कुंभकोणम - एक प्राचीन तीर्थक्षेत्र

दर बारा वर्षांनी जेव्हा गुरु मघा नक्षत्री येतो त्यावेळी या ठिकाणी सरोवराचा मोठा महोत्सव साजरा केला जातो.

कुंभकोणम - एक प्राचीन तीर्थक्षेत्र
कुंभकोणम

भारतात जी प्रसिद्ध धर्मक्षेत्रे आहेत त्यापैकी एक म्हणजे कुंभकोणम. कुंभकोणम हे स्थान तामिळनाडू राज्यातील तंजावर जिल्ह्यात कावेरी नदीच्या तीरावर वसले आहे.

धार्मिक दृष्ट्या कुंभकोणमचे स्थानमाहात्म्य हे प्रयागच्या खालोखाल मानले जाते. या स्थानाच्या माहात्म्यामुळे या स्थळी दर बारा वर्षांनी मोठी यात्रा भरते.

कुंभकोणम या ठिकाणी धार्मिक महत्व असलेली अनेक ठिकाणे असून त्यापैकी पहिले म्हणजे भव्य असे महामखम सरोवर. या सरोवराचा विस्तार तब्बल वीस एकर असून ज्यावेळी गुरु सिंहस्थास असतो त्यावेळी गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, गोदावरी, कावेरी, महानदी, पयोष्णी आणि शरयू या नऊ पवित्र नद्या या सरोवरात अवतरतात असे मानले जाते.

कुंभकोणम येथील आणखी एक प्रख्यात स्थळ म्हणजे कुंभेश्वर महादेवाचे प्राचीन शिवमंदिर. कुंभेश्वर महादेवाच्या मंदिरावरूनच या स्थानास कुंभकोण हे नाव मिळाले असे म्हणतात.

पेरियपुराणात या संदर्भात पुढील कथा आहे, ज्यावेळी सृष्टीचा प्रलय आला त्यावेळी ब्रह्मदेवाने मातीत अमृत मिसळले व त्यापासून एक घडा तयार केला आणि त्या घड्यात सृष्टीची सर्व बीजे घालून तो घडा मेरुपर्वतावर टांगून ठेवला. यानंतर झालेल्या प्रलयात सप्तसागर खवळून संपूर्ण सृष्टी जलाधीन झाली त्याचसोबत मेरुपर्वतही समुद्रात बुडाला आणि त्यावरील बीजघट वाहत वाहत कुंभकोण येथे आला.

यानंतर महादेवाचे भिल्लवेषात यास्थळी आगमन झाले आणि त्याने बाणाने हा घट फोडला आणि त्यातून अमृत वाहू लागले. या अमृताच्या साठ्याचा एक मोठा तलाव यास्थळी निर्माण झाला. महादेवाने या प्रसंगाची आठवण म्हणून या स्थळी स्वहस्ते लिंग स्थापले आणि त्यास कुंभेश्वर असे नाव दिले.

दर बारा वर्षांनी जेव्हा गुरु मघा नक्षत्री येतो त्यावेळी या ठिकाणी सरोवराचा मोठा महोत्सव साजरा केला जातो व या उत्सवास तामिळनाडूमध्ये महामखम अथवा मामांकम या नावाने ओळखले जाते.

कुंभकोण येथील शारंगपाणी मंदिर सुद्धा अतिशय सुंदर व प्रसिद्ध आहे. हे मंदिर रथाकृति असून त्याचे गोपुर १४७ फूट उंच आहे. गोपुरास एकूण बारा मजले आहेत.

तंजावरचा राजा रघूनायक याने सोळाव्या शतकात बांधलेले रामस्वामींचे मंदिर सुद्धा प्रेक्षणीय आहे. 

या मंदिरांशिवाय कुंभकोणम येथे ब्रह्मदेवाचे एक मंदिर, महादेवाची बारा आणि विष्णूची चार मंदिरे आहेत.

कुंभकोणम येथे शंकराचार्यांचा मठ असून या ठिकाणी अतिशय जुनी अशी हस्तलिखिते व संस्कृत ग्रंथ आहेत. इसवीसनाच्या सातव्या शतकात चोल राजांनी कुंभकोणमला आपल्या राजधानीचा दर्जा देऊन या ठिकाणी विद्या आणि कलांना राजाश्रय दिला. 

तेव्हा असे हे दक्षिण भारतातील प्रसिद्ध धार्मिक क्षेत्र असलेले कुंभकोणम एकदातरी पाहायलाच हवे.