हा आहे महाराष्ट्रातील अत्यंत जुना पूल

रायगड जिल्हातील नागोठणे शहरात असाच एक पूल उपेक्षा झेलत असला तरी आजही शंभर दोनशे वर्षे नव्हे तर तब्बल ४४१ वर्षे  दिमाखात उभा आहे.

हा आहे महाराष्ट्रातील अत्यंत जुना पूल
हा आहे महाराष्ट्रातील अत्यंत जुना पूल

महाराष्ट्राचे वास्तुवैभव प्रचंड आहे. किल्ले, लेण्या, मंदिरे, वाडे, तलाव अशा अनेक रूपात प्राचीन काळापासून आजही आपले अस्तित्व ठिकवून ठेवलेल्या असंख्य वास्तू महाराष्ट्रात आहेत.

यामध्ये ऐतिहासिक पूल हा पर्याय समाविष्ट झाला नाही तर नवल. महाराष्ट्रास ऐतिहासिक पुलांची देखील परंपरा आहे. 

हे पूल फक्त दोन भागांना जोडणारे नसत तर दोन भागातील व्यापार, दळणवळण, सुविधा अशा अनेक गोष्टींना चालना देणारे दुवे म्हणजे हे पूल.

दुर्दैवाने या पुलांवर फारसे लिखाण करण्यात आले नाही अथवा जुन्या काळात अत्याधुनिक सुविधा नसतानाही आजही जसेच्या तसे उभे असलेले हे पूल बांधण्यामागील शास्त्र काय होते याचाही अभ्यास करण्यात आला नाही.

रायगड जिल्हातील नागोठणे शहरात असाच एक पूल उपेक्षा झेलत असला तरी आजही शंभर दोनशे वर्षे नव्हे तर तब्बल ४४१ वर्षे  दिमाखात उभा आहे.

यासाठी पुलाच्या निर्माणकर्त्याचे आभार मानायला हवेत की त्याने या पुलाच्या बांधणीची तारीख असलेला शिलालेख पुलास बसवला आणि ब्रिटिश काळात या लेखाचे व्यवस्थित संकलन करण्यात आले अन्यथा सध्या हा शिलालेख तेथून कधी गायब झाला याची माहिती नाहीच मात्र मधल्या काळात इंटरनेटच्या केबल पुलावर टाकून पुलाच्या कमानींचे नुकसान करण्यात आधुनिक युगातील तज्ज्ञ आघाडीवर होते. 

असो, तर हा महाराष्ट्रातील अत्यंत जुना पूल अशी ख्याती असलेला हा पूल वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना आहे.

१५८० साली चौलच्या काझी अल्लाउद्दीन याने हा पूल बांधल्याची नोंद येथे पूर्वी असलेल्या फारशी भाषेतील शिलालेखामध्ये होती मात्र तरी त्याआधी हा पूल विजयनगरचा राजा रामराया याच्याकरवी बांधला गेल्याचा एक शिलालेख परिसरात होता दुर्लक्षित अवस्थेत होता व लोकसत्ताचे पहिले संपादक त्र्यंबक विष्णू पर्वते यांनी या लेखाचे वाचन केले होते असे नागोठण्याचे दिवंगत माजी सरपंच उपाध्ये वकील यांच्याकडून समजले.

कदाचित मूळच्या जुन्या पुलाचा काझी अल्लाउद्दीनकडून नव्याने जीर्णोद्धार करण्यात येऊन त्यास आणखी मजबूत बनवण्यात आले असावे.

१४६.३० मीटर लांब, ५.७९ मीटर उंच व २.९२ मीटर रुंदी असलेला हा पूल हजारो अंड्यांचा बलक व चुन्याच्या मिश्रणाचा उपयोग दगड, माती व शिंपल्यांमध्ये मिश्रित करून बांधल्याने आजतागायत मजबूत अवस्थेत आहे.

ब्रिटिशकाळातही या पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती.

