राणोजी शिंदे - शिंदे राजघराण्याचे संस्थापक

राणोजी शिंदे यांचे मूळ गावं सातारा जिल्ह्यातील कण्हेरखेड असून त्या गावाची पाटीलकी पुर्वीपासुन शिंदे घराण्याकडे होती.

राणोजी शिंदे - शिंदे राजघराण्याचे संस्थापक
राणोजी शिंदे

छत्रपती शिवाजी महाराजांनी समस्त मराठी जनांना एकत्रित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली व हे स्वराज्य छत्रपती शाहू महाराजांच्या काळात सर्वोच्च शिखरावर होते. 

छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मराठ्यांमध्ये जी मातब्बर घराणी उदयास आली त्यापैकी एक घराणे म्हणजे शिंदे घराणे. शिंदे घराण्यातील अनेक पुरुषांनी व स्त्रियांनी आपल्या पराक्रमाने भारताच्या इतिहासात आपले नाव अजरामर केले असले तरी या घराण्याचे मूळ जनक व ज्यांच्यामुळे शिंदे घराण्याचा उत्कर्ष झाला ते म्हणजे राणोजी शिंदे.

राणोजी शिंदे यांचे मूळ गावं सातारा जिल्ह्यातील कण्हेरखेड असून त्या गावाची पाटीलकी पुर्वीपासुन शिंदे घराण्याकडे होती. वंशपरंपरेनुसार पाटीलकी राणोजी शिंदे यांच्याकडे आल्यावर त्यांनी फक्त एका गावाच्या पाटीलकीवर समाधान न मानता आपल्या कर्तृत्वाने आणखी प्रगती करण्याचा निश्चय करून त्यांनी सातारा राजधानीस प्रयाण केले.

सर्वप्रथम त्यांची भेट छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्यासोबत झाली आणि यानंतर राणोजी शिंदे हे बाळाजी विश्वनाथ यांच्या सोबत राहून आपली उपजीविका करू लागले.

राणोजी शिंदे हे तेव्हापासून छत्रपती शाहू महाराज व पेशवे यांचे एकनिष्ठ म्हणून गणले जाऊ लागले व ज्यावेळी बाजीराव पेशवे पंतप्रधानपदी आले त्यावेळी त्यांनी राणोजी शिंदे यांची एकनिष्ठता पाहून त्यांना अमंलदारपदी बढती दिली.

राणोजी शिंदे यांना मिळालेले अंमलदार हे पद लष्करी असल्याने त्यांना विविध मोहिमांमध्ये जाण्याची संधी प्राप्त झाली व या मोहिमांमध्ये त्यांनी मोठा पराक्रम गाजवल्याने त्यांचा कार्याचा आलेख वर चढत गेला. 

१७३० साली त्यांना सरदार हे अतिशय मोठे पद मिळाले व त्यांच्या अखत्यारीत एका मोठ्या फौजेचे अधिपत्य आले. १७३८ साली बाजीराव पेशवे नर्मदा ओलांडून उत्तर भारतात गेले त्यावेळी राणोजी शिंदे सुद्धा त्यांच्या सोबत होते. मराठ्यांची फौज नर्मदा ओलांडून आल्याचे समजताच दिल्लीच्या बादशहाने निजामउल्मुल्क यास मराठ्यांवर पाठवले मात्र मराठ्यांनी त्याचा दारुण पराभव करून नर्मदा आणि चंबळ या नद्यांच्या मधील मोठा प्रदेश आणि पाच लाख रुपये खंडणी वसूल केली.

या तहाच्या वेळी राणोजी शिंदे यांनी मोठी कर्तबगारी दाखवली. याच घटनेनंतर १७४३ साली मराठे व निजाम यांच्यात जो तह झाला त्यावेळी निजामाने पेशव्यांकडून जे तीन जमीनदार मागितले त्यामध्ये राणोजी शिंदे यांचा समावेश होता.

या तहात मराठ्यांना जो मुलुख मिळाला त्यापैकी अर्धा मुलुख शाहू महाराजांनी राणोजी शिंदे यांनी दाखवलेल्या पराक्रमाबद्दल त्यांना जहागिरी म्हणून दिला. 

बाजीराव पेशवे यांच्या काळात राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर हे दोन पराक्रमी पुरुष उदयास आले व राणोजी आणि मल्हारराव यांची अत्यंत घनिष्ट मैत्री होती.

१७५० साली राणोजी शिंदे यांचे निधन झाले मात्र त्यांनी आपल्या पराक्रमाने एक मोठा प्रदेश प्राप्त केला होता ज्याचे उत्पन्न त्याकाळात तब्बल साडेसव्वीस लाखाचे होते. राणोजी शिंदे यांच्यानंतर त्यांचे जयाजी, जनकोजी, दत्ताजी, महादजी आणि तुकोजी असे एकूण पाच पुत्र सुद्धा अतिशय कर्तबगार निघाले आणि राणोजी शिंदे यांच्यापासून सुरु झालेला शिंदे घराण्याचा उत्कर्ष पुढे सुद्धा वाढत गेला.