चौल-रेवदंडा येथील येसाजी आंग्रे यांची अज्ञात समाधी

रामेश्वर मंदिराच्या आसमंतात थोडा फेरफटका मारल्यास काही अज्ञात गोष्टी समोर येतात मात्र इतिहासाने या वास्तूंबद्दल मौन बाळगले आहे. यापैकीच एक म्हणजे येसाजी आंग्रे यांची अज्ञात समाधी.

चौल-रेवदंडा येथील येसाजी आंग्रे यांची अज्ञात समाधी

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरुड मार्गावर असलेल्या चौल-रेवदंड्यास प्राचीन इतिहास आहे. या वैभवशाली नगरीत असलेलं रामेश्वराचे मंदिरही तितकेच वैभवशाली आहे. याच रामेश्वर मंदिराच्या आसमंतात थोडा फेरफटका मारल्यास काही अज्ञात गोष्टी समोर येतात मात्र इतिहासाने या वास्तूंबद्दल मौन बाळगले आहे. अशीच एक वास्तू म्हणजे रामेश्वर मंदिराच्या बरोबर मागे असलेली एक अज्ञात समाधी.

अतिशय भव्य व रेखीव अशी ही समाधी रामेश्वर मंदिरामागील नारळी बागेत उभी आहे. समाधीच्या बाजूला एक नंदी असून तो नंदी रामेश्वर मंदिरातील आहे की या समाधीस्थळाचा आहे हे कळायला मार्ग नाही. मात्र या समाधीचे नीट निरीक्षण केल्यास डोळ्यासमोर उभ्या राहतात त्या अलिबागच्या छत्रीबागेतील आंग्रे घराण्याच्या समाध्या. अलिबागला भेट देणाऱ्याने छत्रीबागेतील सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यासहित आंग्रे घराण्यातील अनेक कर्तबगार स्त्री व पुरुषांच्या समाध्या पाहिल्या असतीलच. या समाध्या व रामेश्वर मंदिराच्या मागे असलेल्या समाधीची वास्तुशैली तंतोतंत जुळते यावरून हा ठाम अंदाज लावता येतो की आंग्रे घराण्यातीलच कुणा पुरुषाची ही समाधी असावी.

मात्र सदर समाधी आंग्रे घराण्यातील एका पुरुषाची आहे हे ठाम असले तरी नक्की कुणाची या प्रश्नाचे उत्तर शोधणे कठीण होऊन बसते. अशावेळी ऐतिहासिक साधने तपासणे गरजेचे होऊन बसते. ऐतिहासिक साधने तपासल्यावर जी माहिती मिळते ती पुढीलप्रमाणे समाधीच्या रहस्याची पुष्टी करते.

सरखेल कान्होजी आंग्रे यांना एकूण सहा पुत्र होते त्यांची नावे अनुक्रमे सेखोजी, संभाजी, मानाजी, तुळाजी, येसाजी आणि धोंडजी अशी होती. या मुलांपैकी कुलाबाप्रांती मानाजी व संभाजी यांना ठेवण्यात आले यावेळी येसाजी व धोंडाजी हे मानाजी आंग्रे यांच्या सोबत कुलाबा मुलुखाचे काम सांभाळत होते. कान्होजी आंग्रे निर्वतल्यानंतर सारखेली त्यांचे ज्येष्ठ पुत्र सेखोजी यांच्याकडे आली. पुढे संभाजी आंग्रे हे विजयदुर्गच्या तर मानाजी हे कुलाब्याचा कारभार पाहू लागले. मात्र कुलाबा संस्थांनही ताब्यात घ्यावे असा विचार करून संभाजी विजयदुर्गाहून मानाजींवर चाल करून आले. यावेळी मानाजी यांनी पेशव्यांकडून मदत मागितली आणि संभाजी आंग्रे यांच्या तर्फे लढणाऱ्या तुळाजी आंग्रे यांना कैद करण्यात आले यानंतर संभाजी यांनी तहाची बोलणी सुरु केली आणि विजयदुर्गच्या कारभार संभाजी यांनी पाहावा आणि कुलाब्याच्या कारभार मानाजी यांनी पाहावा असा तह उभयतांमध्ये झाला.

मागे लिहिले आहेच की एकूण सहा भावंडांपैकी सर्वात दोन लहान भाऊ येसाजी व धोंडजी मानाजी यांच्यासोबत होते अशावेळी मानाजी यांनी येसाजी यांना पेण परगणे सांकशी येथें ठेवले होते व धोंडजी हे कुलाब्यातच होते. त्यावेळी येसाजी यांच्या मनात सत्तेची आकांशा निर्माण होऊन त्यांनी मानाजींविरोधात बंड उभारण्याचे ठरवले. यामध्ये त्यांनी कुलाबा प्रांतात असलेल्या धोंडजी यांची मदत घेऊन कुलाब्यावर कब्जा केला. अकस्मात हल्ल्याने चकित झालेले मानाजी रेवदंडा येथे गेले व आपले सैन्य मजबूत करून कुलाब्यावर हल्ला करून येसाजी व धोंडजी दोघांनाही अटक केले.

कालांतराने येसाजींच्या कुटुंबीयांनी त्यांना तेथील अटकेतून सोडवून रेवदंड्यास प्रयाण केले व तेथेच कायम वास्तव्य केले. मानाजी यांचे निधन झाल्यावर त्यांचे पुत्र रघुजी आंग्रे (पहिले) हे सरखेल झाले त्यांनी जुने शत्रुत्व विसरून जाऊन रेवदंडा येथे येसाजींची भेट घेऊन विचारपूस केली आणि घराण्यातील वादाचा अंत केला. येसाजींच्या मुलींच्या लग्नाची जबाबदारी सुद्धा त्यांनी यावेळी घेतली. अशाप्रकारे जुने वैर संपून नवा अध्याय सुरु झाला. काही वर्षांनी येसाजी यांचा रेवदंडा मुक्कामीच मृत्यू झाला यावेळी रघुजी आंग्रे व येसाजी यांचे पुत्र सर्वानी मिळून येसाजी यांचे उत्तरकार्य केले व त्यांचे स्मृतिस्थळ म्हणून रामेश्वर मंदिराच्या मागे आंग्रे घराण्यातील ज्येष्ठ पुरुषास शोभेल अशी समाधी उभारली.