पनवेल शहराचा इतिहास

रायगड जिल्ह्याच्या उत्तरेकडील पनवेल हे शहर रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे व जास्त लोकसंख्येचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे.

पनवेल शहराचा इतिहास

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

मुंबईपासून फक्त ४७ किलोमीटर अंतरावर व नवी मुंबई या शहराचा एक विभाग असल्याने रायगड जिल्ह्याच्या शहरी लोकसंख्येचे प्रमुख केंद्र हे पनवेल मानले जाते.

पनवेल शहराच्या नावाबद्दल विचार करायचा झाल्यास प्राचीन काळात नागलोकांच्या ज्या वसाहती कोकणात झाल्या त्यापैकी एक वसाहत पनवेल येथेही झाली होती. महाराष्ट्रात, दक्षिणेत तथा कोकणात आजही नागांची नावे असलेली विपुल गावे आढळून येतात. उदा. नागपूर, नागापट्टणम, पनवेल, नागपाडा, नागाव, नागोठणे, नागठाणे, इत्यादी. पनवेलचे प्राचीन नाव होते पन्नगपल्ली. यादवांच्या काळात पनवेलचा उल्लेख पण्यवेला असा मिळतो याशिवाय शिवरायांच्या काळात पनवेलचा पणवल्ली असा केला गेला आहे.

भौगोलिक दृष्ट्या पनवेल अशा ठिकाणी होते जेथून ब्रिटिश, पोर्तुगीज व सिद्दी इत्यादी शत्रूंची राज्ये जवळ होती त्यामुळे या शंत्रुंची नाकेबंदी करण्यासाठी कोकणातले अतिशय महत्वाचे ठिकाण म्हणजे पनवेलच होते. पनवेल ला ज्याची सत्ता त्याच्या हाती ब्रिटिश व पोर्तुगीज यांच्या राज्यातून घाटमाथ्यावर जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर नियंत्रण ठेवता येत असे.

पनवेल हे शहर आधुनिक काळातच नव्हे तर प्राचीन काळापासून एक जलवाहतुकीचे महत्वाचे बंदर म्हणून प्रख्यात होते. चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात पनवेल शहर गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात होते त्यावेळी लिहिल्या गेलेल्या मीरत ई अहमदी या ग्रंथात पनवेल शहराचे वर्णन एक महसूल प्राप्त करून देणारे बंदर असा केला गेला आहे. १५७० साली जेव्हा पोर्तुगीज, डच, फ्रेंच व ब्रिटिश इत्यादी युरोपीय व्यापारानिमित्ताने भारताशी जोडली जाऊ लागली तेव्हा पनवेलचा उल्लेख युरोपियनांचे व्यापारी बंदर असा केला गेला.

१६३७ साली पनवेलवर आदिलशहाची सत्ता असून ते कल्याण सुभ्या अंतर्गत येत असे, शिवाजी महाराजांनी १६५७ साली कल्याण सुभ्यावर विजय मिळवला तेव्हा त्यांनी पनवेल हे शहर स्वराज्यात सामील केले. या काळात पनवेल इतिहासातील अनेक महत्वपूर्ण घटनांचे साक्षीदार राहिले आहे. शिवाजी महाराजांच्या काळात लिहिल्या गेलेल्या शिवभारत या संस्कृत ग्रंथात पनवेल चा उल्लेख पणवल्ली असा केला गेला आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे बलाढ्य आरमार उभारण्याकरिता पनवेल येथे खूप मोठे आरमारी ठाणे उभारले होते. छत्रपती संभाजी महाराजांनी पनवेल च्या खाडीत एका किल्ल्याची निर्मिती सुद्धा केली,आता फक्त त्या किल्ल्याचे अवशेष दृष्टीस पडतात. 

पनवेलमध्ये पूर्वी एक टांकसाळ सुद्धा होती, काशी सोनार नामक व्यक्ती ही टांकसाळ चालवीत असे. नाना फडणवीस यांची पत्नी जिऊबाई यांचा पनवेल येथे वाडा होता. या वाड्यात जिऊबाई व ड्यूक ऑफ वेलिंग्टन यांची भेट झाली होती. कालांतराने या भागात धूतपापेश्वर नावाचा औषधांचा एक अतिशय प्रसिद्ध कारखाना सुरु झाला. ब्रिटिश काळातही पनवेल तालुक्याचे ठिकाण होते मात्र तालुक्याचे क्षेत्रफळ मोठे असल्याने पनवेल तालुक्याचे प्रशासकीय दृष्टया दोन भाग तयार करून मुख्य पनवेल तालुका व उप विभाग उरण पेटा तयार करण्यात आला होता.

पनवेल हे शहर व्यायाम क्षेत्रासाठी एक प्रसिद्ध शहर म्हणूनही प्रख्यात होते. पनवेलचे व्यायाम शास्त्रातील महत्व पाहून युजेन सॅडी याने तेथे डंबेल्स या तेव्हा नव्याने आलेल्या साधनांचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला मात्र पनवेलचे नागरिक आत्मारामशेट आटवणे यांनी त्याला कारल्याचे हात करून दाखवले व त्यास चकित केले. याशिवाय पूर्वी पनवेल येथे वीट निर्मिती आणि चाकजोडीची निर्मितीही मोठ्या प्रमाणात होत असून मुंबईला विटा पुरवणारे प्रमुख केंद्र हे पनवेलच होते.

१ सप्टेंबर १८५२ साली पनवेल येथे नगरपालिकेची स्थापना झाली. पनवेल हे जुन्या काळापासून एक शहर म्हणून प्रसिद्ध असल्याने अनेक जाती धर्माची लोक येथे राहत असत त्यामुळे त्यांची प्रार्थना स्थळे येथे विपुल प्रमाणात आहेत. पनवेल शहरातील विरुपाक्ष महादेव, बल्लाळेश्वर महादेव आणि राम मंदिर अथवा दास मारुती मंदिर ही मंदिरे जुनी असून ती बाळाजी कृष्ण बापट यांनी बांधल्याचा उल्लेख आहे. याशिवाय पनवेल शहराच्या वायव्य दिशेस देवाळे नावाच्या तळ्याशेजारील हजरत पीर करमअली शाह च्यूस्टी हा दर्गा १७४७ मध्ये बांधण्यात आला आहे.  

पनवेलमध्ये तलावांची संख्याही विपुल प्रमाणात असून वडाळा तलाव, विश्राळे तलाव, कृष्णाळे तलाव, देवाळे तलाव, लेंडाळे तलाव व दुदोळे तलाव असे एकूण ६ जुने तलाव पनवेल शहरात आहेत.  

आधुनिक काळात पनवेलने एक शहर म्हणून आपला चेहरा मोहरा बदलला असला तरी इतिहासाच्या तुरळक पाऊलखुणा आजही शहरात आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करून आपली गाथा सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यामुळे ती गाथा ऐकणे जरुरीचे आहे.