देखणे जलव्यवस्थापन आणि ठोसर इनामदार - बऊर

पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यात बेडसे लेणीच्या शेजारी वसलेले गाव बऊर. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले हे गाव इतिहासाच्या संदर्भांच्या बाबतीत मात्र अगदी मूक आहे. गावात २ गद्धेगळ आहेत, वीरगळ आहेत, सुट्ट्या मूर्ती आहेत तर काही भग्नावशेष आहेत.

देखणे जलव्यवस्थापन आणि ठोसर इनामदार - बऊर
बऊर

जुनी प्राचीन देवळे पडून नवीन चकचकीत देवळे उभी आहेत. आणि जुन्या देवळातल्या जुन्या मूर्ती गावकऱ्यांनी पवना जलाशयात विसर्जितही केल्या आणि आता तिथे नवीन मूर्ती उभ्या आहेत.

पण गाव आजही इतिहासाच्या खुणा आपल्या अंगावर लेऊन उभे आहे. गावात एका शेताच्या काठी रस्त्याच्या कडेला जमिनीवर खोदलेली पाण्याची २ टाकी दिसतात. एक आता मातीने बुजलेय तर दुसऱ्यात आजही पाणी आहे. प्राचीन व्यापारीमार्गावर केलेली ही पाणपोई असणार. गावात एक प्रचंड आकाराचे अष्टकोनी तळे आहे. त्याला बामणाचे तळे म्हणतात. आठ बाजूंपैकी एका बाजूवर तलावात उतरायला पायऱ्या आहेत. तलावाच्या भिंतीची रुंदी जवळजवळ ८ फूट इतकी भरते. भिंतीवर शेणाच्या गोवऱ्या वाळवत ठेवलेल्या. ती म्हण आठवली.. जिथे मोती वेचले तिथे गोवऱ्या वेचायची वेळ आली... एका बाजूला त्या भिंतीत उतरायला पायऱ्या आणि खाली एक खोली. तळ्यावर दोन शिलालेख असून ते एकच नाव घेतात... ‘बाळाजी कृष्ण ठोसर.. इनामदार मौजे बऊर.’ शके १७१२ म्हणजेच इ.स. १७९०. गावात अजून एक सुंदर विहीर खोदलेली आहे ज्यात एका बाजूने उतरायला पायऱ्या केल्यात. समोरच्या बाजूला मोट चालवायची सोय केलीये. विहिरीत जायला सुंदर कमान आहे आणि कमानीवर परत हाच शिलालेख दिसतो.... ‘बाळाजी कृष्ण ठोसर.. इनामदार मौजे बऊर.’ शके १७१२

पण गाव मात्र या ठोसर इनामदारांबद्द्ल पूर्णपणे अनभिज्ञ. गावात बऊराई देवीचे छोटेसे देऊळ. देवळात महिषासुरमर्दिनीची मूर्ती. पण तिला प्रचंड शेंदूर फासल्यामुळे..... देवळामागे नैसर्गिक पाण्याचा डोह. पवनेचे वहात येणारे पाणी. तिथेच बरेचसे रांजणखळगे झालेले. गावातले दुसरे देऊळ लक्ष्मी-नारायणाचे. कडक म्हणून प्रसिद्ध. या देवळातल्या जुन्या मूर्ती आता पवनेच्या जलाशयात विश्रांती घेताहेत. या देवळामागे पण सुंदर विहीर.. उतरायला पायऱ्या चारही बाजूंनी कोनाडे, समोर मोट.. पण प्रचंड कचरा. येवढा मोठा वारसा गावाला लाभलेला आणि इतर ठिकाणांप्रमाणे तो सुद्धा दुर्लक्षित. झाडे-वेली वाढलेल्या.. पाण्यात गाळ साठलेला.

पण हा सगळा ठेवा आश्चर्यकारक आहे हे नक्की. गावातून लोहगड-विसापूर, तुंग-तिकोना किल्ले कायम दिसतात. द्रुतगती मार्ग अगदी शेजारून जातो. इतकी सुंदर पाण्याची व्यवस्था केलेली म्हणजे गाव नक्कीच मोठा असणार. इनामदार पण तालेवार माणूस दिसतोय. एक प्रचंड मोठा तलाव आणि इतर विहिरी खोदल्यात. गावात एक जुना वाडा... पार भग्न झालेला. पण काही सौंदर्यस्थळे आजही दाखवणारा.

- आशुतोष बापट