आसाम राज्याचा धार्मिक इतिहास

आसाम प्रांताची अधिष्ठात्री देवी म्हणजे कामाख्या. कामाख्या देवी ही ५१ शक्तिपीठांपैकी एक असून फक्त आसाम नव्हे तर जगभरातील शक्ती उपासकांसाठी एक पवित्र स्थान आहे.

आसाम राज्याचा धार्मिक इतिहास
कामाख्या देवी

भारताच्या ईशान्येस असलेल्या राज्यांमधील एक राज्य म्हणजे आसाम. घनदाट अरण्ये, डोंगर दऱ्या, हिरवा निसर्ग आणि एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या आसाम राज्याचा इतिहास सुद्धा तेवढाच वैभवशाली आहे.

आसामचा उल्लेख रामायण व महाभारत आदी ग्रंथांत आढळतो. प्राचीन काळी या ठिकाणी नरक नामक राजाचे राज्य होते, हा नरक राजा म्हणजे विष्णूचा एक अवतार असलेल्या वराहचा पुत्र असे म्हटले जाते.

कालिका पुराणात शोणितपूर नामक नगरीचा राजा बाण हा नरक राजाचा मित्र होता असा उल्लेख आहे. सदर शोणितपूर म्हणजे सध्याचे तेजपूर होय. नरक हा मोठा शिवभक्त असल्याने प्राचीन काळी आसाम प्रांतात शैव संप्रदायाचा प्रभाव होता. नरक राजाचा पुत्र भगदत्त याचा उल्लेख महाभारतांत आढळतो. 

भगदत्ताचा पुत्र वज्रदत्त हा सुद्धा शैव मताचा अनुयायी असल्याने शिव व शक्ती यांची उपासना आसाम मध्ये प्राचीन काळापासून रूढ झाली. बाण राजाची कन्या उषा ही देवीची भक्त होती व आपल्या उपास्य देवतेचे मंदिर तिने तेजपूर येथे निर्माण केले होते व हे मंदिर आजही या ठिकाणी पाहायला मिळते.

आसाम प्रांतातील सादिया येथे चण्डिकेचे एक पुरातन मंदिर आहे व सध्या या मंदिरास ताम्रेश्वरी असे नाव आहे. याच स्थळी श्रीकृष्णाने रुक्मिणीहरण केले असल्याचे सांगितले जाते.

आसाम प्रांताची अधिष्ठात्री देवी म्हणजे कामाख्या. कामाख्या देवी ही ५१ शक्तिपीठांपैकी एक असून फक्त आसाम नव्हे तर जगभरातील शक्ती उपासकांसाठी एक पवित्र स्थान आहे.

इसवी सनाच्या सातव्या शतकात आसाम प्रांताचे अधिपत्य कुमार भास्कर नामक राजाकडे असून तो भगदत्त राजाचा वंशज होता. तत्कालीन चिनी प्रवासी हुएन त्संग यास कुमार भास्कर राजाने आपल्या राज्यास भेट देण्याचे निमंत्रण दिले होते.

हुएन त्संग याने आसाम येथे भेट दिली त्यावेळी कामाख्या अर्थात आसाम राज्यात शैवमताचे पालन करणारे लोक असल्याचे त्याने लिहिले आहे. आसाम राज्यास प्राचीन काळी कामरूप असेही नाव होते.

इसवी सनाच्या नवव्या शतकात शंकराचार्य यांनी आसाम प्रांतास भेट देऊन तेथील प्रसिद्ध शाक्त गुरु अभिनव गुप्त यांची भेट घेतल्याचा उल्लेखही आढळतो.

इसवी सनाच्या तेराव्या शतकात ब्रह्मदेशातील अहोम लोकांनी आसामवर स्वाऱ्या करून तेथील काही लोकांवर विजय मिळवून ब्रह्मपुत्रा नदी पर्यंतचा मुलुख ताब्यात घेतला.

सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस आसाम प्रांत कोच व अहोम या दोन लोकांमध्ये विभागला गेला. पहिल्या कोच राजाने आपल्या कारकिर्दीत कामाख्या देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. बंगाल प्रांतातून अनेक ब्राह्मण आणून त्याने शक्तीची उपासना मोठ्या प्रमाणात वाढवली.

कालांतराने अहोम राजांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला. १४४९ साली शंकरदेव यांचा जन्म आसाम मध्ये झाला व शंकरदेवांना आसामचे चैतन्यदेव या नावानेही ओळखले जाई. शंकरदेवांनी आसाममध्ये वैष्णव धर्माचा प्रचार केला.