली आहे त्यामुळे घराला दार कसे लावणार, आणि म्हणूनच कुठल्याही घराला दरवाजा नाही. एका सुंदर लोककथेची ताकद किती तर आख्खे गाव घराला दार न लावता जगतंय. आणि दारातच देवी बसली असल्यामुळे चोरी होण्याचासुद्धा संभव नाही अशी ठाम समजूत इथल्या प्रजेची आहे. त्यामुळे कधीही या गावात चोरी होत नाही. पूर्वी कोणी चोरी केली होती तर तो त्याच घरातच अडकून पडला, त्याला बाहेर जायचा मार्ग सापडेना. शेवटी त्याने चोरी कबूल केल्यावर त्याची सुटका झाली. असे गावकरी सांगतात.

गावाच्या एका बाजूला देवीचे मंदिर आहे. मंदिर म्हणजे मूर्ती उघड्यावरच आहे परंतु चारही बाजूंनी भिंत बांधली आहे. इथे देवीला नवस बोलताना लाकडाचा किंवा मातीचा घोडा वाहायची पद्धत आहे. मंदिराच्या परिसरात या घोड्यांच्या असंख्य मूर्ती पाहायला मिळतात. घराला दरवाजे नसण्याची ही पद्धत देशाच्या एका कोपऱ्यात सुद्धा तेवढ्याच श्रद्धेने पाळली जाते हे खरच नवल म्हणायला लागेल. शरदचंद्रपती पंडित हे या देवीचे पुजारी आहेत.

कार्तिकी पौर्णिमेला इथे मोठा उत्सव होतो पण नवरात्रात मात्र काहीच नसते हे पण एक अजबच आहे. मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी गावात कोणत्याही घरी मांसाहार करत नाहीत. तसेच देवीला सुद्धा मांसाचा नैवेद्य कधीही दाखवत नाहीत. अत्यंत जागृत देवस्थान म्हणून हे पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. इथे घराच्या भिंतींवर चित्रकला केलेली दिसते. मुळात ओडिशाला कमी लोक जातात. त्यातून इथे भेट देणारे तर नाहीतच. तरीपण पर्यटनासाठी ओडिशाला गेल्यावर दुर्मिळ अशा दारे नसलेल्या गावाला भेट दिलीच पाहिजे ना.

- आशुतोष बापट