कोकणची ऐतिहासिक समृद्धी

महाराष्ट्रातील कोंकण म्हणजे एक अतिप्राचीन इतिहास व संस्कृती असलेला प्रदेश ! उत्तरेच्या दमण पासून दक्षिणेच्या गोवा राज्यापर्यंत आणि सह्याद्रीच्या पश्चिमेकडील अरबी समुद्रापर्यंयताचा भूभाग म्हणजेच प्राचीन कोंकण होय. - प्रवीण कदम

कोकणची ऐतिहासिक समृद्धी

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

जवळपास ४५ ते ९० किलोमीटर रुंद आणि ७२० किलोमीटर्स लांब असा हा चिंचोळा पट्टा इतिहासात अपरान्त, कुंकण किंवा कोंकण अशा नावाने ओळखला जातो. कोकण चा उल्लेख आपल्याला इ. स. पूर्व चौथ्या शतकात तर आढळतोच पण महाभारतातील भीष्म पर्वातही अपरान्त हा शब्द आलेला आहे. कोंकण शब्दाची व्युत्पत्ती वेगवेगळ्या ग्रंथांतून निरनिराळी दिलेली आहे. चालुक्यांच्या प्राचीन शिलालेखातही कोंकण शब्द आला आहे. ह्या एतद्देशीय साहित्याव्यतिरिक्त पेरिप्लस, प्लिनी, ऑलेर्मा, स्टेबो, आल्नोषी इत्यादी परदेशी प्रवाश्यांनी सुद्धा आपल्या लिखाणामध्ये कोकणची तत्कालीन माहिती दिलेली आहे. अलीकडच्या दशकात सापडलेल्या कातळशिल्पांमुळे कोकणचे प्रागैतिहासिक काळापर्यंतचे  प्राचीनत्व निर्विवादपणे सिद्ध झालंय. आत्तापर्यंतच्या ज्ञात इतिहासात कोंकणातील मौर्य (अशोकाचा काळ), सातवाहन, चालुक्य, कदंब, शिलाहार, यादव, मोगल, मराठा, इंग्रज अशा असंख्य राजसत्तांचे अंमल असल्याचे अभ्यासले गेले आहे. कोंकण हा प्रदेश समुद्राच्या काठावर असल्याने सागरी दळणवळण इथे पूर्वापार अस्तित्वात आहे. या सागरी मार्गाने आलेल्या आंतरराष्ट्रीय संबंधांमुळे आणि भूभागावरील विविध राजकीय सत्तांमुळे कोकणच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर प्रचंड प्रभाव पडला आहे. अशा वैविध्यपूर्ण धार्मिक व सांस्कृतिक स्थित्यंतरांमुळे कोंकणात ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसास्थळांची मुबलक उधळण आपल्याला दिसून येते. शिलाहार काळात उत्तर कोंकण व दक्षिण कोंकण अशा दोन भागात विभागलेले कोंकण स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या पाच जिल्ह्यांमध्ये सीमीत झाले. 

प्रागैतिहासिक ते मध्ययुगीन काळाच्या अनेक खुणा आजही आपल्याला कोंकणात ठिकठिकाणी विखुरलेल्या दिसतात. कशेळीत असलेले कातळशिल्प आकाराने भारतातील सर्वात मोठे कातळशिल्प आहे. ह्या दर्जेदार वारश्यामध्ये लेणी, मंदिरे, किल्ले यांच्यासह कोंकणातील परंपरा, सण-उत्सव यांच्या माध्यमातूनही आपल्याला सांस्कृतिक समृद्धता अनुभवता येते. बोरिवलीच्या कान्हेरी लेण्या, मुंबई जवळच्या घारापुरी लेण्या, दाभोळच्या पन्हाळे काजीच्या लेण्या, महाडच्या गांधारपाले लेण्या या प्राचीन लेण्यांबरोबरच कुडा लेणी, विमलेश्वर लेणी, खेडची बौद्ध लेणी अशी अप्रसिद्ध लेणी सुद्धा आहेत. अजूनही कोंकणातील कितीतरी लेणी आणि गुंफा प्रकाशात यावयाच्या आहेत. डोंगरातील त्यांच्या स्थानामुळे व नैसर्गिक बदलांमुळे तिथपर्यंत पोचणे कठीण झाले आहे.