हा पूल येथे बांधण्यात आल्याचे कारण मुख्य कारण म्हणजे प्राचीन काळापासून चौल या संपन्न अशा व्यापारी शहरातून जो प्रमुख महामार्ग कोकणमार्गे देशावर जात असे तो नागोठण्यामार्गे जात होता व या मार्गावरील दळणवळण सोपे व्हावे याकरिता हा पूल त्याकाळी बांधण्यात आला. 

इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात भारत भेटीवर आलेला ग्रीक भूगोलतज्ञ टॉलेमी याने नागोठण्याची नोंद आपल्या ग्रंथात केली आहे. याशिवाय त्याने तयार केलेल्या जगाच्या नकाशात नागोठण्याचा उल्लेखसुद्धा आलेला आहे.

टॉलेमीने भूगोल या विषयास शास्त्राचे स्वरुप दिले. त्यामुळे त्याची नोंद आद्य भूगोलतज्ञांपैकी एक म्हणून केली जाते. टॉलेमीने नागोठण्याचा उल्लेख नानागुना असा केला आहे.

टॉलेमीने जगाचा नकाशा तयार करताना प्रामुख्याने सीमारेषा, नद्या, खाड्या इत्यादींचे बारकाईने निरीक्षण केले. नागोठण्याची खाडी ही तेव्हा सातवाहन कालीन राजधानी जुन्नर तसेच पैठणला जाण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मार्ग म्हणून प्रसिद्ध होती.

या नदीस फार पूर्वीपासून नागोठणा नदी या नावानेच ओळखले जात असे. त्यामुळे त्याने त्याच्या नकाशातही नानागुना रिव्हर (नागोठणा नदी) असा उल्लेख एकदा नव्हे तर तीन वेळा केला आहे.

त्याच्या खालोखाल त्याने सिमिल्ला असा चौलचा उल्लेख केला आहे (चौलला पूर्वी चैमुल्य असे नाव होते) याशिवाय त्याने याच परिसरात हरमघर या ठिकाणाचा उल्लेख केलाय, ते म्हणजे सध्याचे नागोठणे खाडीवरील धरमतर बंदर असावे. 

गुजरात सुलतानाच्या अमलानंतर नागोठणे विभाग उत्तर कोकणासहित निजामशाहीच्या अखत्यारीत होता. त्याकाळी दक्षिणेतील पाचही शाह्या विजयनगरशी मित्रत्वाचा व्यवहार करीत होत्या मात्र कालांतराने एकत्र येऊन या पाचही शाह्यांनी तालिकोटच्या 1565 साली झालेल्या लढाईत विजयनगर साम्राज्याला नष्ट केले होते.

त्यामुळे जेव्हा निजामशाहीचा विजयनगरशी मित्रत्वाचा व्यवहार होता त्यावेळी तळा गावातील भुवनेश्वर मंदिर अथवा नागोठण्यावरील हा मध्ययुगीन पूल इत्यादी वास्तू निजामशाही व विजयनगर साम्राज्याच्या यूतीतून बांधल्या गेल्या असाव्यात.

दुर्दैवाने रामरायाचा प्राकृत व काझी अल्लाउद्दीनचा फारशी असे दोनही शिलालेख आज येथे दिसून येत नाहीत मात्र या भव्य इतिहासाची साक्ष देणारा मजबूत पूल आजही येथे पहावयास मिळतो.

हा पूल केंद्रीय पुरातत्व विभागाच्या संरक्षण स्मारकांच्या यादीत असला तरी याचे हवे तसे संरक्षण झालेले नाही. चांगली बाब हीच आहे की पूर्वी या पुलावरून होणारी चार चाकी वाहनांची वर्दळ बंद करून फक्त दोन व तीन चाकी वाहने या पुलावरून जाऊ दिली जातात त्यामुळे पुलाच्या बांधकामास इजा होण्याची शक्यता आता भरपूर कमी झाली आहे. 

या पुलाच्या इतिहासावर सखोल संशोधन होणे गरजेचे आहे. जर यासंबंधीचे आणखी पुरावे सापडले तर महाराष्ट्राच्या वास्तुशास्त्रीय इतिहासामध्ये आणखी मोलाची भर पडेल.