रामसेतूच्या निर्मितीची कथा

रामायणासारख्या प्राचीन ग्रंथात रामसेतूचे निर्माण रावणाच्या कैदेत असलेल्या सीतेस लंकेहून परत आणण्याकरिता वनरसेनेच्या साहाय्याने केल्याचा उल्लेख येत असल्याने रामसेतू हा भारतीयांसाठी आस्थेचा विषय आहे.

रामसेतूच्या निर्मितीची कथा
रामसेतू

रामायण काळ हा भारतीय संस्कृतीतील एक सुवर्णकाळ समजला जातो व हजारो वर्षे लोटल्यावरही आजही रामायणाचे महत्व कमी न होता वाढतच आहे. रामायणातील प्रत्येक व्यक्ती, स्थळ व घटना या धार्मिक व ऐतिहासिक दृष्ट्या आजही महत्वपूर्ण मानल्या जातात व रामायणातील अनेक तथ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न विविध माध्यमांतून केला जातो.

रामायणातील असेच एक गूढ स्थळ जे आजही आपण पाहू शकतो ते म्हणजे रामसेतू. भारतच्या दक्षिण पूर्वेस समुद्र किनारी असलेल्या रामेश्वरम बेट व श्रीलंकेच्या पश्चिमोत्तर समुद्र किनाऱ्यावर असलेल्या मन्नार बेटाच्या मध्ये असलेला एक दुवा म्हणजे रामसेतू. रामसेतू हा निसर्गनिर्मित की मानवनिर्मित यावर गेली अनेक वर्षे वादविवाद सुरु आहेत मात्र रामायणासारख्या प्राचीन ग्रंथात रामसेतूचे निर्माण रावणाच्या कैदेत असलेल्या सीतेस लंकेहून परत आणण्याकरिता वनरसेनेच्या साहाय्याने केल्याचा उल्लेख येत असल्याने रामसेतू हा भारतीयांसाठी आस्थेचा विषय आहे.

त्यामुळे रामसेतू निसर्गनिर्मित की मानवनिर्मित या वादात न पडता रामसेतू कसा निर्माण झाला हे रामायणातील कथेच्या आधारे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सीता ही लंकेस कैदेत असल्याचे रामास हनुमानाकडून खात्रीलायक समजल्यावर रामाने वनरसेनेचा राजा सुग्रीव याच्या साहाय्याने लंकेवर स्वारी करण्याची तयारी सुरु केली.

रामास व लक्ष्मणास या मोहिमेत साहाय्य करण्यासाठी वालीचा सासरा सुषेण, गय, गवय, गवाक्ष, गंधमादन, पनस, दधिमुख, जांबुवंत, नल, नील, क्राथ इत्यादी सुग्रीवाचे मंडलिक राजे आपापले सैन्य घेऊन रामास मिळाले. सैन्य सज्ज झाल्यावर रामाने लंकेच्या दिशेने चाल केली. या अफाट सेनेच्या आघाडीस सेनापती म्हणून हनुमान आणि पिछाडीस लक्ष्मण होते.

लंकेच्या दिशेने चाल करता करता हे सैन्य भारताच्या दक्षिणेकडील समुद्राजवळ येऊन पोहोचले व समोर असलेला अथांग महासागर पाहून हा समुद्र कसा ओलांडावा याचा विचार करू लागले. चर्चा सुरु असताना वानरांकडे उड्डाणाची कला उपजत असल्याने वानरसेना हा समुद्र उड्डाण करूनच पार करेल असे सुग्रीवाने सांगितले मात्र इतर राजे व त्यांचे सैन्य हा समुद्र पार कसा करतील हा प्रश्न पुढे उभा राहिला त्यावेळी लहान लहान होड्या तयार करून त्यांच्या साहाय्याने राम लक्ष्मण व इतर राजे आपल्या सैन्यासहित समुद्र पार करतील असे अनेकांचे मत पडले.

अशाप्रकारे उड्डाण व होड्या यांचा वापर करून समुद्र पार करण्याची मसलत सुरु असताना रामास हे दोन्ही उपाय पटले नाहीत कारण समुद्र हा अतिशय विस्तीर्ण व खोल होता व सोबत आणलेल्या प्रचंड सैन्याची संख्या पाहता इतके सैन्य छोट्या नावांतून लंकेत नेणे शक्य नव्हते व इतक्या लोकांना नेण्यासाठी जेवढ्या होड्यांची गरज होती तेवढ्या त्यावेळी रामसैन्याकडे नव्हत्या. कमी वेळात एवढ्या मोठ्या संख्येने होड्या तयार करावयास सांगून वाणिजांना त्रास देणेही रामास अयोग्य वाटले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हा प्रचंड समुद्र पार करून लंकेकडे कूच करत असताना लंकेतील रावण सैन्य सावध होऊन पलीकडून आपल्यावर हल्ला करतील व यावेळी ते जमिनीवर व आपण खोल समुद्रात असल्याने त्यांचा प्रतिकार करणे आपणांस अशक्य होईल.

अशाप्रकारे रामाने आधीच्या उपायांना असहमती दर्शवल्यावर सर्वात योग्य उपाय म्हणून भारत व लंका यामधील समुद्रांत एक सेतू उभारण्याचा संकल्प करण्यात आला व विश्वकर्म्याचा पुत्र नल जो रामाच्या बाजूने आपल्या सैन्यासहित उपस्थित होता त्याच्याकडे ही जबाबदारी देण्यात येऊन भर समुद्रात शंभर योजने लांब आणि दहा योजने रुंद असा सेतू तयार करण्याचे कार्य वेगाने सुरु झाले व या कार्यास समस्त वानरसेना आणि रामासहित असलेल्या इतर राजांचे सैन्य आपला हातभार लावू लागले. पाहता पाहता हा सेतू तयार झाला व सुरुवातीस रामाने या सेतूचे नामकरण नलसेतू असे केले. 

याच दरम्यान रावणाचा भाऊ बिभीषण हा लंकेतून निघून आपल्यासहीत चार सचिव घेऊन रामाच्या भेटीस आला आणि रामाकडे आश्रय मागितला. सुरुवातीस सुग्रीवास हा रावणाचा गुप्तहेर तर नसावा अशी शंका आली मात्र बिभीषणाचे वर्तन पाहून रामाने त्यावर विश्वास ठेवला व आपल्या पक्षात घेतले आणि बिभीषणचा राक्षसांचा राजा या नात्याने राज्याभिषेकही केला.

यानंतर समस्त राम लक्ष्मण, हनुमान, सुग्रीव व वानरसेना, इतर राजे व त्यांचे सैन्य हे बिभीषणासहित रामसेतूवरून लंकेच्या दिशेने मार्गक्रमण करू लागले व बिभीषणाने लंकेत जाण्याचा जवळचा मार्ग दाखवल्याने एक महिन्याच्या आत रामाने व सैन्याने लंकेत पाऊल ठेवले व पुढील इतिहास तर आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे.