शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य
शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात कोण प्रधान होते व त्यांची कामे काय होती याचा विचार या लेखात करू.
राज्याचा प्रचंड भार सांभाळायचा तर राज्यव्यवस्था बळकट असणे अत्यावश्यक. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला स्वराज्याचा रथ सुरळीत चालावा यासाठी प्रधान, अधिकारी, सरदार यांची अत्यंत दूरदृष्टीने निवड केली होती.
राज्यव्यवस्थेत राजाच्या खालोखाल येत असे ते प्रधान मंडळ. शिवाजी महाराजांचे प्रधान मंडळ हे आठ जणांचे असल्याने त्यास अष्टप्रधान मंडळ असे नाव होते. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात कोण प्रधान होते व त्यांची कामे काय होती याचा विचार या लेखात करू.
पेशवा अर्थात मुख्य प्रधान
मुख्य प्रधान या नावावरून समजून येते की हे पद अष्टप्रधान मंडळातले सर्वोच्च पद होते. या पदाची जबाबदारी मोरोपंत त्रिंबक पिंगळे यांच्याकडे होती. मुख्य प्रधानाचे कार्य म्हणजे राज्यकारभारात लक्ष देणे, राजपत्रावर शिक्का मारणे, सेना घेऊन युद्धप्रसंग व स्वारी करावी. जो मुलुख ताब्यात येईल त्याचा बंदोबस्त करून त्याचे रक्षण करावे.
अमात्य
अमात्याचे काम म्हणजे राज्यातील जमाखर्चाची चौकशी करणे. अमात्यांच्या हाताखाली दफ्तरदार आणि फडणवीस हे अधिकारी असायचे. फडणीशी व चिटणिशी पात्रांवर शिक्के हे अमात्यांचे असत. याशिवाय युद्धात सहभागी होणे ही कार्ये अमात्यांची असत. अमात्य नारो नीलकंठ व रामचंद्र नीलकंठ होते.
सचिव
राजपत्रांमधील मजकूर पडताळून तो गरजेनुसार कमी जास्त करणे. युद्ध प्रसंग करून जो भाग ताब्यात येईल त्याचे रक्षण करणे आणि राजपत्रावर संमत चिन्ह करणे हे काम सचिवांचे. अण्णाजी दत्तो हे सचिवपदी होते.
मंत्री
मंत्र, विचार आणि राजकारण या सर्वांचा सावधानतेने विचार करावा व निर्णयप्रकियेत सहभागी व्हावे. आमंत्रण आणि वाकनिशी मंत्र्याच्या स्वाधीन होती. युद्ध प्रसंग करून जो भाग ताब्यात येईल त्याचे रक्षण करणे आणि राजपत्रावर संमत चिन्ह करणे हे काम सुद्धा मंत्री करत असत. दत्ताजी त्रिंबक वाकनीस हे मंत्री होते.
सेनापती
सर्व सैन्याची जबाबदारी ही सेनापतीवर असून सैन्याचे रक्षण करणे, स्वारी करून युद्धप्रसंग करणे. जो प्रांत ताब्यात येईल त्याचे रक्षण करणे. फौजेच्या लोकांचे प्रतिनिधित्व करणे. सर्व फौजेचे सरदार हे सेनापतीच्या आधीन असत. सेनापती हंबीरराव मोहिते हे होते.
पंडितराव
धर्माधिकार, धर्म यांची राजकारणाशी सांगड घालण्याचे कार्य पंडितरावांचे. शिष्ट लोकांचा सत्कार करणे. आचार, व्यवहार, प्रायश्चित अशा कार्यांवर संमत चिन्ह देणे. दानधर्म, शांती, अनुष्ठान इत्यादी कार्यांची जबाबदारी पंडितराव यांच्याकडे होती. रघुनाथ पंडितराव हे दानाध्यक्ष होते.
न्यायाधीश
राज्यातील न्यायनिवाडे यांच्या देखरेखीखाली चालत. न्यायाची जी निवाडापत्रे असत त्यावर अंतिम संमती न्यायाधीशांची असे. निराजी रावजी हे स्वराज्याचे न्यायाधीश होते.
सुमंत
परराज्यातील घडामोडींवर लक्ष ठेवणे. परराज्यातील वकीलांशी बोलणी व सत्कार करणे. युद्धप्रसंग आणि राजपत्रांवर संमत चिन्ह करण्याचे काम सुमंताचे. त्रिंबकजी सोनदेव डबीर यांचे पुत्र रामचंद्र हे स्वराज्याच्या अष्टप्रधान मंडळात सुमंत होते.