दुर्गस्थापत्यातील विविध प्रयोग

वराहमिहिराने बृहतसंहिता या अनमोल ग्रंथात भूगर्भात असणारे जलाचे साठे कसे ओळखावे, चराचरात असणाऱ्या वृक्ष व  वेली यांच्या साहाय्याने जलस्रोत कसे शोधावे याबद्दल अतिशय मार्मिक विवेचन केले आहे.- संतोष विष्णू जाधव (पुणे)

दुर्गस्थापत्यातील विविध प्रयोग

Marathi Buzz Shop

Marathi Buzz Shop

मागील भागात आपण दुर्गबांधणीत काळानुरूप कसकसा बदल घडत गेला व गिरिदुर्ग कसे महत्वाचे होत गेले याची कारणमीमांसा अगदी थोडक्यात पहिली. या भागात आपण दुर्ग अधिकाधिक दुर्गम करण्यासाठी दुर्गस्थापत्यात जे विविध प्रयोग झाले त्याबद्दल अगदी थोडक्यात जाणून घेऊयात.

प्राकार, परिखा, अट्टालक व द्वार मिळून दुर्ग तयार होतो. सर्वसाधारणपणे कोणत्याही स्थलदुर्गात हे घटक दिसतात मात्र गिरिदुर्गास सहसा परिखा नसते (जिंजीच्या बालेकिल्ल्याला असणारा खंदक किंवा इतर काही अपवादात्मक उदाहरणे सोडून). तसेच अनेक स्थलदुर्गाना रणमंडळ किंवा जिभी सारखी अधिकची संरक्षक रचना देखील पहावयास मिळते. तसेच काही स्थलदुर्गांमध्ये रेवणी देखील असते (दुर्ग परिभाषा प्रकरणात या सर्व संज्ञा अधिक सखोलपणे मांडण्यात येतील). स्थलदुर्ग बांधताना साधारणपणे खंदक आधी खोदला जातो व त्यातून निघालेली माती हि तट व इतर बांधकामासाठी आणि गरजेनुसार उंचसखल भाग समपातळीत आणण्यासाठी वापरली जाते. वेगवेगळ्या साधनांमध्ये या तटबंदीची रुंदी हि अगदी ४ ते २८ हात (साधारण ६ ते ४२ फूट) दिलेली दिसून येते.  जी गत ताटाची तीच बुरुजांची. वेगवेगळ्या साधनांमध्ये दोन बुरुजांमधील अंतर, त्यांची उंची व रुंदी, याबद्दल निरनिराळी परिमाणे दिलेली आहेत. दोन बुरुजांमधील अंतर १०० ते ३० हात असं साधनापरत्वे बदलताना दिसते.  स्थलदुर्गाला बळकटी  आणण्यासाठी अतिशय भक्कम तट उभारणे, खंदकाची साखळी निर्माण करणे, खंदकात पाणी, विषारी वेली, मगरी, सुसरी असे  जलचर सोडणे, टेहळणी करण्यासाठी एखादा मध्यवर्ती उंच बुरुज बांधने असे अनेक प्रयोग करण्यात आले. तसेच स्थलदुर्गातही बालेकिल्ला (किल्ले अर्क) बांधण्यात येऊ लागला(विजापूर, औरंगाबाद व इतर काही किल्य्यात असे किल्ले अर्क होते व औरंगजेबाच्या काळात तर या किल्ले अर्क साठी वेगळा किल्लेदार नेमल्याचे देखील उल्लेख आहेत). मात्र तोफांचा शोध लागला व स्थलदुर्गांचा पाडाव अधिक सुलभ झाला. परिणामी त्याहून अधिक सुरक्षित, तोफांच्या पल्य्याच्या बाहेर असेल वा तोफांचा मारा ज्याच्यावर सहज लागू करता येणार नाही अशा गिरिदुर्गांचे महत्व आपसूचकच वाढले व त्यांच्या बांधणीला वेग आला तसेच नवनवीन कल्पना वापरून ते बांधण्यात येऊ लागले.

वराहमिहिराने बृहतसंहिता या अनमोल ग्रंथात भूगर्भात असणारे जलाचे साठे कसे ओळखावे, चराचरात असणाऱ्या वृक्ष व  वेली यांच्या साहाय्याने जलस्रोत कसे शोधावे याबद्दल अतिशय मार्मिक विवेचन केले आहे. गिरिदुर्ग बांधणीला या संकलनाचा खूपच हातभार लागला.  साधारणपणे यादव  व शिलाहार यांच्या काळात मोठ्या संख्येने गिरिदुर्गांची निर्मिती झाली.  गिरिदुर्ग बांधताना स्थळाची निवड करताना  अनेक निकष लावून ते स्थळ शोधले जाई. दुर्ग बांधताना आधी उदक पाहून दुर्ग बांधावा असा अतिशय मोलाचा सल्ला आज्ञापत्रात दिलेला आहे. कारण  लष्करी दृष्ट्या अतिशय परिपूर्ण स्थानीं सुद्धा पाणी नसताना दुर्ग बांधून काही उपयोग होत नाही. याच कारणामुळे शिवाजी राजानी भरतगड बांधला नाही तर पेशवाईत काही दुर्ग पुरेसा जलसाठा नसल्याने पाडून टाकण्यात आले.

