श्री शिवाजी स्फूर्ती केंद्र व ध्यान केंद्र - श्रीशैलम आंध्रप्रदेश

या वास्तूचे एकूण दोन मुख्य भाग असून एक विभाग स्फूर्ती केंद्र म्हणून ओळखला जातो तर दुसरा ध्यान केंद्र म्हणून.

श्री शिवाजी स्फूर्ती केंद्र व ध्यान केंद्र - श्रीशैलम आंध्रप्रदेश
श्री शिवाजी स्फूर्ती केंद्र व ध्यान केंद्र - श्रीशैलम आंध्रप्रदेश

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मराठीच नव्हे तर समस्त भारतीयांचे श्रद्धास्थान आहे व याची प्रचिती देणारे एक स्थळ म्हणजे आंध्रप्रदेश राज्यातील श्री शिवाजी स्फूर्ती केंद्र व ध्यान केंद्र. 

आंध्र प्रदेशातील श्रीशैलम येथे ही भव्य वास्तू असून ती पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात.

दक्षिण दिग्विजय मोहिमेत महाराजांनी श्रीशैलम येथे भेट देऊन मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मदत केल्याने आणि दक्षिणेतील नागरिकांना परकीय जाचातून मुक्त केल्याचे स्मरण म्हणून या वास्तूची निर्मिती करण्यात आली आहे.

या वास्तूचे एकूण दोन मुख्य भाग असून एक विभाग स्फूर्ती केंद्र म्हणून ओळखला जातो तर दुसरा ध्यान केंद्र म्हणून.

स्फूर्ती केंद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील शिवजन्म, स्वराज्याची शपथ, जिजामातांचा उपदेश, स्वराज्यकार्याची सुरुवात, आरमाराची स्थापना, अफजलखान वध, पावनखिंड, शाहिस्तेखानाची फजिती, मुरारबाजी, आग्रा प्रसंग, तानाजी मालुसरे, समर्थ भेट,  राज्याभिषेक, दक्षिण दिग्विजय, कुतुबशाहाची भेट, येसाजी कंक, आकण्णा व मादण्णा यांच्याकडे भोजन, श्रीशैलम दर्शन, मंदिराचा जीर्णोद्धार, बालाजी दर्शन, व्यंकोजीराजे यांची भेट आदी महत्वपूर्ण घटना भित्तिचित्रांच्या माध्यमातून मांडण्यात आल्या आहेत. 

ही भित्तिचित्रे इतक्या प्रभावी पद्धतीने निर्माण करण्यात आली आहेत की ती पाहून महाराजांच्या कार्याचा संपूर्ण आलेख आपल्या समोर उभा राहतो.

वास्तूच्या मध्यभागी महाराजांचा प्रशस्त दरबार असून मध्यभागी महाराज, उजव्या बाजूस जिजामाता आणि राजाराम महाराज, डाव्या बाजूस संभाजी महाराज आणि समोर दोन्ही दिशांना अष्टप्रधान यांच्या भव्य दिव्य मूर्ती आहेत.

स्फूर्ती केंद्राच्या शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्यान मंदिर असून याच ठिकाणी महाराजांचे तब्बल दहा दिवस वास्तव्य होते.

या स्थळी महाराजांनी ध्यान साधनेत काही काळ व्यतीत केल्याने येथे महाराजांचे ध्यान केंद्र निर्माण केले गेले आहे.

ध्यान केंद्रात मध्यभागी महाराजांची ध्यानमुद्रेतील अतीशय रेखीव मूर्ती असून मूर्तीतले भाव अतिशय जिवंत आहेत.

केंद्रातील चार कोपऱ्यांत महाराजांच्या जीवनातील चार महत्वाचे किल्ले म्हणजे शिवनेरी, राजगड, प्रतापगड आणि रायगड यांच्या भव्य प्रतिकृती निर्माण केल्या गेल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून सर्वांनाच स्फूर्ती मिळते व श्रीशैलम येथील महाराजांचे स्फूर्ती केंद्र व ध्यान केंद्र पाहून खऱ्या अर्थी स्फूर्तीत भर पडते.