शिर्के घराण्याचा देदीप्यमान इतिहास

शिर्के घराण्याचा इतिहास यादव काळापर्यंत जाऊन पोहोचतो मात्र त्यांचा उत्कर्ष हा विजयनगर साम्राज्याच्या कारकिर्दीत झाला. विजयनगर साम्राज्याच्या समकालीन असे बहामनी राज्य त्याकाळी विद्यमान होते आणि या दोन्ही राज्यांत परस्पर संघर्ष सुरु असत.

शिर्के घराण्याचा देदीप्यमान इतिहास
शिर्के घराण्याचा देदीप्यमान इतिहास

मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासातील एक मातब्बर राजघराणे म्हणजे शिर्के. शिर्के घराण्याचा अमल सुरुवातीस प्रामुख्याने कोकण व सह्याद्रीच्या सीमेवरील डोंगराळ भागात त्यांचे मूलस्थान होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी सगुणाबाई या शिर्के घराण्यातील असून त्यांचा महाराजांशी १६४१ साली विजापूर येथे विवाह झाला होता. शिवरायांना सगुणाबाईंपासून राजकुंवरबाई उर्फ नानीबाई नामक कन्यारत्न प्राप्त झाले होते व त्यांचा विवाह गणोजी शिर्के यांच्यासहित झाला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई या सुद्धा शिर्के घराण्यातील असून गणोजी शिर्के हे त्यांचे बंधू होत. शिर्के घराण्याच्या अखत्यारीत कोकणातील एक मोठा प्रदेश होता व या प्रदेशास शिरकाण असे नाव होते. त्याकाळी फिरंग्यांचे फिरंगाण, हबश्यांचे हबसाण, तुर्क्यांचे तुर्काण तसेच शिर्क्यांचे शिरकाण अशी नावे प्रचलित होती. शिर्क्यांची कुलदेवता शिरकाई देवी असून या देवतेची मंदिरे आजही अनेक ठिकाणी पाहावयास मिळतात. किल्ले रायगडावरही शिर्काईचे एक जुने मंदिर आहे.

तेव्हा अशा या मातब्बर शिर्के घराण्याचा उत्तरकालीन इतिहासाचं आपल्या समोर कायम असतो आणि त्यापूर्वी त्यांनी परकियांविरोधात केलेले पराक्रम झाकोळले गेले आहेत.

शिर्के घराण्याचा इतिहास यादव काळापर्यंत जाऊन पोहोचतो मात्र त्यांचा उत्कर्ष हा विजयनगर साम्राज्याच्या कारकिर्दीत झाला. विजयनगर साम्राज्याच्या समकालीन असे बहामनी राज्य त्याकाळी विद्यमान होते आणि या दोन्ही राज्यांत परस्पर संघर्ष सुरु असत.

बहामनी सुलतान अल्लाउद्दीन बहामनी जेव्हा तख्तावर विराजमान झाला त्याच्या कारकिर्दीत घडलेली एक घटना शिर्के घराण्याच्या पराक्रमावर चांगला प्रकाश टाकते. 

अल्लाउद्दीन बहामनीच्या राज्यात जे सुभेदार होते त्यांपैकी एक मेनुन उल्ला दक्षिणी यांच्याकडे दक्षिण प्रांतातील एका विभागाची जबाबदारी होती व त्याच्या मनात एकदा कोकणातील प्रदेश जिंकण्याची इच्छा आली आणि त्याने मलिक ऊत तुजार या हुशार सेनापतीस कोकणावर पाठवले.

मलिक ऊत तुजार याने प्रथम पश्चिम महाराष्ट्रातील चाकण ताब्यात घेऊन जुन्नरचा किल्ला जिंकला आणि तेथे आपला तळ देऊन आपल्या सैन्यास कोकणाकडे रवाना केले.

