पद्मावती - कविकल्पनेत गुंतलेला इतिहास

पद्मावत काव्याची भुरळ आजच्या युगातही अनेकांना पडल्याने या काव्यावर काही चित्रपट व मालिकांची निर्मिती सुद्धा झाली आहे. पद्मावत काव्य व त्यातील राणी पद्मिनी उर्फ पद्मावतीची कथा नक्की काय होती याची माहिती या लेखातून घेण्याचा प्रयत्न करू.

पद्मावती - कविकल्पनेत गुंतलेला इतिहास

भारत देशाच्या इतिहासात काही घटना अमर झाल्या आहेत. महाराणी पद्मिनी अथवा पद्मावतीची कथा सुद्धा यापैकी एक. मुळात पद्मिनीची कथा ही फक्त मलिक मुहम्मद जायसी या कवीने लिहिलेल्या पद्मावत या काव्यात वाचावयास मिळते. इतिहासकारांच्या मते पद्मिनीची कथा ही सत्यकथा असली तरी मलिक मुहम्मद जायसीने साहजिकच काव्यात कविकल्पनांचे अलंकार चढवल्याने यातील सत्य व कल्पना वेगळे करणे कठीण होऊन बसते.

पद्मावत काव्याची भुरळ आजच्या युगातही अनेकांना पडल्याने या काव्यावर काही चित्रपट व मालिकांची निर्मिती सुद्धा झाली आहे. पद्मावत काव्य व त्यातील राणी पद्मिनी उर्फ पद्मावतीची कथा नक्की काय होती याची माहिती या लेखातून घेण्याचा प्रयत्न करू.

पूर्वी सिंहलद्वीप नावाचे एक द्विपप्राय राज्य होते व तेथे गंधर्वसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता. गंधर्वसेन राजास चंपावती नावाची पट्टराणी होती. या दोघांना पद्मावती (पद्मिनी) नावाची एक अतिशय सुंदर अशी कन्या झाली. 

पद्मावतीजवळ हिरामण या नावाचा एक पोपट पक्षी होता व हा अतिशय चतुर स्वभावाचा होता. एक दिवस पिंजऱ्याचा दरवाजा चुकून उघडा राहिल्याने हिरामण पिंजऱ्यातून सटकला आणि घनदाट जंगलात विहार करीत असताना एका शिकाऱ्याच्या तावडीत सापडला.

हिरामणची हुशारी पाहून शिकाऱ्याने त्यास विकायचे ठरवले आणि त्याने हिरामण यास एका ब्राह्मणास विकले. ब्राह्मणाच्या मनातही हिरामणला विकून आणखी पैसे कमावता येतील असा विचार आला आणि त्याने त्या पोपटास मेवाड येथील राजा रत्नसिंह यास विकला.

रत्नसिंहाने ब्राह्मणास हिरामण याच्या बदल्यात तब्बल एक लाख रुपये दिले. रत्नसिंहाने हा पोपट आपल्या महाराणीस म्हणजे नागमती हिला भेट म्हणून दिला व नागमतीने त्यास आपल्या दालनातच ठेवले. एक दिवस नागमती ही शृंगार करून तयार झाली व हिरामणला तिने विचारले की या जगात माझ्याहून सुंदर कुणी आहे का? यावेळी हुशार हिरामण म्हणाला की, हंस नसले म्हणजे बगळ्यांना वाटते की आपणच हंस आहोत' यानंतर रत्नसिंह आणि नागमती यांना पोपटाच्या तोंडून पद्मावतीची माहिती मिळाली.

रत्नसिंह हा हिरामण कडून पद्मावतीचे वर्णन ऐकून घायाळ झाला व त्वरित त्याने सिंहलद्वीपास जाण्याची तयारी केली. त्याने हिरामण यास सोबत घेतले व योग्याचा वेष घेऊन तो सिंहलद्वीपास गेला. सिंहलद्वीपात गेल्यावर रत्नसिंहाने हिरामणला पद्मावतीकडे पाठवले यानंतर हिरामणने पद्मावतीस रत्नसिंहाबद्दल सांगितले व रत्नसिंह हा तुझ्यासाठी योग्य पती आहे असे तिला पटवून दिले.

एक दिवस एका मंदिरात रत्नसिंह आणि पद्मिनी यांची भेट झाली व पहिल्या नजरेतच दोघांचे एकमेकांवर प्रेम बसले. पद्मिनीचे वडील गंधर्वसेन यांनी सुद्धा स्वखुशीने दोघांचा विवाह संपन्न करून दिला. लग्न झाल्यावर रत्नसिंह व पद्मिनी काहीकाळ सिंहलद्वीपातच राहिले मात्र रत्नसिंहाची राणी नागमती रत्नसिंहाच्या विरहाने व्याकुळ झाली होती. तिने एका पक्ष्याचा वापर करून आपला संदेश सिंहलद्वीपात असलेल्या रत्नसिंहास पाठवला.

