किल्ले कुर्डुगड उर्फ विश्रामगड

रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यात माणगावच्या ईशान्येस सुमारे २१ कि.मी. अंतरावरील सह्याद्रीच्या एका अलग झालेल्या समुद्रसपाटीपासून सुमारे ६१० मी. उंच शृंगावर हा किल्ला आहे.

किल्ले कुर्डुगड उर्फ विश्रामगड
किल्ले कुर्डुगड उर्फ विश्रामगड

सह्याद्री डोंगररांगांमुळे महाराष्ट्राचे कोकण किनारपट्टी सह्याद्रीची रांग व त्यावरील पठार किंवा घाटमाथा असे तीन भाग पडले आहेत. येथील राज्यकर्त्यांचा प्राचीन काळापासून परदेशाशी व्यापार चाले. कोकण किनारपट्टीवर उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटमाथ्यावरील बाजारपेठांमध्ये जात असे. त्यामुळे या परिसरात संपन्न बंदरे, शहरे, बाजारपेठा तयार झाल्या. त्याकाळी वापरण्यात येणारी शिडांची गलबते समुद्रातून खाडी मार्गे नदीत आतपर्यंत येत. भिर्‍याला ऊगम पावणारी कुंडलिका नदी अरबी समुद्राला कोर्लई जवळ मिळते. प्राचीन काळा पासून कुंडलिका नदीतून व्यापार चालत असे. घाटावर जाणारा माल विविध (ताम्हिणी, थळ घाट इत्यादी) घाटमार्गांनी घाटमाथ्यावरील बाजारपेठेत जात असे. या व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदर, घाटमार्ग व घाटमाथा अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे. ताम्हिणी घाटाचे रक्षण करण्यासाठी कुर्डुगड (विश्रामगड) हा किल्ला बांधण्यात आला होता.

रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यात माणगावच्या ईशान्येस सुमारे २१ कि.मी. अंतरावरील सह्याद्रीच्या एका अलग झालेल्या समुद्रसपाटीपासून सुमारे ६१० मी. उंच शृंगावर हा किल्ला आहे. तो पंत सचिवांच्या भोर संस्थानात जाणाऱ्या देव खिंडीच्या वर आहे. जवळील कुर्डाई नामक देवीच्या मंदिरामुळे याला कुर्डू असेही म्हणतात.

या माणगाव तालुक्यामधे एका अनगड ठिकाणी कुर्डूगडाचा किल्ला दबा धरुन बसलेला आहे. फारसा परिचित नसलेला कुर्डूगड मोसे खोर्‍यातील पासलकर या शिवकालीन घराण्याच्या अखत्यारीत होता. पासलकर घराण्यातील बाजी पासलकर हे शिवाजीराजांचे समकालीन आणि सहकारी होते. बाजी पासलकर कुर्डूगडाचा उपयोग विश्रांतीसाठी करीत म्हणून या गडाला विश्रामगड असेही म्हणतात.

कुर्डुगड ऊर्फ विश्रामगड किल्ला रायगड व पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर रायगड जिल्ह्यात आहे. निजामपूरच्या ईशान्येस असलेल्या १३ कि.मी.वरील जिते खेडय़ातून किल्ल्यावर बैलगाडीने जाता येत असे. परंतु २६ जुलै २००६च्या प्रलयंकारी पावसाने कुर्डुगडाच्या मुख्य वाटेवरील संपूर्ण डोंगर खचून वाहून गेल्यामुळे हा रस्ता बंद झाला असून आता माणगाव-निजामपूर-शिरवली असे एसटीने येऊन शिरवलीहून पायी पाच कि.मी. उंबडेपर्यंत यावे लागते. उंबर्डेहून कुर्डू पेठ दोन तीन कि.मी. अंतरावर आहे. कुर्डू पेठहून या गडावर जायला पायवाट आहे. कुर्डू पेठ ही पंधरा वीस घरांची वाडी पार केल्यावर काही मिनिटात गडमाथ्यावरील कुर्डाईदेवीचे मंदिर लागते. पायथ्यापासून काही मिनिटात गडाच्या कातळकडय़ात असलेले पाण्याने काठोकाठ भरलेले खोदीव पाण्याचे टाके आहे. या टाक्याजवळून एक चढण चढून गडाच्या सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचता येते. येथे येताना वाटेत एक बुरूज, तटबंदीचे अवशेष व कातळात खोदून काढलेला गडाचा भग्न प्रवेशद्वाराचा मार्ग हे दुर्गावशेष पाहावयास मिळतात.

