दुर्गावर आढळणारी विविध शिल्पे

गडावर सापडणाऱ्या अशाच काही शिल्पाकृती जाणून घेऊयात. मध्ययुगीन बहुतेक दुर्गांच्या प्रवेशद्वारावर  हमखास आढळणारे एक शिल्प असते व्याघ्रसदृश्य प्राण्याचे.

दुर्गावर आढळणारी विविध शिल्पे
दुर्गावर आढळणारी विविध शिल्पे

कोणत्याही स्थलदुर्गात प्रवेश करणे हे फारसे कष्टप्रद नसते कारण आपणास डोंगर-टेकड्या चढाव्या उताराव्या लागत नाही. त्यामुळे आपण अगदी विनासायास स्थलदुर्गाच्या प्रवेशद्वारापर्यंत येतो. मात्र जेव्हा आपण एखादा गिरिदुर्ग सर करीत असतो आपली चांगलीच दमछाक होते. बरेच चढ  उतार पार करून आपण अक्षरश: धापा टाकीत दुर्गाच्या द्वारापर्यंत येतो आणि अगदी अनाहूतपणे आपण द्वाराच्या कमानीकडे पाहतो आणि तिच्यावरची मोहक कलाकुसर पाहण्यात आपण इतके गुंगून जातो कि वर येताना झालेल्या साऱ्या श्रमांचा आपल्याला विसर पडतो. कधी तिच्यावर एखादा देवनागरी, फारसी किंवा पोर्तुंगीज शिलालेख असतो, कधी एखादा प्राणी, पक्षी, फुले, शुभचिन्ह, राजचिन्ह तर कधी देवदेवतांच्या प्रतिमा आपल्याला मोहवून टाकतात. आज गडावर सापडणाऱ्या अशाच काही शिल्पाकृती जाणून घेऊयात. मध्ययुगीन बहुतेक दुर्गांच्या प्रवेशद्वारावर  हमखास आढळणारे एक शिल्प असते व्याघ्रसदृश्य प्राण्याचे. मात्र आपण जेव्हा थोडं नीटपणे न्याहाळतो तेव्हा लक्षात येते कि अरे! हा तर आपल्या नेहमीच्या व्याघ्रासारखा दिसणारा मात्र व्याघ्र नसलेला प्राणी आहे. हा व्याघ्रसदृश्य प्राणी म्हणजेच शरभ. याचीच एक वेगळी आवृत्ती मंदिराच्या द्वारांवर देखील दिसते तिला 'व्याल' म्हणतात. हा शरभ एक काल्पनिक पशु आहे आणि तो सामर्थ्याचे व बलदंडपनाचे प्रतीक आहे. म्हणून त्याला दरवाजावर स्थान दिले गेले आहे. जणू त्या दुर्गाचा स्वामी किती बलदंड आहे ते तो  येना-जाणाऱ्या साऱ्यांना  सांगत असावा. याच्या जन्माची कथा मात्र फारच रोचक आहे. हिरण्यकश्यपूचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूने नरसिंहाचे रूप घेतले व त्याचा वध केला. मात्र पुढे हा नरसिंहावतार मातला. सर्व-सामान्य प्रजेला त्याचा त्रास होऊ लागल्याने सर्वांनी भगवान शंकराकडे नरसिंहा पासून सुटका करण्याची विनंती केली. मग भगवान शंकर पशु, पक्षी आणि नर या तिन्हींच्या शक्ती एकत्रित करून शरभाच्या रूपात प्रकट झाले व त्यांनी नरसिंहाचा वध करून त्याचे कातडे अंगावर पांघरले व त्याचे डोके आपल्या मुकुटात अलंकृत केले. तेव्हापासून हि संकल्पना शक्तीचे व सामर्थ्याचे प्रतीक म्हणून रूढ झाली.

तर असा हा शक्ती आणि सामर्थ्याचे प्रतीक असणारा शरभ बहुतेक सर्व दुर्गांवर असतोच. हा प्रवेशद्वारावर तर असतोच मात्र अनेक वेळी त्याला प्रवेशदवाराशिवाय इतर ठिकाणी देखील स्थान मिळालेले दिसून येते. जंजिरा, रायगड,शिवनेरी अशा दुर्गांवर फार देखणी शरभ शिल्पे आहेत. बहुतेक वेळी या शरभाने पायात हत्ती किंवा एक द्विमुखी पक्षी पकडलेला आढळतो. काही ठिकाणी शरभाला पंख दाखवतात तर कधी ते नसतातही. तामिळनाडू मधील कुंभकोणम पासून जवळच सुमारे १० किमी वर असणाऱ्या तिरुभुवनम या गावात तर चक्क या शरभाच 'शरभेश्वर' म्हणून मंदिरच आहे. तर असा हा शरभ जवळपास संपूर्ण भारतात वेगवेगळ्या प्रकारात आणि आकारात कोरलेला दिसून येतो. 

वर आपण शरभाच्या पायात असणाऱ्या एका द्विमुखी पक्षाचा उल्लेख पहिला. हा पक्षी म्हणजेच गंडभेरुंड. गण्ड म्हणजे योद्धा, बे म्हणजे २  आणि भेरूंड म्हणजे तोंड. अर्थात दोन तोंडे व एकच धड असणारा योद्धा म्हणजे गंडभेरुण्ड. 