नागमतीचा निरोप मिळाल्यावर रत्नसिंह तातडीने पद्मावतीस घेऊन मेवाड येथे जाण्यास निघाला. यावेळी रस्त्यात त्यास अनेक नैसर्गिक आपतींचा सामना करावा लागला मात्र त्याने त्यावर मात करून आपले राज्य गाठले.

अशा प्रकारे मेवाडमध्ये रत्नसिंह हा नागमती व पद्मावती या दोघींसोबत सुखाने संसार करीत असताना राघवचेतन नावाचा एक ब्राह्मण ज्याला पद्मावतीच्या रूपाची कल्पना होती दिल्लीस गेला असता तेथील सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याच्या कानावर त्याने पद्मावतीच्या रूपाचे वर्णन घातले.

अल्लाउद्दीन खिलजी पद्मावतीच्या रूपाची तारीफ ऐकून तिला पाहण्यास आतुर झाला व रत्नसिंहावर हल्ला करून पद्मिणीस मिळवण्याचा चंग त्याने बांधला. यानंतर अल्लाउद्दीन खिलजीने रत्नसिंहाच्या राज्यावर हल्ला करून त्यास वेढा दिला व रत्नसिंहाने सुद्धा अल्लाउद्दीन खिलजीशी युद्ध करून उत्तम रित्या प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.

कालांतराने रत्नसिंहाची शक्ती खिलजीच्या सैन्यापुढे कमी पडू लागली यावेळी अल्लाउद्दीनने तहाच्या बोलणीत पद्मावतीची मागणी केली मात्र रत्नसिंहाने ती साफ धुडकावून लावली यानंतर अल्लाउद्दीनने वेढा आणखीनच कडक करून रत्नसिंहाच्या राज्याची रसद बंद करून टाकली.

जस जसे दिवस पुढे जात होते तस तसे अल्लाउद्दीनची सहनशक्ती संपत होती पद्मावती दिसते कशी हे तरी पहिले तरी खूप नंतर तिला प्राप्त करण्याचा विचार करता येईल असा विचार करून त्याने रत्नसिंहास फक्त एकदा पद्मावतीचे दर्शन घेण्याची इच्छा आहे असे सांगितले, यावेळीही रत्नसिंहाने त्यास धुडकावून लावले मात्र पद्मावती रत्नसिंहास म्हणाली की मला फक्त एकदा दुरून पाहण्याने जर अल्लाउद्दीन वेढा मागे घेत असेल तर तुम्ही सुद्धा विचार करावा.

नाईलाजास्तव रत्नसिंह तयार झाला मात्र अल्लाउद्दीन ला पद्मावती थेट न दाखवता त्याने एका दालनात अल्लाउद्दीनच्या समोर एक मोठा आरसा लावला व मागील बाजूस एका पडद्यामागून पद्मिनीने आपला चेहरा त्या आरशातून अल्लाउद्दीनला दाखवला.

यानंतर तरी हे युद्ध थांबेल असे सर्वांना वाटले मात्र अल्लाउद्दीन आरशात तिचे रूप पाहून थोडीच समाधान मानणार होता त्याने आता तिला प्राप्त करण्याचा निश्चय केला व एका वर्षाने रत्नसिंहाच्या राज्यावर जोरदार हल्ला केला. यावेळी रत्नसिंह आपल्या सैन्यासहित अल्लाउद्दीनच्या सैन्यावर तुटून पडला. या हल्ल्यात दोन्ही बाजुंनी खूप हानी झाली मात्र खुद्द रत्नसिंह, गोरा बादल हे रत्नसिंहाचे सामंत आणि त्याचे अगणित सैन्य मारले गेले.

रत्नसिंहाचा युद्धात पराभव झाल्याने आता आपल्यास पद्मिनी प्राप्त होईल असा समज अल्लाउद्दीन खिलजीचा झाला व त्याने किल्ल्याचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला मात्र त्याकाळच्या राजपूत स्त्रिया एकवेळ स्वतःचे प्राण देत असत मात्र अब्रू कदापिही देत नसत त्यामुळे पद्मिनीने तिच्या महिला सहकाऱ्यांसह सामूहिक जोहार केला. जोहार म्हणजे जळत्या अग्निकुंडात स्वतःस झोकून देणे. अशा प्रकारे पद्मिनीला मिळवण्याची अल्लाउद्दीनची अभिलाषा अपूर्णच राहिली व पद्मिनी तिच्या पातिव्रत्य आणि त्यागामुळे अमर झाली.