गडावरील उत्तर टोकावर हनुमान बुरूज असून येथे उघडय़ावर कोरीव मिशा, कमरेला खंजीरआणि पायाखाली दैत्याला चिरडणारं मारुतीचं उघड्यावरच ठेवलेलं शिल्प दिसतं. सुरगड, रसाळगड इत्यादी किल्ल्यांवरही अशाच प्रकारची मारुतीची शिल्पं दगडात कोरलेली आहेत. शेजारीच गडाच्या सुळक्याच्या पोटात ५०० माणसे सहज बसू शकतील एवढी मोठी निसर्गनिर्मित गुहा आहे. गडाच्या पिछाडीस म्हणजे पूर्व बाजूस एक उत्तम बांधणीचा बुरूज असून बुरुजाखाली प्रचंड खोल दरी असल्याने या बुरुजास स्थानिक लोक कडेलोटाचा बुरूज असे म्हणतात. मुख्य सुळक्याला लागून एक लहानसा सुळका आहे. किल्ला अतिशय लहान (२१.३३ मी. बाय ११.५८ मी.) असून त्याची पडझड झालेली आहे.  इथे एक नैसर्गिक खिडकी आहे. त्या खिडकीतून बाहेर पाहिलं की, सह्यकडे हातात हात घालून उभे राहिलेले दिसतात! या डोंगरी किल्ल्याच्या तीन बाजू नैसर्गिक उभ्या कडय़ाच्या असल्याने त्यास नैसर्गिक संरक्षण प्राप्त झाले आहे. पूर्वेस फक्त ८.५३ मीटर उंचीची तटबंदी आहे. किल्ल्याची चहूबाजूची तटबंदी ३ मी. उंच आहे. गडाचा दरवाजा नैऋत्येस असून १.५ मी. रुंद आहे. किल्ल्याला ४.३५ मी. उंच असे चार बुरूज आहेत. पूर्वेकडील बुरुजास लागून असलेली तटभिंत ३ मी. रुंद (जाड) आहे. किल्ल्यात खडकात खोदलेली तीन पाण्याची टाकी आहेत. त्याशिवाय खडकात खोदलेली धान्यकोठारेही आहेत. दक्षिण बाजूच्या अगदी कोप-यावर किल्ल्यापेक्षा ३० मी. उंचीवर एक आता चढता येणार नाही, अशी लहानशी चौकोनी खोली आहे.

पुरंदर तहानुसार मुघलांना द्यावे लागलेले किल्ले स्वराज्यात दाखल करून घेण्याची मोहीम शिवाजी महाराजांनी १६७० मध्ये आखल्यानंतर जूनमध्ये माहुलीगड जिंकल्यानंतर कर्नाळा, कोहोज व कुर्डुगडही स्वराज्यात दाखल करून घेतले. मराठी काळात शिबंदी ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होई. कुर्डू हे मराठा सरदार येसाजी कंक यांचे गावं व त्यांच्याच ताब्यात हा किल्ला होता. इतिहासात या किल्ल्याविषयी एक महत्त्वपूर्ण आख्यायिका आहे. कुर्डुगडाच्या दक्षिण भागात खूप उंचावर एक घळ आहे. सध्या या घळीतील वर जाण्याचा मार्ग तुटला आहे. या घळीत एक तपस्वी साधू राहात होते. त्यांचेकडे एक शिवलिंग बाण होता. त्याची बारा वर्षे (एक तप) अखंड पूजा करणाऱ्यास राज्यप्राप्ती होईल, अशी श्रद्धा असल्याचे समजल्याने वीर बाजी पासलकराने तो बाण मिळविला व शिवरायांना नजर केला. पुढे शिवरायांना राज्यप्राप्ती झाली. शिवरायांच्या निधनानंतर हा बाण राजाराम महाराजांच्या बरोबर सिंहगडावर आणला गेला व त्यांच्या मृत्यूनंतर तो राजाराम महाराजांच्या सिंहगडावरील समाधी मंदिरात तब्बल २५० वर्षे होता. इतिहासात ‘चंद्रशेखर बाण’ या नावाने प्रसिद्ध असलेले हे शिवलिंग साताऱ्याच्या जलमंदिरात पूजेसाठी ठेवले आहे.

या गडाशी वीर बाजी पासलकर, येसाजी कंक, बाजींचे विश्वासू सेवक येल्या मांग, बाजींचे आश्रित अनंता खुरसुले, जंजिऱ्याचा सिद्दी, थोरले बाजीराव, खंडोजी माणकर, अमृता पासलकर, नाना फडणीस, रामाजी कारखानीस यांचा संबंध काही ना काही कारणांनी आला आहे. १८१८ च्या मराठा युद्धात पुण्याच्या ९व्या रेजिमेंटमधील कॅप्टन सॉपीटने एका तुकडीसह देव खिंडीतून येऊन अचानक हल्ला करून हा किल्ला काबीज केला. त्यावेळी किल्ल्यावर किल्लेदार व ४० जणांची शिबंदी होती. त्यावेळी सॉपीटला किल्ल्यावर मोठा धान्यसाठा सापडला. कुर्डादेवी मंदिरापासून ५ मिनिटांवर झाडीत असलेल्या कुर्डेश्वर मंदिरात पार्वती, विष्णू, गणेश व इतर देवता मूर्ती, शिवलिंग, नंदी व कासव मूर्तीचे अवशेष दिसून येतात.

जिल्हा :- रायगड
किल्ल्याचा प्रकार :- गिरीदुर्ग
डोंगररांग :- ताम्हणी घाट
राहाण्याची सोय :- किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :- जेवणाची सोय स्वत: करावी.
पाण्याची सोय :- किल्ल्यावर बारामही पिण्याच्या पाण्याची टाकी आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :- जिते गावातून दीड ते दोन तास आणि हुंबर्डी गावतावून एक ते दीड तास लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :- सप्टेंबर ते मार्च.
सूचना :- रोप (४० फ़ुटी) बरोबर बाळगावा.

- टीम कुर्डुगड, रायगड