राणा कुंभ - मेवाडचा प्रसिद्ध शासक
राणा कुंभच्या काळात मेवाड राज्य अतिशय उर्जितावस्थेत होते. राणा कुंभ हा एक पराक्रमी सेनानी होताच मात्र याशिवाय त्याच्याकडे उत्तम प्रशासकाचे गुण सुद्धा होते.
अखिल भारतात जे कर्तृत्ववान क्षत्रिय पुरुष झाले त्यापैकी एक म्हणजे राणा कुंभ. राणा कुंभचा जन्म मेवाडच्या सिसोदिया या राजपूत वंशात झाला असून त्याच्या वडिलांचे नाव मोकलसिंह असे होते.
१४३३ साली राणा कुंभचे वडील मोकलसिंह यांचा खून झाल्यावर राणा कुंभने मेवाडचा महाराणा म्हणून कार्यभार हाती घेतला. १४३३ साली आपल्या कारकिर्दीची सुरुवात करून पुढील सात वर्षांत म्हणजे १४३९ सालापर्यंत कुंभ ने आपल्या सर्व शत्रूंचा नायनाट करून संपूर्ण राजस्थानवर अमल प्राप्त केला.
माळव्याचा सुलतान महंमद खिलजी व राणा कुंभ यांच्यात जे युद्ध झाले त्यामध्ये महंमद खिलजी राणा कुंभच्या हाती सापडला मात्र राणा कुंभने त्यास दया दाखवून व एकही रुपया खंडणी न घेता सोडून दिले.
कालांतराने माळवा आणि गुजरात येथील सुलतानांनी युती करून मेवाडवर पुन्हा एकदा आक्रमण केले मात्र राणा कुंभने दोन्ही सुलतानांचा दारुण पराभव केला आणि या विजयाचे स्मारक म्हणून चितोडगडावर विजयस्तंभ उभारला.
दिल्लीच्या मुघल सत्तेवर हल्ला करून बादशाही मुलुख मेवाडच्या राज्यात सामील केल्याने राणा कुंभ यास हिंदूसूरस्त्राण अर्थात हिंदू सुलतान अशी पदवी मुस्लिम लोकांनी दिली होती.
राणा कुंभ हा प्रखर धर्माभिमानी असल्याने व त्याकाळी परकीय राजवटींकडून हिंदूंवर जो अन्याय होत असे त्याचा पुरेपूर बदल राणा कुंभ याने आपल्या कारकिर्दीत घेतला. चितोडगडावर राणा कुंभाचा कीर्ती स्तंभ आहे त्यामध्ये जी प्रशस्ती लिहिली आहे त्यामध्ये राणा कुंभच्या पराक्रमाचे यथोचित वर्णन आहे.
राणा कुंभच्या काळात मेवाड राज्य अतिशय उर्जितावस्थेत होते. राणा कुंभ हा एक पराक्रमी सेनानी होताच मात्र याशिवाय त्याच्याकडे उत्तम प्रशासकाचे गुण सुद्धा होते. वेद, पुराणे, स्मृती, दर्शने, व्याकरण आदी विषयांचे त्यास उत्तम ज्ञान होते. तो स्वतः कवी असून त्यास संगीताचे ज्ञान सुद्धा होते. राणा कुंभास संस्कृत, मराठी, कन्नड इत्यादी भाषांचे सुद्धा उत्तम असे ज्ञान होते.
चंडीशतक आणि गीतगोविंद या ग्रंथावर राणा कुंभ याने उत्तम टीका लिहिल्या होत्या. संगीतराज आणि संगीतमीमांसा हे दोन ग्रंथ त्याने लिहिले होते.
राणा कुंभ याने कृषी, व्यापार, कला, उद्योग, विद्या आदींना राजाश्रय दिला. राणा कुंभ हा इतिहास अभ्यासक सुद्धा असून त्याने जुळ्या काळातील अभिलेख आणि दानपत्रे यांचा अभ्यास करून गुहिल राजवंशाची वंशावळ शुद्ध करण्याचा प्रयत्न केला होता.
स्थापत्यशास्त्रातही राणा कुंभने भरीव कामगिरी केली होती. त्याने मेवाड प्रांतात एकूण बत्तीस किल्ल्यांची उभारणी केली. याशिवाय पाण्याचे तलाव आणि भुईकोट सुद्धा निर्माण केले. चितोडगडावरील विजयस्तंभ, कुंभास्वामी आणि एकलिंगजी यांची मंदिरे त्याने बांधली. अबूच्या पहाडावरील कुंभश्याम आणि सद्री घाटातील ऋषभदेव हि मंदिरे सुद्धा त्यानेच निर्माण केली.
अबू पहाडावर कुंभने जो किल्ला बांधला आहे तेथील एका मंदिरात राणा कुंभाची तांब्याची मूर्ती आहे व आजही लोक तिची मनोभावे पूजा करतात यावरून राणा कुंभाची लोकप्रियता समजून येते.
इतिहास अभ्यासकांच्या मते राणा कुंभकडे बाप्पा रावळ याचा पराक्रम, हम्मीर याची धडाडी, लाखा राण्याची कलाप्रियता, चुडाचा मुसद्दीपणा हे सर्व गुण एकवटले होते. १४६८ साली वार्धक्याने राणा कुंभाची मनःस्थिती कमकुवत झाली व त्यास उन्माद विकार जडल्याने त्याचा ज्येष्ठ पुत्र उदयसिंह याने राणा कुंभाचा वध केला आणि मेवाडचा एक पराक्रमी आणि लोकप्रिय राजा काळाच्या पडद्याआड गेला.