हा पक्षी देखील अनेक ठिकाणी कोरलेला दिसून येतो. रायगड, शिवनेरी, सुवर्णदुर्ग, गोवा किल्ला अशा अनेक ठिकाणी तो आढळतो. गाविलगडावरील गंडभेरुंड हे आजपर्यंत दुर्गांवर मिळालेले सर्वात मोठे गंडभेरुंड शिल्प आहे.  गंडभेरूंडाने त्याच्या नखात, पंखांत व चोचीत किती शरभ वा हत्ती धरले आहेत त्यानुसार त्यास ओळखले जाते (उदा. २  हत्ती असतील तर व्दिगज विजयी गंडभेरुंड, तसेच याउलट शरभाच्या पायात किती हत्ती व गंडभेरुंड आहेत त्यानुसार त्याला देखील ओळखले जाते. कधी कधी एकाच वेळी हत्ती व शरभ हे गंडभेरूंडाच्या अंकित तर कधी कधी गंडभेरूंड व हत्ती हे  शरभाच्या अंकित दाखवतात).  गंडभेरूंडाचे सामान्यपणे २ भेद सापडतात

१) मानव देहधारी - याच शरीर  मानवाचं व तोंड पक्षाचं असत. यात अनेक पक्षांची मुखे आढळून येतात (मोर, कोंबडा अगदी राजहंस देखील).

२) पक्षी देहधारी ( २ वा ३ मुखे असणारा सुद्धा क्वचित सापडतो). याच अंकन अगदी समाध्यांवर  देखील झालेलं दिसून येत. अल्बानिया सारख्या राष्ट्राच्या राष्ट्रीय ध्वजात सुद्धा हा दिसतो. अगदी जगभर याचे विविध प्रकार आजवर सापडले आहेत. मात्र उत्तर भारतात तरी अजून हे शिल्प ठळकपणे कुठे सापडलेले नाही.

याशिवाय अनेक प्रकारची शिल्पे गंडांवर कोरली जातात. 'आकाशभैरवकल्प' या ग्रंथात 'उंबरठ्यावर भद्रमुख (कीर्तिमुख) कोरावे, तसेच वरच्या भागात यक्ष-राक्षस यांच्या उठावदार प्रतिमा कोराव्यात, पूर्व दरवाज्यावर गणेश, दक्षिण दरवाजावर भैरव, पश्चिम दरवाजावर भद्रकाली आणि उत्तरेस हनुमान कोरावा असे सांगितले आहे.' मात्र ते का कोरावेत याबद्दल काही स्पष्टीकरण दिलेलं नाही. याच्याशिवाय विष्णुधर्मोत्तर पुराणात देखील कोणती शिल्पे कोठे कोरावीत याबद्दल सविस्तर विवेचन केलेले आहे. देवगिरीच्या एका द्वारावर तसेच राजगडच्या  काळेश्वरी बुरुजाच्या परिसरातील एका टाक्यावर कीर्तिमुख कोरलेलं आढळते.

याशिवाय महाराष्ट्रातील बहुतेक दुर्गांवर हनुमान हटकून आढळतोच. शक्ती आणि सेवक भावनेचं प्रतीक असणारा हनुमंतराया हा गडदुर्गाच्या शिबंदीला धीर देणारी महत्वाची देवता होय. याशिवाय अनेक प्रवेशद्वारांवर गजलक्ष्मीचे शिल्प देखील सापडते.

राजगडाच्या पाली दरवाजाच्या वर राजमुकुट कोरलेला आहे. अशेरी वर देखील पोर्तुगीज राजचिन्ह कोरलेलं आहे. वज्रगडाच्या द्वारावर प्रज्वलित ज्वाळेच शिप कोरलेलं आहे तर सरसगडावर दिपतारा शिल्प आहे. राजगडाच्या संजीवनी माचीवर व रायगडाच्या एक टाक्यावर व्याघ्रमुख  कोरलेलं आढळते. संजीवनीवरच हरणाची शिकार करणारा वाघ/बिबळ्या/चित्ता असं शिल्प कोरला आहे. प्रवेशद्वाराशिवाय क्वचित इतर ठिकाणी सुद्धा गजानन अंकित केलेला दिसतो. राजगडाच्या सुवेळा माचीवर, हरिश्चन्द्र गडावरिल गुहेत अशा अनेक जाएगी आपणास गणेश भेटतो.

याशिवाय अनेक प्रकारची शिल्प विविध गडांवर आढळतात. क्वचित सतीशीेळा वा विरगळ देखील दिसते. सिंहगड़ावर सतीशीेळा शिल्प आहे. अगदी मासा, मगर असे जलचत ते नारळ वा खजुराचे झाड अशा अनेक प्रकारच्या शिल्पांनी आपले गडदुर्ग समृद्ध झालेले आहेत. उद्या लेखमालेचा शेवटचा भाग दुर्गांचे जलव्यवस्थान पाहुयात. क्रमशः

- संतोष विष्णू जाधव (पुणे)