कोंकणात शिलाहार काळातील अंबरनाथ शिव मंदिर, संगमेश्वरचे कर्णेश्वर, जावळीतील सप्त शिवालयांसह चिपळूणचे परशुराम मंदिर आणि गावोगावी असलेली मध्ययुगीन कौलारू धाटणीची सुंदर दीपमाळा व अप्रतिम मुर्त्या असलेली मंदिरे आहेत. या मंदिरांचे स्थापत्य अभ्यासकांना त्या त्या काळातील बांधकाम शैलीच्या अभ्यासासाठी आकर्षित करते. प्रत्येक ठिकाणाची मंदिरे इतिहासातील गतवैभवाची साक्ष देतात. येथील मंदिरांचा स्थानिक इतिहास आपल्याला कोंकणातील धार्मिक परंपरांची माहिती देतो. मंदिरांच्या सोबतच कोंकणातील मुस्लिम धमाची प्रार्थनास्थळेसुद्धा इतिहासातील कालखंडाचे दर्शन घडवितात. दापोलीतील याकूत बाबा दर्गा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दानपत्राची आठवण करून देतो तर दाभोळची शाही (अंडा) मस्जिद विजापूरच्या आयशा बीबी राजकन्येची कथा सांगते.

कोंकणच्या प्रत्येक जिल्ह्यात कित्येक ऐतिहासिक स्थळे आहेत. सर्वच ठिकाणी लेणी, मंदिरे, किल्ले अशा वस्तूंचे दर्शन घडते. पालघर जिल्ह्यातील जव्हारच्या राजांचा राजवाडा म्हणजेच जय विलास पॅलेस, राजे मुकणे राजांचा जुना राजवाडा, अर्नाळा, वसई, गंभीरगड, कोहोज, तारापूर, भवानगड, केळवे- माहीम चे कोट, तांदुळवाडी, गंभीरगड, काळदुर्ग, शिरगाव, कामणदुर्ग, इत्यादी किल्ले हे सर्व आपल्याला पोर्तुगीज कालीन राजसत्तेची झलक दाखवितात. वसईच्या रणसंग्रामाची मराठ्यांच्या इतिहासातील महत्वाची लढाई आणि त्यानंतर पोर्तुगीजांना बसलेला वचक हे सारे पेशव्यांच्या इतिहासाची ग्वाही देतात. त्याचबरोबर येथील वाढवण बंदराजवळ असलेल्या शंखोदर नावाच्या बेटावर असलेले शंखोदर मंदिर आणि येथे अक्षय तृतीयेला येणाऱ्या मोठ्या ओहोटी दरम्यान सापडणारे शंख हे तर नैसर्गिक आश्चर्यच आहे. चारोटीच्या महालक्ष्मीचे मंदिर आणि मध्यरात्री अवघड डोंगरात जाऊन देवीचे निशाण लावल्यावर सुरु होणारी जत्रा हि महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यातील भाविकांना पर्वणी असते. पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या देवतांची स्मारके हे सुद्धा लोकसंस्कृतीचे ऐतिहासिक घटक आहेत.    

ठाणे जिल्हा म्हणजे इतिहासाचा खजिनाच आहे. शिलाहार काळात श्री स्थानक म्हणून राजधानीचा दर्जा असलेल्या ह्या जिल्ह्यात अगणित ऐतिहासिक वास्तू आजही उभ्या आहेत. मुंबई ते ठाणे पहिल्या रेल्वेच्या मार्गाचा मानकरी हा जिल्हा आहे. कौपिनेश्वर मंदिर, लोनाड येथील लेणी आणि मंदिर, घोडबंदर किल्ला, ठाणे किल्ला (आजचे जिल्हा मध्यवर्ती कारागृह), टिटवाळ्याचा गणपती, वज्रेश्वरी देवी मंदिर आणि तेथील उष्ण पाण्याचे झरे, हाजी मलंगगड, दुर्गाडी किल्ला, सेंट बाप्टिस्ट चर्च, गोरखगड, माहुली किल्ला यांच्यासह शिलाहार आणि यादवांच्या निर्णायक युद्धातील वीरांचे वीरगळ एकसर (बोरिवली) येथे आहेत. शूर्पारक हे इतिहासकालीन महत्वाचे बंदर आज सोपारा म्हणून प्रख्यात आहे. येथील स्तूपामध्ये गौतम बुद्धांच्या अस्थींचा कलश सापडला होता. आजही इमारतींच्या पायासाठी उत्खनन करताना अनेक पुरावशेष ठाण्यात आढळतात.  

मुंबई जिल्ह्याला तर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा प्रचंड इतिहास आहे. मुंबईतील किल्ले एकेकाळच्या फिरंगाणातील किल्ले म्हणून ओळखले जातात. मुंबईतील फोर्ट भागात आजही कित्येक जागतिक दर्जाची वारसास्थळे आहेत. येथील इमारतींचे स्थापत्य आपल्याला ब्रिटिश काळातील समृद्धतेची आणि स्थापत्याची सहज सफर घडवितात. मुंबईच्या शहरात कितीतरी विविध धार्मिक स्थळांच्या वस्तू आहेत. अंधेरी जवळची कोंडिवटा लेणी (महाकाली गुंफा) प्राचीन शिल्पकलेचा नमुना आहेत. तिथूनच जवळ असलेल्या सीपझ मध्ये पोर्तुगीजकालीन चर्चचे अवशेष आहेत. सुमारे सहा कोटी वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेली गिल्बर्ट हिल हा मुंबईचा भूशास्त्रीय वारसा आहे.