सुरुवातीच्या काळात डोंगराच्या माथ्यावर  तट - बुरुजाची रचना करणे आणि किल्लेदार व शिबंदीसाठी राहण्याची व पाण्याची  सोय करणे असे साधारण गिरिदुर्ग बांधणीचे स्वरूप होते. आणि काही किरकोळ बदल सोडता  शिवकाळापर्यंत गिरिदुर्गांचे हेच स्वरूप होते. मात्र तोफांचा वापर सुरु झाल्यावर अधिकचे संरक्षण मिळावे यासाठी तटाची व बुरुजाची रचना बदलली. तट अधिक रुंद व मजबूत झाले. बुरुज लष्करीदृष्ट्या अधिक परिपूर्ण करण्यासाठी त्यात नवनवीन प्रकारच्या बांधणीचा उपयोग होऊ लागला. बहुमजली बुरुज, चिलखती बुरुज (हे खरे तर योग्य नाव नाही मात्र ते सध्या जनमानसात रुजले आहे ) असे रचनप्रकार उदयास आले. मात्र गिरीदुर्गाच्या बांधणीत आमूलाग क्रांती केली ती छत्रपती शिवरायांनी. आपल्या पूर्वसुरींनी वापरलेले अनुभवसिद्ध ज्ञान व स्वतःच्या अनुभवातून त्यांनी एक वेगळेच गिरीदुर्गबांधणी शास्त्र तयार केले.

सर्वात मोठा बदल म्हणजे त्यांनी गिरीदुर्गाच्या दरवाजा जो पूर्वी थेट माथ्यावर असायचा तो खाली आणला. परिणामी शत्रूच्या आक्रमणाची धार बोथट झाली.  शत्रू दरवाज्यापर्यंत आलाच (जे तसे आवघड होते) तरी त्याच्यावर दरवाजा ताब्यात घेतल्यानंतर देखील वरच्या भागातून मारा होत असे व त्याला त्वरित संपूर्ण दुर्ग ताब्यात घेता येणे शक्य होत नसे (राजगडाचा पाली  दरवाजा, रायगडाचे महाद्वार पाहिल्यास हे चटकन लक्षात येते). यापूर्वी देखील हा प्रयोग गिरिदुर्ग बांधणाऱ्या मंडळींनी केला होता (शिवनेरी, पुरंदर, साल्हेर) मात्र राजांनी तो फार मोठया प्रमाणात केल्याने बऱ्याचदा तेच याचे जनक आहेत असं लोकांना वाटत (अर्थातच वरील उदाहरणांवरून हे सत्य नाही हे लक्षात येतंच).

जे दुर्ग शिवरायांनी बांधले  व नव्याने वसवले अशा बहुसंख्य दुर्गांवर येणारी वाट हि डोंगर उजव्या हातास ठेवून येते. बहुतेक योद्धे हे उजव्या हाताने लढणारे असतात. त्यामुळे तटबंदी व  द्वारा वरून होणारा दगड धोंड्याचा  मारा चुकविण्यासाठी जर ढाल उजव्या हातास बांधली तर द्वाराजवळ होणाऱ्या हातघाईच्या लढाईसाठी त्यांना आपला उजवा हात वापरणे शक्य नसे. तसेच उजव्या हाताची ढाल सोडून ती डाव्या हातास बांधण्याइतकी फुरसद पण नसे.  म्हनजे शत्रूची अवस्था इकडे आड व तिकडे विहीर अशी होत असे.

शिवछत्रतीनी दुर्ग बांधणीत केलेला अजून एक महत्वाचा बदल म्हणजे गोमुखी (ही संज्ञा देखील लोकांमध्ये प्रचलित असली तरी अस अधिकृत नाव संदर्भ साधनांत सापडत नाही) द्वार रचना. जिभी आणि प्रवेव्हाद्वाराचा बुरुज यांचा संयोग करून त्यांनी गडाचा दरवाजा अशा रीतीने लपवला  कि अगदी जवळ आल्यावर देखील शत्रूस तो दरवाजा दिसत नसे. यामुळे जिभी सारखी अधिकची संरक्षण रचना करण्याची गरजच उरली नाही आणि हत्ती वा माणसांद्वारे दरवाजा ओंडक्याच्या माऱ्याने फोडण्याची सोया देखील राहीली नाही कारण या विशिष्ट रचनेमुळे दरवाजाच्या समोर मोकळी जागाच उपलब्ध नसते

मात्र शिवाजी राजानी  केवळ गिरिदुर्ग बांधणीतच प्रयोग केलेत असे नव्हे तर जलदुर्ग बांधणीतही अनेक नवनवीन प्रयोग केले. खांदेरी जलदुर्गाच्या रक्षणासाठी त्यांनी संपूर्ण बेटाच्या कडेने मोठमोठे शिलाखंडाच्या राशी ओतल्या त्यामुळे थेट जलदुर्गाला भिडणे अवघड झाले. जर खाली उतरावे तर समुद्राच्या पाण्याने त्याच्यावर वाढलेलं कालव पाय चिरते आणि मोठमोठया  शिळांमुळे धड चालताही येत नसे. कुलाबा बांधताना त्यांनी नुसतेच मोठं मोठे चिरे एकमेकांवर रचले. मधल्या  मोकळ्या जागेत चुना भरलाच नाही. परिणामी समुद्राच्या लाटांचे पाणी त्यात शिरून लाटांच्या माऱ्याची  भेदकता कमी होत असे.

अशारितीने शिवाजी राजानी अनेक नवनव्या शकला लढवून स्वतःच्या अनुभवावर आधारित अतिशय संपन्न असे एक  वेगळेच दुर्गबांधणीशास्त्र विकसित केले. पुढील भागात आपण दुर्गाच्या विविध भागांबद्दल जाणून घेऊयात. क्रमशः

- संतोष विष्णू जाधव (पुणे)