कृष्णाकुमारी - मेवाडची राजकन्या
कृष्णाकुमारी हिच्याशी विवाह करण्यासाठी जरी अनेक राजपूत राजांमध्ये वाद सुरु झाले असले तरी त्यामध्ये अग्रणी होते ते म्हणजे जोधपूरचा मानसिंग आणि जयपूरचा जगतसिंग.

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
भारताच्या इतिहासात आजतागायत ज्या शोकांतिका घडल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे राजकुमारी कृष्णाकुमारी कथा. कृष्णाकुमारी ही मेवाडच्या प्रसिद्ध राजघराण्यातील कन्या असून तिच्या वडिलांचे नाव भीमसिंग राणा असे होते.
कृष्णाकुमारी हिचा जन्म १७९४ या वर्षातील असून ती अतिशय रूपवान असल्याने तिच्या रूपाची कीर्ती संपूर्ण राजपुतान्यात पसरली होती.
कृष्णाकुमारी विवाहयोग्य झाली त्यावेळी अनेक राजपूत राजांमध्ये तिला प्राप्त करण्यासाठी चढाओढ लागली होती कारण प्रत्येकास ती आपली पत्नी म्हणून हवी होती.
कृष्णाकुमारी हिच्याशी विवाह करण्यासाठी जरी अनेक राजपूत राजांमध्ये वाद सुरु झाले असले तरी त्यामध्ये अग्रणी होते ते म्हणजे जोधपूरचा मानसिंग आणि जयपूरचा जगतसिंग.
हा वाद इतका पुढे गेला की जोधपूर आणि जयपूर या दोन राज्यांमध्ये लढाईची परिस्थिती निर्माण झाली.
या लढाईमध्ये मानसिंग याने शिंदे घराण्याकडे मदत मागितली आणि शिंदे यांनी मेवाड येथे येऊन आपला तळ दिला.
हे समजल्यावर कृष्णाकुमारीचा पिता भीमसिंग याने जयपूरच्या जगतसिंगाशी केलेला करार मोडला मात्र याचवेळी जगतसिंग याने सुद्धा मेवाडवर स्वारी करण्याची तयारी केल्याने मेवाडचा राजा भीमसिंग मोठ्या अडचणीत सापडला.
जोधपूरच्या मानसिंग तर्फे मेवाडवर स्वारीसाठी आलेल्या शिंदे यांनी आमिरखान याची या मोहिमेवर निवड केली होती.
आमीरखानचा दरारा त्याकाळी मोठा होता मात्र भीमसिंग दाद देत नाही हे पाहून आमिरखान याने भीमसिंगास निर्वाणीचा इशारा पाठवला की, आपली कन्या कृष्णा कुमारी हिचा विवाह एकतर मानसिंगाशी तरी लावून द्या नाहीतरी तिला ठार तरी मारा.
भीमसिंगाने ही गोष्ट कृष्णाकुमारीस सांगितली व एकाचवेळी जयपूर आणि जोधपूर येथील सैन्य मेवाडवर हल्ला करणार असून या हल्लयात आपला निभाव लागणे कठीण आहे असेही त्याने आपल्या कन्येस सांगितले.
यावेळी अत्यंत स्वाभिमानी अशी कृष्णा कुमारी पराभूत होऊन शत्रूंच्या हाती लागण्याऐवजी स्वतःहून मरण पत्करण्यास तयार झाली.
अत्यंत जड मनाने भीमसिंग आपली कन्या कृष्णाकुमारी हिला मारण्यास तयार झाला मात्र राजकन्येस मारण्याचे कठोर कार्य कुणीही तयार करण्यास धजेनासे झाले.
शेवटी भीमसिंगने आपला पुत्र आणि कृष्णाकुमारी हिचा बंधू जवानदास यास कृष्णाकुमारी हिला मारावयास सांगितले व जवानदास हातात खंजीर घेऊन कृष्णाकुमारी जवळ आला मात्र आपल्या बहिणीचे निरागस रूप पाहून त्याच्या हातूनही खंजीर गळून खाली पडला.
शेवटी भीमसिंगाकडे विषप्रयोगाचा अखेरचा उपाय शिल्लक राहिला व त्याने कृष्णा कुमारीची आई चंदाबाई हिच्या हाती विषाने भरलेले पेले कृष्णा कुमारी हिला पिण्यास पाठवले.
आपले राज्य आणि अब्रू वाचवणे असेल तर मरण स्वीकारणे हा एकमेव पर्याय आहे हे समजून कृष्णा कुमारी हिने स्वतःहून मृत्यूस कवटाळण्याचे ठरविले.
कृष्णा कुमारी हिने स्वतःच्या हाताने विषाने भरलेले पेय प्राशन केले मात्र ते विष एक नव्हे तर तीन वेळा उलटून बाहेर पडले त्यामुळे अखेरीस अफूचे सेवन करवून कृष्णा कुमारी हिने मृत्यूस जवळ केले.
ही दुर्दैवी घटना २१ जुलै १८१० साली घडली. मेवाडच्या इतिहासातील हा एक काळा दिवस होता आणि यानंतर थोड्याच काळाने दुःखावेगाने कृष्णा कुमारी हिची आई चंदाबाई हिचा अन्नत्यागामुळे मृत्यू झाला आणि काही दिवसांतच मेवाडच्या उत्कर्षास उतरती कळा लागली.
आपल्या घराण्याच्या व राज्याच्या रक्षणासाठी अत्यंत कमी वयात मृत्यूस कवटाळणारी कृष्णाकुमारी आजही तिच्या त्यागासाठी अनेकांना वंदनीय आहे.