मुंबईच्या लगतच असणारा रायगड जिल्हा आणि त्याच्या शेजारचा रत्नागिरी जिल्हा प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाचे अनेक पुरावे बाळगून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जावळी हि रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याच्या सह्याद्रीत सामावलेली आहे. कुलाबा, खांदेरी, उंदेरी सारखे जलदुर्ग छत्रपतींच्या आरमाराचे मूक साक्षीदार आहेत. एकूणच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील स्थलदुर्ग, गिरिदुर्ग आणि जलदुर्ग यांचे इतिहासातील महत्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक किल्ल्याची रचना वेगळी, अभिनव आणि एकमेवाद्वितीय आहे. किल्ल्यांसोबतच इथंही मंदिरे सुद्धा अतिशय महत्वपूर्ण ऐतिहासिक परंपरा जपणारी आहेत. अलिबाग तालुक्यातील चौल हे तर प्राचीन काळातील सुप्रसिद्ध बंदर होते. येथे दोन हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन बंदर होते. त्या काळी या बंदरातून इजिप्त, ग्रीस, आखातातील काही देश आणि अगदी चीनदेखील असा आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू होता. चौल हे त्यावेळी जगाच्या नकाशावर भरभराटीला आलेले नगर होते. त्याचप्रमाणे दाभोळ हे कोकणातील आणखी एक अतिमहत्त्वाचे बंदर. दाभोळ खाडीच्या वैशिष्टयपूर्ण नैसर्गिक रचनेमुळे येथे खूप मोठी जहाजे खाडीतून सहज आतपर्यंत येत असत. येथे जहाज बांधणी आणि दुरुस्तीचा व्यवसाय चाले. दाभोळची लारी हे एक प्राचीन चलन होते.

कोकणचा इतिहास प्राचीन, मध्ययुगीन आणि अठराव्या शतकातील इतिहासाची कित्येक दुर्मिळ वास्तू आणि स्थळांनी बहरलेला आहे. गोव्याचा पोर्तुगीज अंमल आणि तेथील जनतेचा धार्मिक छळ सांगणारा इतिहास आज गोव्यत पर्यटनाचा आधार बनला आहे. कोंकणातील धार्मिक परंपरांचा एखादा स्वतंत्र विश्वकोश व्हावा इतकी इथली संस्कृती समृद्ध आहे. आजही काही ठिकाणी देवीच्या जत्रेमध्ये पाठीत लोखंडी (गळ) हुक लावून बगाडाच्या तुळईवर लटकून फेऱ्या घेण्यासारख्या प्रथा पाळल्या जातात. गावोगावी सण आणि उत्सवांचे भाषेप्रमाणे बदलत जाणारे स्वरूप हा सुद्धा एक प्रकारचा ऐतिहासिक ऐवज आहे. कोंकणातील गावागावात आढळणाऱ्या वीरगळ, गद्धेगळ आणि सतीशिळांचा शास्त्रोक्त अभ्यास अजूनही संशोधकांच्या प्रतीक्षेत आहे. 

कोकणला असलेल्या सागरी किनारपट्टीमुळे प्राचीन काळापासून येथे जगभरातून प्रवासी, व्यापारी आणि राज्यकर्ते आले. त्या सगळ्यांनी कधी व्यापारासाठी, कधी धर्म प्रचारासाठी तर कधी राजकीय सत्ता स्थापनेसाठी येथील नागरिकांशी संबंध जोडले. त्यामुळे येथील इतिहासात डोकावल्यावर आपल्याला युरोपियन, अरब, अबेनिशियन (हबशी), मुस्लिम, डच, पोर्तुगीज, ज्यू, पारशी अशा निरनिराळ्या जाती-धर्माच्या संस्कृत्यांचा समृद्ध वारसा दिसून येतो. त्याचबरोबर उत्तरेकडून झालेल्या मोगल आक्रमणांमुळे त्यांचे स्थापत्य येथील वास्तूंमध्ये दृग्गोचर होते. कोंकणच्या ह्या ऐतिहासिक समृद्धीचा वारसा आपल्याला पुढील पिढीकडे सुपूर्द करण्यासाठी त्याचे रक्षण आणि संवर्धन करणे हि आज काळाची गरज आहे.  

- श्री. प्रवीण सहदेव कदम, मुलुंड.
भ्रमणध्वनी - ९३२३२९४५३०