बिरबल - मोगल दरबारातील एक रत्न

बिरबल हा उत्कृष्ट नकलाकार, कवी, विनोद रचणारा, गंधर्वविद्येत प्रवीण असा असून त्याचे असंख्य किस्से आजही लोककथांमधून जिवंत आहेत.

बिरबल - मोगल दरबारातील एक रत्न
बिरबल

भारताच्या इतिहासात जी विद्वान व्यक्तिमत्वे झाली आहेत त्यापैकी एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे बिरबल. बिरबल हा मोगल बादशाह अकबर याचा समकालीन असून अकबराच्या दरबारात जी प्रसिद्ध नवरत्ने होती त्यापैकी एक होता. दुर्दैवाने बिरबलाचा इतिहास हा सत्याहून अधिक काल्पनिक लोककथांमधून अथवा गोष्टींतूनच आपल्यासमोर आला आहे त्यामुळे बिरबलचे चरित्र बऱ्याच प्रमाणात झाकोळले गेले आहे.

बिरबलचा जन्म इसवी सन १५२८ साली सध्याच्या मध्य प्रदेश राज्यातील सिधी या ठिकाणी झाला असून त्याचे मूळ नाव महेशदास होते. एका गरीब हिंदू ब्राह्मण कुटुंबात त्याचा जन्म झाला असल्याने त्याची कौटुंबिक परिस्थती सुरुवातीस खूप हलाखीची होती आणि उदरनिर्वाहासाठी त्यास वेगवेगळी कामे करावी लागत.

असे असले तरी त्याच्याकडे एक मोठा गुण होता व तो म्हणजे त्याची बुद्धी व हजरजबाबीपणा. बिरबलाकडे चांगली संभाषणकला सुद्धा असल्याने हळूहळू त्याचा उत्कर्ष होऊ लागला आणि त्यास अकबराच्या दरबारात नोकरी मिळाली. नोकरी करीत असताना सुद्धा त्याच्या गुणांमुळे त्यास बढती मिळत गेली आणि सर्वत्र त्याचे कौतुक होऊ लागले.

बिरबल हा उत्तम कवीसुद्धा असून त्याने हिंदी भाषेत काव्ये रचली होती. अकबरास जेव्हा बिरबलाच्या काव्यगुणांची कल्पना आली त्यावेळी त्याने बिरबलास कविराज ही पदवी देऊन त्यास आपल्या नवरत्नांत स्थान दिले.

अकबरास कुठल्याही प्रश्नाचे उत्तर हवे असल्यास तो बिरबलाचा सल्ला घेत असे व बिरबल जो निर्णय देत असे तो बादशहास कायम पटत असे त्यामुळे अकबराने बिरबलास इतर राजांशी चर्चा करण्याची जबाबदारी दिली होती त्यामुळे बिरबल हा एक मुसद्दी म्हणूनही प्रसिद्धीस आला.

अकबर हा श्रद्धाळू असला तरी धर्मांध नसल्याने त्याने आपल्या कार्यकाळात अनेक धार्मिक सुधारणा केल्या आणि सर्वधर्मीय नागरिकांनी एकोप्याने राहावे यासाठी प्रयत्न केले व या कार्यात त्यास बिरबल आणि शेख अबू फजल या दोघांचे खूप सहकार्य लाभले मात्र यामुळे अकबराच्या दरबारातील बदौनी, शाबासखान आदी लोक बिरबलावर राग ठेवून होते.

अकबराने पुढील काळात बिरबलास राजा हा किताब दिला आणि त्यास राजा बिरबल ही ओळख प्राप्त झाली. बिरबलाचे महत्व हे दरबारी कामात अधिक असल्याने अकबर त्यास कुठल्याही मोहिमेवर पाठवत नसे व दरबारी येणारे इतर राजे व वकील आदींशी चर्चा करण्याच्या कामी कायम त्यास दरबारातच ठेवत असे.

१५८६ साली अकबराचा भाऊ ज्यास त्याने सरहद्दीचे नियंत्रण ठेवण्यासाठी नेमले होते तो मरण पावल्यावर उझबेक लोकांनी सरहद्दीवरील बदकशान हा प्रांत ताब्यात घेऊन काबूलवर चाल करण्याची योजना केली त्यामुळे अकबर स्वतः उझबेक लोकांचा समाचार घेण्यास त्या ठिकाणी रवाना झाला. सुरुवातीस त्याने पंजाब गाठले आणि तेथून त्याने सतलज नदी ओलांडून रावळपिंडी गाठली. 

रावळपिंडीवरून अकबराने काबुलकडे न जाता अटकेच्या किल्ल्याकडे प्रस्थान केले आणि तेथून त्याने काश्मीर जिंकण्याचा विचार करून राणा भगवानदास याच्यासोबत सैन्य देऊन त्यास काश्मीरकडे रवाना केले.

बिरबलाने यानंतर सैन्याचे आणखी दोन भाग करून एक तुकडी बलुची लोकांचा समाचार घेण्यास पाठवली आणि तिसरी तुकडी स्वातवर स्वारी करण्यास पाठवली. या तीन तुकड्यांपैकी स्वातवर स्वारी करण्यास गेलेल्या मोगल सैन्याच्या तुकडीवर युसूफझाई लोकांनी जोरदार हल्ला करून त्यांना मागे पिटाळून लावले. 

अकबरास ही माहिती मिळवल्यावर त्याने राजा बिरबलास युसूफझाई लोकांवर पाठवले मात्र या वेळी सुद्धा युसूफझाई लोकांनी मोगलांचा मोठा पराभव करून तब्बल ८००० मोगल सैनिक ठार मारले आणि दुर्दैवाने या युद्धात या सैन्याचा सेनापती राजा बिरबल सुद्धा मारला गेला.

अकबर बादशहाच्या कारकिर्दीत मोगलांचा प्रथमच असा दारुण पराभव झाला होता आणि अकबराची सर्वात दुःखद गोष्ट म्हणजे त्याचा अत्यंत प्रिय असा बिरबल या युद्धात मारला गेल्याने अकबराने खूप शोक केला आणि बिरबलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आणि मोगल साम्राज्याची झालेली बदनामी भरून काढण्यासाठी आपला मुख्य सेनापती राजा तोडरमल आणि त्याच्या सोबत जयपूरचा राजा राणा मानसिंग यास मोठे सैन्य देऊन युसूफजाई लोकांवर रवाना केले. राजा तोडरमल आणि राणा मानसिंग यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन करून खैबर खिंडीत युसूफजाई लोकांचा दारुण पराभव केला.

या विजयाने मोगलांची गेलेली कीर्ती पुन्हा मिळाली असली तरी दरबारातील एक नवरत्न कायमचे हरपले. बिरबल हा उत्कृष्ट नकलाकार, कवी, विनोद रचणारा, गंधर्वविद्येत प्रवीण असा असून त्याचे असंख्य किस्से आजही लोककथांमधून जिवंत आहेत.