वेदांची नावे व माहिती

वेदांची संख्या एकूण चार असून त्यांस ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या नावांनी ओळखले जाते.

वेदांची नावे व माहिती

आपल्या भारतीय संस्कृतीस ग्रंथनिर्मितीचा पुरातन असा वारसा आहे. गेल्या हजारो वर्षांत कोट्यवधी ग्रंथांची निर्मिती भरतखंडात झाली असली तरी सर्वात आद्य साहित्य म्हणून वेद प्रसिद्ध आहेत.

अनेक अभ्यासकांच्या व धर्मशास्त्रज्ञांच्या मते वेद हे मनुष्याची उत्पत्ती होण्यापूर्वीसुद्धा होते व यामुळे वेदांस अपौरुषेय म्हटले जाते.

ज्याकाळी लिहिण्याची कला अस्तित्वात आली नव्हती त्याकाळी वेद मौखिक स्वरूपात उपलब्ध असत. पाठांतराद्वारे आणि मौखिक स्वरूपात त्यांचे हस्तांतरण पिढ्यानपिढ्या होत राहिले आणि ज्यावेळी लेखनकला अस्तित्वात आली तेव्हा हे वेद लिखाणाच्या स्वरूपात उपलब्ध झाले.

या वेदांची संख्या एकूण चार असून त्यांस ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या नावांनी ओळखले जाते व हे आपल्यापैकी अनेकांना ठाऊक असेल मात्र या चार वेदांमध्ये फरक काय व त्यांची निर्मिती कशी झाली हे फार कमी लोकांना माहित असते त्यामुळे या लेखात आपण या चार वेदांची माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

प्राचीन काळी मंत्रांच्या स्वरूपात जे पूर्ण वाक्य तयार होत असे त्यास सूक्त म्हटले जाई व त्याकाळातील वेगवेगळ्या ऋषींनी अशी अनेक सूक्त निर्माण केली होती व कालांतराने या सर्व सूक्तांचा जो संग्रह तयार झाला तो म्हणजे ऋग्वेद. ऋग्वेद हा वेदांमधील आद्य मानला जातो. 

ऋग्वेदात विविध विषयांचा समावेश होता व हा काळ यज्ञसंस्कृतीचा काळ असल्याने अर्थातच यज्ञयागास खूप महत्व दिले जात असे त्यामुळे यज्ञयाग करताना त्यासाठी उपयुक्त असे मंत्र ऋग्वेदात असले तरी इतरही अनेक मंत्र ऋग्वेदात असल्याने फक्त यज्ञयाग करताना उपयोगाचे असे मंत्र ऋग्वेदातून वेगळे करून त्यांचा जो संग्रह निर्माण करण्यात आला त्यास यजुर्वेद असे नाव प्राप्त झाले.  यजुर्वेदात यज्ञ करताना म्हणावयाची सूक्ते आणि यज्ञकार्यप्रसंगी विद्वानांमध्ये जी विवेचने आणि निर्णय होत असत त्यांचा समावेश गाथांच्या स्वरूपात करण्यात आला.

मूळ ऋग्वेदातील काही मंत्र हे गाण्याच्या अथवा छंदांच्या स्वरूपात होते त्यामुळे या मंत्रांचा मिळून एक वेगळा वेद तयार करण्यात आला व तो सामवेद म्हणून प्रसिद्ध झाला. सामवेदात निपुण अशा विद्वानास छंदोगामात्य म्हटले जाई. सामवेद हा तीन भागांचा असून त्या तीन भागांना त्रयीविद्या असे म्हटले जाई.

ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद या तीन वेदांनंतर बऱ्याच काळाने चौथा वेद निर्माण झाला व या वेदात ऋग्वेदातील शेवटचे आणि त्यानंतर च्या काळात तयार झालेले मंत्र अथवा काव्यांचा समावेश करण्यात आला व हा वेद अथर्ववेद म्हणून ओळखला गेला.

वेद निर्माण झाल्यावर ग्रंथनिर्मितीची एक परंपराच सुरु झाली व यामध्ये ब्राह्मण, आरण्यके, उपनिषदे, सूत्रे, स्मृती, पुराणे, इतिहास आणि इतर अनेक प्रकारचे ग्रंथ निर्माण झाले मात्र या सर्वांमध्ये आद्य हे वेद मानले जातात.