पिलाजीराव गायकवाड - मराठी साम्राज्याचे समशेर बहाद्दूर

१७२१ साली दमाजी गायकवाड यांचे निधन झाल्यावर त्यांच्या जागी पिलाजी यांची नेमणूक झाली.

पिलाजीराव गायकवाड - मराठी साम्राज्याचे समशेर बहाद्दूर
पिलाजीराव गायकवाड

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा वटवृक्ष उत्तरोत्तर वाढत जाऊन संपूर्ण भारतभर पसरला. महाराष्ट्राबाहेरील अनेक राज्यांत मराठ्यांची संस्थाने निर्माण झाली त्यापैकी एक म्हणजे बडोद्याचे गायकवाड घराणे.

बडोद्याचे गायकवाड घराण्याचे संस्थापक म्हणून दमाजी गायकवाड प्रसिद्ध असले तरी त्यांच्यानंतर गादीवर आलेले त्यांचे पुतणे पिलाजी गायकवाड यांनी सुद्धा आपल्या पराक्रमाने घराण्याचा नावलौकिक प्रस्थापित केला.

मराठी साम्राज्यात ज्या अनेक वीरांचे योगदान आहे त्यापैकी एक म्हणजे पिलाजी गायकवाड. पिलाजी गायकवाड हे जनकोजी गायकवाड यांचे पुत्र व दमाजी गायकवाड यांचे पुतणे होते.

१७२१ साली दमाजी गायकवाड यांचे निधन झाल्यावर त्यांच्या जागी पिलाजी यांची नेमणूक झाली.

कार्यभार हाती घेतल्यावर त्यांनी खानदेशातील नवापूर येथे वास्तव्य केले मात्र काही कारणांनी त्यांनी नंतर सोनगड या ठिकाणी किल्ला बांधून तेथे आपले ठाणे दिले.

पिलाजी गायकवाड यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीस सुरत वर स्वारी करून तेथील चौथाई मिळवली आणि तेथे आपला गुमास्ता ठेवला. 

१७२५ साली त्यांनी सरबुलंद याचा दारुण पराभव केला त्यामुळे सरबुलंद याने गुजरातची चौथाई आणि सरदेशमुखी बाजीराव पेशवे यांस दिली.

डभई येथे झालेल्या लढाईत पिलाजी गायकवाड यांचा पुत्र मारला गेला आणि स्वतः पिलाजीराव सुद्धा जखमी झाले.

डभई येथील लढाईनंतर यशवंतराव दाभाडे यांस सेनापती पद देण्यात आले आणि पिलाजी गायकवाड यांस मुतालिक म्हणून नेमून त्यांस समशेर बहाद्दूर हा किताब देण्यात आला. 

गुजरात मध्ये असताना तेथील अभयसिंग आणि पिलाजी यांच्या सैन्यात अनेकदा लढाया होत. अशाच एका लढाईत पिलाजी यांनी गुजरातमधील अनेक भाग जिंकले मात्र अभयसिंग याने बडोद्याच्या किल्ल्यावर विजय मिळवला.

पिलाजींचे वाढते सामर्थ्य पाहून अभयसिंगाने समोरून लढाई न करता कपटाने पिलाजींचा नाश करण्याचा निश्चय केला आणि त्यांच्याकडे आपले वकील पाठवले व एक मोठे कारस्थान रचून एका मारवाडी माणसाच्या मदतीने डाकोर येथे पिलाजी गायकवाड यांचा विश्वासघाताने खून करण्यात आला.

ही दुर्दैवी घटना १७३२ साली घडली. पिलाजी गायकवाड यांच्या शूर, धोरणी व बाणेदार स्वभावाने गायकवाड घराण्याचा उत्कर्ष होऊन हे घराणे बडोदा संस्थानाचे प्रमुख म्हणून प्रसिद्ध पावले.