पन्हाळा किल्ला - महाराष्ट्राचे दुर्गवैभव

पन्हाळा किल्ला प्रशासकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा असल्याने तो पुन्हा मिळवण्यासाठी आदिलशाही सरदार सिद्दी जौहरने पन्हाळ्यास तब्बल चार महिने वेढा घातला होता.

पन्हाळा किल्ला - महाराष्ट्राचे दुर्गवैभव

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ला म्हणजे महाराष्ट्राचे ऐतिहासिक दुर्गवैभव. 

सह्याद्रीतील एका बळकट अशा शिखरावर निर्माण करण्यात आलेला पन्हाळा किल्ला कोल्हापूर शहराच्या वायव्य दिशेस अदमासे २१ किलोमीटर अंतरावर असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून अदमासे ९५० मीटर आहे.

हा किल्ला अतिशय पुरातन असून प्राचीन काळी येथे पराशर ऋषींचे वास्तव्य होते असे म्हणतात.

करवीर माहात्म्यामध्ये या किल्ल्यास पन्नगालय असे म्हटले गेले आहे तर जुन्या लेखांत यास पद्मनाल अथवा पर्णाल अशी नावेही आढळतात. 

इसवी सनाच्या बाराव्या शतकात पन्हाळा हे शिलाहारांच्या कोल्हापूर शाखेचे राजधानीचे स्थळ होते. 

१२०९ साली देवगिरीच्या यादवांनी हा किल्ला जिंकला व पुढे बराच काळ किल्ला पाळेगारांच्या अमलाखाली होता.

कालांतराने या किल्ल्यावर बहामनी राज्याचा अमल सुरु झाला मात्र पंधराव्या शतकात हा किल्ला आदिलशाही राज्यात समाविष्ट झाला.

अफजलखान वधानंतर शिवाजी महाराजांनी काही काळाने पन्हाळा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला.

पन्हाळा किल्ला प्रशासकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा असल्याने तो पुन्हा मिळवण्यासाठी आदिलशाही सरदार सिद्दी जौहरने पन्हाळ्यास तब्बल चार महिने वेढा घातला होता. या वेढ्यातून महाराज सुखरूप बाहेर पडावेत म्हणून मराठ्यांनी जीवाचे रान केले व या शौर्याचे प्रतीक म्हणून बाजी प्रभू देशपांडे व शिवा काशीद यांची यथोचित स्मारके या परिसरात उभारण्यात आली आहेत.

किल्ल्याचा घेरा चार मैलांहून अधिक आहे. किल्ल्याच्या एका बाजूस ५० फूट तुटलेला कडा असल्याने या बाजूस गरजेनुसार तटबंदी करण्यात आली होती  मात्र दुसऱ्या बाजूस १५ ते ३७ फूट रुंदीचा भक्कम व उंच असा दगडी तट बांधलेला असून त्यास अनेक बुरुज आहेत.

पूर्वी किल्ल्यास एकूण तीन भक्कम दरवाजे होते मात्र सध्या फक्त एकच दरवाजा शाबूत आहे. 

किल्ल्याचे एकूण दोन भाग असून शिखरावरील भाग हा किल्ले पन्हाळा  म्हणून ओळखला जातो तर दुसऱ्या भागात रविवार, मंगळवार, गुरुवार व इब्राहीमपूर या नावाच्या पेठा आहेत. 
पन्हाळा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने किल्ल्याच्या आसमंतात मोठी एक मोठे शहर वसलेलं आहे.

किल्ल्यात साधोबा व सोमाल नामक दोन तळी असून पूर्वी त्यांच्याद्वारे किल्ल्यातील रहिवाशांना पाण्याचा पुरवठा होत असे याशिवाय किल्ल्यात शृंगारबाव आणि अंधारबाव नामक दोन विहिरी सुद्धा आहेत.

किल्यात विपुल बांधकामे असून बालेकिल्ला, महाराजांचा राजवाडा, अंबारखाना, तीन दरवाजा,  गंगा, जमुना व सरस्वती नावाच्या कोठ्या, धर्मकोठी, कलावंतिण महाल, कचेरी, सज्जेकोठी, तालिमखाना, रेडे महाल, रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी, कोल्हापूरच्या संभाजी राजाचे देऊळ, सदोबा देवालय, शिलालेख, पराशर गुहा, काली बुरुज, अंधारबाव, कापूरबाव, महालक्ष्मी मंदिर, संध्याबाग, शाहू महाराजांनी बांधलेले शिवाजी महाराजांचें मंदिर, मंदिर परिसरातील बावीस गुहा, वाघ दरवाजा, चोर दरवाजा, बाजीप्रभू बुरुज, दुतोंडी बुरुज, दौलती बुरुज, राजदिंडी अशी विपुल पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.

पन्हाळा किल्ल्यावर प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत अनेक राजवटी नांदल्या व त्या पाऊलखुणा आजही या किल्ल्यावर पाहावयास मिळतात त्यामुळे हा किल्ला एकदा तरी अनुभवणे गरजेचे आहे.