छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा

छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा प्रथम चाकणकर ब्रह्मे यांच्यासंबंधी लिहिलेल्या पात्रात वापरण्यात आली होती. त्यावेळी चाकणकर ब्रह्मे यांना चाकण आणि इंदोरी येथे जी इनामे पूर्वापार चालत आली होती तीच पुढे चालवण्याविषयी शिवाजीराजांनी या पत्रात आदेश दिले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा म्हणजे त्यांच्या स्वराज्य संकल्पनेचं जणू प्रतीकच. आजही महाराजांची ही राजमुद्रा प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात कोरली गेली आहे. शिवरायांची ही मुद्रा व तिचा अर्थ जाणून घेण्याचा या लेखात थोडक्यात प्रयत्न करू.

सर्वप्रथम आपण राजमुद्रा म्हणजे काय ते जाणून घेऊ. राजमुद्रा म्हणजे खरं तर एक प्रतिज्ञा जी पूर्ण करण्यासाठी राजा वचनबद्ध असतो. राजमुद्रा निर्माण करताना आपले मुख्य ध्येय निश्चित करूनच मग राजमुद्रा तयार होत असे व त्या राजमुद्रेत लिहिलेल्या प्रतिज्ञेस जागणे हे राजाचे परमकर्तव्य असे. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर राजमुद्रा म्हणजे राजाच्या ध्येयाचे थोडक्या शब्दांत मांडलेले सार! 

शिवरायांची मुद्रा पुढीलप्रमाणे होती,

प्रतिपच्चन्द्ररेखेव। वर्धिष्णुर्विश्ववंदिता। शाहसूनो: शिवस्यैषा। मुद्रा भद्राय राजते।।

अर्थात - शुद्धपक्षातील चंद्रकोर जशी रोज रोज वाढत जाते तशी ही मुद्रा (स्वराज्य) ही अभिवृद्धी पावणार आणि चंद्रकोर जशी लोकपूजीत होते तशीच ही मुद्राही सर्वमान्य होणार! शहाजीचा (शहाजी महाराज) पुत्र जो शिवाजी (शिवाजी महाराज) त्याची ही मुद्रा आहे. ही मुद्रा लोककल्याणार्थ येथे शोभत आहे!

छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा प्रथम चाकणकर ब्रह्मे यांच्यासंबंधी लिहिलेल्या पात्रात वापरण्यात आली होती. त्यावेळी चाकणकर ब्रह्मे यांना चाकण आणि इंदोरी येथे जी इनामे पूर्वापार चालत आली होती तीच पुढे चालवण्याविषयी शिवाजीराजांनी या पत्रात आदेश दिले आहेत. या काळी चाकण परगणा शिवाजी महाराजांकडे आला होता हे देखील पत्रावरून लक्षात येते. शिवाजी महाराजांचा उल्लेख पत्रात 'राजश्री सिवाजी राजे' असा करण्यात आला आहे.

१८ जानेवारी १६४६ सालच्या आणखी एका पत्रावर (खुर्दखत) महाराजांची राजमुद्रा उमटवण्यात आली आहे. मौजे रांजे येथील मुकादम बाबाजी बिन भिकाजी गुजर याच्या बद अमलाची (पदाचा गैरवापर) माहिती शिवाजी महाराजांना समजली तेव्हा त्यांनी त्याचे हात पाय तोडून त्यास कडक शिक्षा केली असा या पत्राचा सारांश आहे.

वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी महाराजांनी पदाचा गैरवापर करून बद अमल करणाऱ्यास जी कडक शिक्षा दिली त्यावरून त्या वयात त्यांची प्रगल्भता व राजमुद्रेत कोरलेली प्रतिज्ञा त्यांनी किती विचार करून लिहिली होती व त्यातील "ही मुद्रा लोककल्याणार्थ येथे शोभत आहे!" या वाचनाचे पालन त्यांनी किती काटेकोरपणाने सुरु केले होते हे लक्षात येते.

शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा आकार अष्टकोनी असून पाच ओळींमध्ये प्रतिज्ञा कोरण्यात आली होती. मुद्रेतील जो श्लोक होता तो अनुष्टुभ छंद प्रकारातील श्लोक होता. अशा प्रकारे राजमुद्रेत लिहिलेल्या वाचनाप्रमाणेच स्वराज्य सुद्धा शत्रुंना निष्प्रभ करून प्रतिपदेच्या चंद्रा प्रमाणे हळू हळू वाढत गेले व पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे ते पूर्ण होऊन परकीय सत्तांच्या अंधारात स्वराज्याचा पूर्णचंद्र उगवला व त्याने सर्वत्र प्रकाश निर्माण केला. किती विलक्षण व गहन अर्थ आहे शिवरायांच्या या पवित्र राजमुद्रेचा!