कोकणात त्यावेळी जे हिंदू राजे होते त्यापैकी एक शिर्के घराण्यावर बहामनी सैन्याने प्रथम चाल केली. बहामनी सैन्याने अचानक हल्ला करून शिर्क्यांच्या किल्ल्यास वेढा घातल्याने शिर्क्यांची अडचण झाली आणि बराच काळ किल्ला लढवल्यावर शिर्क्यांनी तात्पुरती शरणागती पत्करली. 

यानंतर राजे शिर्के यांची मलिक ऊत तुजार सहित भेट झाली यावेळी मलिकने त्यांना धर्मांतर करण्याचा आग्रह धरला अन्यथा मृत्युदंड देऊ अशी धमकी दिली. शिर्के राजांनी यावेळी एक युक्ती केली आणि मलिकला असे सांगितले की आमचे आणि खेळण्याचे शंकरराव (यांचे आडनाव जुन्या साधनांत आढळत नाही) यांचे जुने वैर असून जर मी एकटाच मुस्लिम झालो तर शंकरराव मात्र मुक्त राहून तो आपल्यास कायमच त्रास देत राहील त्यामुळे त्याचाही बंदोबस्त करावा म्हणजे मी धर्मांतर करेन.

मलिक ऊत तुजार यास खेळण्याचा परिसर माहित होता त्यामुळे तो शिर्क्यांस म्हणाला की त्या राज्यातील प्रदेश हा अतिशय बिकट असून तेथे जाणे अत्यंत कठीण आहे मात्र यावेळी शिर्के राजे म्हणाले की मी सोबत असताना कठीण काहीच नाही कारण आम्ह स्वतः कोकणातील असल्याने आम्हाला तेथील सर्व रस्ते माहित आहेत. 

अशा प्रकारे इसवीसन १४५३ साली मलिक ऊत तुजार ने खेळणा किल्ल्यावर मोहीम काढली. कोकणातील भयानक जंगल पाहून दक्षिणी आणि हबशी सैनिकांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे नाकारले आणि ते पुन्हा मागे वळले मात्र बहामनी राज्यातील इतर काही सैन्य शिर्क्यांसोबत या जंगलातून खेळण्याच्या दिशेने गेले. 

पहिले दोन दिवस शिर्क्यांनी बहामनी सैन्यास चांगल्या वाटेवरून नेले मात्र तिसऱ्या दिवशी त्यांनी बहामनी सैन्यास अशा एका भयानक वाटेने नेले की त्या वाटेच्या कचाट्यातून सुटणे कठीण होते.

याच दरम्यान मलिक ऊत तुजार जो मागून या ठिकाणी येण्यास निघाला तो आजारी पडल्याने त्याला पुढे कूच करणे कठीण होऊन बसले आणि त्याच्या सैन्यातील एक मोठा गट खेळण्याच्या एका भयानक परिसरात येऊन अडकला. 

राजे शिर्के यांनी यावेळी खेळण्यावर शंकरराव यांची भेट घेतली आणि सांगितले की बहामनी सैन्य तुझ्या जबड्यात आणुन सोडले आहे आता त्याचा आपण मिळून फडशा पाडू आणि पाहता पाहता शंकरराव आणि शिर्के यांच्या सैन्याने बहामनी सैन्यावर तुफान हल्ला केला आणि बाण, भाले, तलवारी आदींच्या साहाय्याने तब्बल ७००० बहामनी सैनिक कापले गेले.

मागून या ठिकाणी येऊन पोहोचलेला मलिक ऊत तुजार हा सुद्धा ५०० सैनिकांसह येथे येऊन पोहोचला आणि त्याच्यासहित ५०० सैन्याचीही कत्तल उडवली गेली. 

कालांतराने २००० लोकांची हबशी आणि दक्षिणी लोकांची जी तुकडी होती तिची सुद्धा या ठिकाणी आल्यावर तीच गत झाली व अशाप्रकारे राजे शिर्के आणि शंकरराव यांनी संयुक्तपणे बहामनी राज्याच्या अदमासे ९५०० सैनिकांना ठार करून हा मुलुख परकीयांच्या हाती जाण्यापासून वाचवला.