सातवाहन घराण्याचा इतिहास

सातवाहन साम्राज्याचा संस्थापक म्हणून सिमुक (श्रीमुख) याचे नाव प्रख्यात आहे. सिमुक हा चंद्रगुप्त मौर्याचा समकालीन असून त्याकाळी त्याच्या राज्यात भक्कम तटबंदी असलेली तीस शहरे होती आणि त्याच्या सैन्यात एक लाख पायदळ, दोन हजार घोडदळ आणि एक हजार हत्ती होते व त्याची राजधानी ही कृष्णानदीच्या काठावरील श्रीकाकूलं नामक शहर होती.

सातवाहन घराण्याचा इतिहास
सातवाहन घराण्याचा इतिहास

महाराष्ट्रातील आद्य राजवंश म्हणून सातवाहन वंश प्रख्यात आहे. सातवाहन वंशाचा इतिहास हा इसवीसन पूर्व २२६ पर्यंत मागे जातो. त्याकाळी मौर्य साम्राज्य संपूर्ण भारतभर पसरले होते व सातवाहन हे सुरुवातीस मौर्यांचे मंडलिक म्हणून कार्य करीत होते. सातवाहन साम्राज्यास शालिवाहन, आंध्र अथवा आंध्रभृत्य या नावाने सुद्धा ओळखले जाते कारण त्यांचे राज्य प्रामुख्याने महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या राज्यांत पसरले होते व यापेक्षाही इतर प्रातांतील प्रदेश त्यांच्या ताब्यात होता.

सातवाहन साम्राज्याचा संस्थापक म्हणून सिमुक (श्रीमुख) याचे नाव प्रख्यात आहे. सिमुक हा चंद्रगुप्त मौर्याचा समकालीन असून त्याकाळी त्याच्या राज्यात भक्कम तटबंदी असलेली तीस शहरे होती आणि त्याच्या सैन्यात एक लाख पायदळ, दोन हजार घोडदळ आणि एक हजार हत्ती होते व त्याची राजधानी ही कृष्णानदीच्या काठावरील श्रीकाकूलं नामक शहर होती.

मौर्य साम्राज्याचा शक्तिशाली सम्राट अशोक याच्या मृत्यूनंतर सातवाहनांनी स्वतःस स्वतंत्र घोषित केले. सातवाहनांचा द्वितीय राजा कृष्ण याने आपले साम्राज्य नाशिकपर्यंत वाढवले. याच कालावधीत सातवाहनांकडून कण्व साम्राज्यातील सुशर्मा या राजास नेस्तनाबूत करून कण्व साम्राज्य सुद्धा सातवाहन साम्राज्यास जोडण्यात आल्याचा उल्लेख सापडतो.

पुढे हाल सातवाहन हा सम्राट झाला. हाल सातवाहन हा एक उत्तम कवी होता व त्याने गाथा सप्तशती अथवा गाथा सत्तसई हा प्राकृत भाषेतील उत्तम ग्रंथ लिहिला जो मराठीतील आद्य ग्रंथ मानला जातो.

सातवाहन साम्राज्यातील सर्वात प्रख्यात सम्राट म्हणून गौतमीपुत्र सातकर्णी याचे नाव घेतले जाते. त्याकाळी भूम क्षहारात क्षत्रप हा राजा प्रबळ होता याच वंशात नहपान हा राजा सुद्धा झाला. क्षत्रप हे सुरुवातीस पार्थियन राजांचे मंडलिक होते व त्यांचे राज्य दक्षिण राजस्थानपासून महाराष्ट्रातील पुणे नाशिक इत्यादी जिल्ह्यांपर्यंत पसरले होते. गुजरातमधील काठेवाड (सौराष्ट्र) प्रांताचा सुद्धा त्यांच्या राज्यात समावेश होत असे. क्षत्रप हे कुशाण राजवंशाचे मंडलिक सुद्धा होते असे इतिहासकारांचे मत आहे. गौतमीपुत्राने भारताच्या पश्चिम दिशेस स्थापित झालेली परकीय शक व क्षत्रप आदींची राज्ये पराभूत करून स्वतःच्या नावे कालगणना सुरु झाली ज्यास शालिवाहन शक या नावाने ओळखले जाते व या कालगणनेचे आजही समस्त मराठी जनतेकडून पालन केले जाते.

गौतमीपुत्र सातकर्णी याचा पुत्र वशिष्ठिपुत्र श्रीपुलुमायी हा सुद्धा वडिलांसारखाच पराक्रमी होता. त्याचे लग्न उज्जैन येथील क्षत्रप राजा रुद्रदाम याच्या कन्येशी झाले होते. कालांतराने वशिष्ठिपुत्र श्रीपुलुमायी व रुद्रदाम यांच्यात काही मतभेद उत्पन्न झाले व युद्ध होऊन त्यात रुद्रदाम विजयी झाला. यानंतर त्याने क्षहरात क्षत्रपाचा सातवाहनांनी जिंकलेला प्रांत ताब्यात घेतला कारण रुद्रदाम हा चष्ट्न नामक क्षत्रपाचा नातू होता.

वशिष्ठिपुत्र श्रीपुलुमायी यांच्यानंतर गौतमीपुत्र यज्ञश्री हा राजा झाला व त्याने २९ वर्षे राज्य केले. त्याने रुद्रदामने सातवाहनांकडून बळकावलेला प्रदेश पुन्हा सातवाहन राज्यास जोडला होता. यानंतर विजय, चंद्रश्री, पुलुमायी (चौथा) अशा राजांची नावे सातवाहन वंशात आढळतात. इसवी सन २२५ मध्ये सातवाहन साम्राज्याचा अस्त झाला. सातवाहन काळात महाराष्ट्राची खऱ्याअर्थी भरभराट झाली.