लोणावळा खंडाळा - एक स्वर्गीय सफर

लोणावळा व खंडाळा ही दोनही गावे आपल्याला लहानपणीच अनेक गाण्यांतून आपल्याला परिचयाची झाली आहेतच. समुद्रसपाटीपासून लोणावळ्याची उंची आहे ६२५ मीटर.

लोणावळा खंडाळा - एक स्वर्गीय सफर
लोणावळा खंडाळा

तुम्ही भर पावसाळ्यात कधी पुण्याचा प्रवास केला आहे?  श्रावणात कोकण व घाटमाथा परिसर हिरवागार होऊन गेलेला असतो. अवघ्या धरणीवर हिरवा गालिचा पसरलेला असतो. लाल निळ्या फुलांनी या गालिच्यावर नक्षीकाम केलेले असते.

घाटमाथ्यावरून दिसणारे कोकणाचे अवर्णनीय सौंदर्य, कोकणाला घाटापासून अलिप्त ठेवणारे सह्याद्रीचे रौद्रभीषण कडे आणि त्यावरून हजारो मीटर उंचीवरून कोसळणारे असंख्य जलप्रपात, छोट्या छोट्या टेकड्यांवर मधूनच दिसून येणारे छोटे छोटे बंगले ही सर्व दृश्ये आपल्याला या सुंदर प्रवासात अनुभवायास मिळतात. हा परिसर कुठला हे आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेलच?

तर हा परिसर आहे लोणावळा व खंडाळा. लोणावळा व खंडाळा ही दोनही गावे आपल्याला लहानपणीच अनेक गाण्यांतून आपल्याला परिचयाची झाली आहेतच. समुद्रसपाटीपासून लोणावळ्याची उंची आहे ६२५ मीटर. लोणावळा शहर पर्यटनाबरोबरच आपल्या चिक्की साठी सुद्धा प्रसिद्ध आहे मात्र चिक्की साठी लागणारे पदार्थ येथे बनत नसले तरी चिक्की बनवण्याचे तब्बल 15 कारखाने येथे आहेत.

लोणावळ्याजवळ असलेल्या कार्ले लेण्यांत एकविरा देवीचे जागृत देवस्थान आहे. या डोंगराच्या उत्तरेस आंध्र या नदीचा उगम होतो. ही नदी भिवपुरीच्या खोऱ्यात उगम पावते व राजापूर या ठिकाणी इंद्रायणी नदीमध्ये विलीन होते. या नदीच्या खोऱ्याला आंदर मावळ असे म्हटले जाते. याशिवाय इंद्रायणी नदीचे जे खोरे आहे त्यास नाणे मावळ या नावाने ओळखले जाते. अशा या आंदर मावळ व नाणे मावळ यांच्या सानिध्यात लोणावळा व खंडाळा हि दोन टुमदार हिवाळी पर्यटनस्थळे वसली आहेत.

कोकणातून पूर्वी या ठिकाणी जाण्यासाठी कोकण दरवाजा, बोर घाट, उंबर खिंड, वाघजाई घाट व सवाष्णी घाट असे प्रमुख घाटरस्ते होते यापैकी बोरघाट या मार्गाचे आधुनिकीकरण झाले असून आधुनिक काळातील दळण वळण याच मार्गाने होते. 

येथील लोहगड व विसापूर या किल्ल्यांवरून पूर्वी नाणे मावळ व आंदर मावळ या दोन मावळांचे संरक्षण केले जात असे. कारण पाश्चात्य देशांतून कोकणमार्गे सातवाहन काळातील प्रमुख शहरे जुन्नर व पैठण या शहरांकडे जाणारे प्रमुख व्यापारी रस्ते हे खंडाळा लोणावळा करूनच पुढे जात असत. या मार्गांच्या साक्षीनेच कार्ले, भाजे, ठाणाळे, बेडसे इत्यादी लेण्या आपल्या पूर्वजांनी उभारल्या होत्या. कोकण दरवाजा या घाटरस्त्याच्या रक्षणाकरिता राजमाची हा किल्ला उभारला गेला. येथील तुंग व तिकोना हे किल्ले पवन मावळच्या रक्षणाकरिता उभारले गेले. कोराईगड हा किल्ला कोर बारसे या मावळचा भक्कम रक्षक होता.

निसर्गसौंदर्याने नटलेल्या या प्रदेशात सर्वकाही आहे. खरंतर हा प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो कारण कुठे नसते तेवढे तलाव या परिसरात आहेत यामध्ये आय. एन. एस. शिवाजी, लोणावळा तलाव, वळवण तलाव, भुशी तलाव, पवना तलाव, आंध्र तलाव, तुंगार्ली तलाव, शिरोटा तलाव, पळसदरी तलाव, असे आणखी कितीतरी छोटे व मोठे तलाव येथे आहेत. 

तसेच खडसांबळे, ठाणाळे, गंभीरनाथ, कार्ले, भाजे, तिकोना, इत्यादी लेणीसमूह व लोहगड, राजमाची, कोराईगड इत्यादी किल्ले या परिसरात आहेत. येथील खंडाळा दरी, नागफणी, वाघदरी, सिंहदरी ही स्थळे सुद्धा प्रेक्षणीय आहेत. भारताची आर्थिक राजधानी मुंबई व सांस्कृतिक राजधानी पुणे यांना जोडणारा मार्ग येथूनच गेल्याने पर्यटकांची येथे नेहमीच वर्दळ असते. मुंबईहून लोणावळ्याचे अंतर १०२ किलोमीटर तर पुण्यापासून ६५ किलोमीटर आहे. कुठल्याही ऋतूंतील  सहलींसाठी लोणावळा व खंडाळा हा पर्याय उत्तम आहे.