किल्ले रायगडावरील शिरकाई देवीचे मंदिर

शिरकाई देवीच्या मंदिराचे वैशिट्य असे की हे मंदिर पूर्णपणे मोकळे असून त्यास सभागृह व गाभारा नाही व ज्या ठिकाणी गाभारा असतो त्या ठिकाणी एक भव्य पाषाणी देव्हारा बांधण्यात आला असून त्यामध्ये देवीची मूर्ती स्थानापन्न आहे.

किल्ले रायगडावरील शिरकाई देवीचे मंदिर
शिरकाई देवीचे मंदिर

स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर जी धार्मिक स्थाने आहेत त्यामध्ये श्री जगदीश्वर, श्री व्याडेश्वर, श्री भवानी माता आणि श्री शिरकाई ही प्रसिद्ध आहेत व यापैकी शिरकाई हे देवस्थान अतिशय जुने मानले जाते.

शिवपूर्वकाळात रायगड किल्ला हा शिरकाण अथवा शिर्काण या प्रदेशाचा भाग होता व रायगडास तेव्हा रायरी या नावाने ओळखले जात असे. शिरकाण हा प्रदेश शिर्के घराण्याच्या अमलाखाली होता मात्र कालांतराने येथे जावळीच्या मोऱ्यांचा अमल सुरु झाला मात्र रायगड किल्ल्याची गडदेवता मानली जाणारी शिर्काई देवी ही तेव्हापासून ते आजतागायत रायगडावर स्थानापन्न आहे.

रायगड किल्ल्याचा महादरवाजा पार करून आपण बालेकिल्ल्यावर प्रवेश करतो त्यावेळी आपल्या समोर प्रथम हत्ती तलाव येतो व हत्ती तलावाच्या दिशेने गंगासागर तलावाकडे जाण्याची एक छोटी वाट आहे या वाटेतच शिर्काई देवीचे सुबक मंदिर आहे. शिर्काई देवीस शिरकाई अथवा शिरकाबाई या नावाने सुद्धा पूर्वी ओळखले जात असे व ही देवी महिषासुर्मार्दिनीचेच रूप आहे मात्र शिर्के घराण्याची कुलदेवता म्हणून या देवीस शिर्काई हे नाव प्राप्त झाले.

असे म्हणतात की शिर्काईचे मंदिर पूर्वी गंगासागर तलावाच्या पूर्वेस होते मात्र फार नंतर तिची स्थापना गंगासागर आणि हत्ती या दोन तलावाच्या मध्यभागी करण्यात आली. गंगासागर तलावाच्या पूर्वेस शिर्काई देवीच्या मूळ मंदिराचे जोते आजही दृष्टीस पडते.

शिर्काई देवीच्या मंदिराचे वैशिट्य असे की हे मंदिर पूर्णपणे मोकळे असून त्यास सभागृह व गाभारा नाही व ज्या ठिकाणी गाभारा असतो त्या ठिकाणी एक भव्य पाषाणी देव्हारा बांधण्यात आला असून त्यामध्ये देवीची मूर्ती स्थानापन्न आहे. पूर्वीच्या काळात मंदिराचे जोते पाषाणी व इतर काम लाकडी असावयाचे मात्र १८१८ साली किल्यावर ब्रिटिशांनी टाकलेल्या तोफगोळ्यांनी प्रचंड आग लागून अनेक इमारती आगीच्या भक्षस्थानी पडल्या व त्यामध्ये या मंदिराचाही समावेश होता. फक्त मंदिराचे जोते आणि चोहोबाजूस असलेली तटबंदी ही पाषाणी असल्याने टिकून राहिली.

या मंदिरास अदमासे १० मीटर लांब आणि ८ मीटर रुंद अशी पाषाणी भिंत असून या भिंतीस पूर्वेकडून आत प्रवेश करण्यासाठी मार्ग आहे. आवाराच्या मध्यभागी एका पाषाणी देव्हाऱ्यात अष्टभुजा महिषासुरमर्दिनी श्री शिर्काई देवीची भव्य मूर्ती असून मूर्तीची रचना अद्भुत आहे.

मंदिराच्या आवाराच्या मागील भिंतीस लागून बऱ्याच मूर्ती, शिळा आणि वीरगळी पाहावयास मिळतात ज्या रायगडाचा इतिहास कथन करण्याचा प्रयत्न करीत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता भवानी हिचे मूळ मंदिर तुळजापूर येथे असले तरी त्यांनी किल्ले प्रतापगडावर भवानी मातेचे एक मंदिर निर्माण केले होते व येथेच ते देवीच्या दर्शनास जात असत आणि भवानी व शिर्काई ही दोन्ही दैवते महिषासुरमर्दिनीचीच वेगवेगळी नावे असल्याने शिर्काई देवी शिवकाळातही रायगड किल्याची गडदेवता होती.

महाराजांच्या रायगड किल्ल्यास भेट देणारे शिवभक्त शिर्काई देवीच्या मंदिरास सुद्धा श्रद्धेने भेट देतात आणि तिच्या चरणीही नतमस्तक होतात.