छत्रपती शाहू महाराजांना 'शाहू' हे नाव कसे मिळाले?

शाहू महाराजांचे पाळण्यातील नाव शिवाजी असे असताना त्यांना शाहू हे नाव कसे पडले याबद्दल तत्कालीन साधनांत लिखाण करण्यात आले आहे मात्र या पलीकडे जाऊन शाहू महाराजांना शाहू हे नाव कसे मिळाले याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू.

छत्रपती शाहू महाराजांना 'शाहू' हे नाव कसे मिळाले?

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू व स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर झाले. शाहू महाराजांचा जन्म रायगड जिल्ह्यातील गांगोली (गांगवली) या गावी १६८२ साली झाला.

शाहू महाराजांचे पाळण्यातील नाव हे शिवाजी असेच होते कारण त्याकाळी व अगदी गेल्या काही वर्षांपर्यंत जन्मास येणाऱ्या बालकांचे घराण्यातील पूर्वजांच्या नावे नामकरण करण्यात येत असे व छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन १६८० साली झाल्याने १६८२ साली जन्मलेल्या आपल्या पुत्रास आपल्या प्रिय वडिलांचे नाव छत्रपती संभाजी महाराजांनी दिले होते.

शाहू महाराजांचे पाळण्यातील नाव शिवाजी असे असताना त्यांना शाहू हे नाव कसे पडले याबद्दल तत्कालीन साधनांत लिखाण करण्यात आले आहे मात्र या पलीकडे जाऊन शाहू महाराजांना शाहू हे नाव कसे मिळाले याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू.

शाहू नावाबद्दल एक प्रवाद असा केला जातो की ज्यावेळी मोगल सरदार जुल्फिकार खान याने राजधानी रायगड ताब्यात घेतली त्यावेळी राजपुत्र शाहू, महाराणी येसूबाई यांच्यासहित जोत्याजी केसरकर, मोरोपंत सबनीस, उद्धव योगदेव इत्यादी मंडळींना अटक केले व त्यांना मोगल बादशाह औरंगजेब याच्या कडे रवाना करण्यात आले.

यावेळी लहानग्या शाहू राजांना जेव्हा औरंगजेबासमोर आणण्यात आले तेव्हा त्यांचे राजबिंडे रूप पाहून औरंगजेब प्रभावित झाला व म्हणाला की, इतर सर्व राजे 'चोर' आणि हाच काय तो 'साव' यानंतर औरंगजेब हा शाहू राजांना 'साव' या नावानेच उल्लेखू लागला व 'साव' या शब्दावरून 'शाहू' असा अपभ्रंश झाला. आणि हेच नाव पुढेही कायम राहिले. (छ.थो.शा.म.च.) 

'साव' या शब्दाचा अर्थ सच्चा या अर्थी वापरला गेला आहे. शाहू महाराजांचे नाव हे शिवाजी वरून शाहू पाडण्याचे हेच कारण जुन्या साधनांत फक्त शब्दांचा फरक सोडला तर पाहावयास मिळते.

मात्र या लेखात आपण या नावामागील आणखी एक शक्यता मांडण्याचा प्रयत्न करू, शाहू हे नामकरण औरंगजेबाने केले हे स्पष्टच असल्याने या निष्कर्षाचा अभ्यास करण्यासाठी औरंगजेबाच्या कारकिर्दीत काही काळ मागे जावे लागेल.

१६३६ साली शाहजादा औरंगजेबाची बादशाह शाहजहान याने दक्षिणेचा सुभेदार म्हणून नेमणूक केली. या काळात त्याचा दक्षिणेच्या राजकारणाशी जवळून संबंध आला. शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज हे दक्षिणेच्या राजकारणातील एक मोठे नाव असल्याने साहजिकच औरंगजेब शहाजी महाराजांना जाणून होता.

निजामशाही राज्य कमकुवत झाल्यावर शहाजी महाराजांनी गादीवर नामधारी सुलतान बसवून निजामशाहीची सर्व सूत्रे आपल्या हाती घेऊन बलाढ्य अशा मोगल व आदिलशाहाविरोधात लढा दिला असल्याने खुद्द औरंगजेबाचे वडील शाहजहान हे सुद्धा शहाजी महाराजांना चांगलेच ओळखून होते.

औरंगजेब हा शहाजी महाराजांना सुद्धा 'शाहू' या नावानेच उल्लेखित असे याचा पुरावा देणारी अनेक पत्रे उपलब्ध आहेत मात्र खालील एका पत्रावरून औरंगजेब हा शहाजी महाराजांना शाहू या नावाने उल्लेखित असे याचे प्रत्यंतर येते.

हे पत्र १६५७ सालच्या एप्रिल महिन्यातील असून ते औरंगजेबाने त्याच्या अधिकाऱ्यास लिहिले होते. पत्राचा सारांश म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या वकिलामार्फत औरंगजेबाकडे एक संदेश पाठवला होता ज्यानुसार आदिलशहाच्या मुलुखातील शिवाजी महाराजांनी जिंकलेला प्रदेश जर त्यांच्याकडेच ठेवण्यात आला तर आदिलशाहाचे आणखी काही प्रांत घेण्यास मी मदत करेन असा प्रस्ताव होता त्यानुसार औरंगजेबाने या प्रस्तावाची माहिती त्याच्या अधिकाऱ्यास कळवली होती आणि शिवाजी महाराजांच्या या प्रस्तावामागे काही डावपेच तर नाहीत ना हे पाहावयास सांगितले होते. त्या पत्रातील काही अंश पुढीलप्रमाणे

"शाहूच्या मुलाने (शिवाजी महाराज) या दरबाराकडे एका वकिलामार्फत असे विनंतीपत्र पाठवले आहे की विजापूरकरांच्या (आदिलशहाच्या) मुलुखांपैकी जो प्रांत माझ्या ताब्यात आहे तो मजकडे ठेवून जर मला मनसब देण्यात आली तर मी तो प्रांत बादशाही राज्यास देईन" (शि.प.सा.सं.)

या पत्राच्या संबंधाने छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मुसद्दीपणा दाखवला आहे तो एक वेगळ्या अभ्यासाचा विषय आहे मात्र या लेखाच्या विषयास अनुसरून औरंगजेब हा शहाजी महाराजांचा शाहू या नावाने उल्लेख करीत असे हे स्पष्ट दिसून येते.

त्यामुळे औरंगबेजाच्या पत्रातील शहाजी महाराजांचा शाहू हा उल्लेख वाचून असा निष्कर्ष काढता येतो की, ज्यावेळी शहाजी महाराजांचे पणतू शाहू महाराज यांना औरंगजेबाने प्रथम पहिले त्यावेळी शाहू महाराजांमध्ये त्यास शहाजी महाराजांचे रूप दिसले असावे व त्यामुळेच त्याने त्यांना शाहू या नावानेच हाक मारणे सुरु केले असावे. तसेच जसे शिवाजी या शब्दाचे लघुरूप 'शिव', संभाजी या शब्दाचे लघुरूप 'शंभू', तसेच शहाजी या शब्दाचे लघुरूप 'शाहू' असे होऊ शकते त्यामुळे या शक्यतेचाही विचार करावयास हवा.