मोरोपंत त्रिंबक पिंगळे - स्वराज्याचे मुख्य प्रधान

मोगलानी ज्यावेळी इखलासखान आणि दिलेरखान यांना स्वराज्यावर पाठवले होते त्यावेळी प्रतापराव गुजर आणि मोरोपंत यांनी साल्हेर येथे मोगलांचा पाडाव केला.

मोरोपंत त्रिंबक पिंगळे - स्वराज्याचे मुख्य प्रधान
मोरोपंत त्रिंबक पिंगळे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील मुख्य प्रधान अर्थात पेशवा या पदाची जबाबदारी पार पाडणारे एक कर्तबगार पुरुष म्हणजे मोरोपंत त्रिंबक पिंगळे. 

मोरोपंत हे त्रिंबक यांचे पुत्र असून त्रिंबक हे शहाजी महाराजांचे निष्ठावंत सहकारी होते. शहाजी महाराज आदिलशाही दरबारी असताना त्यांना आदिलशहाकडून कोलार, बंगलोर, उसकटा, वालापूर आणि शेरा हे पाच परगणे प्राप्त झाले होते त्या परगण्यांवर शहाजी महाराजांनी त्रिंबक यांची नेमणूक केली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या काळात झाला त्याच काळात मोरोपंतांचाही जन्म झाला होता व शहाजी महाराज आणि त्रिंबक यांच्या योगे शिवाजी महाराज आणि मोरोपंत यांची बालपणापासून मैत्री झाली. 

शिवरायांनी स्वराज्य कार्याची सुरुवात केली त्यावेळी त्यांनी पेशवे पदाची जबाबदारी शामराज नीलकंठ यांचेकडे दिली होती मात्र सिद्दीवरील मोहिमेत शामराज निळकंठ यांच्यावर एका क्षणी सिद्दी बलवत्तर झाला असताना मोरोपंत पिंगळे यांनी सिद्दी फत्तेखानावर चाल करून त्याचा पराभव केल्याने शिवरायांनी पेशवेपदाची जबाबदारी मोरोपंत यांचेकडे सोपवली.

मोरोपंतांनी पेशवेपदावर कार्यरत असताना अनेक पराक्रम गाजवले. जावळी, शृंगारपूर आदी मोहिमांमध्ये त्यांनी मोठा पराक्रम गाजवल्याचे उल्लेख आढळतात. १६५६ साली प्रतापगड किल्ल्याची उभारणी करण्याचे काम महाराजांनी मोरोपंत यांचेकडे दिले होते. प्रतापगड किल्ल्यावर भवानी मातेचे मंदिर उभारण्यासाठी सुद्धा मोरोपंत यांनी विशेष प्रयत्न केले होते.

छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी आग्रा येथे गेले त्यावेळी त्यांनी मोरोपंत, अण्णाजी दत्तो, प्रतापराव गुजर आणि निळो सोनदेव यांच्याकडे स्वराज्याकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली होती.

मोगलानी ज्यावेळी इखलासखान आणि दिलेरखान यांना स्वराज्यावर पाठवले होते त्यावेळी प्रतापराव गुजर आणि मोरोपंत यांनी साल्हेर येथे मोगलांचा पाडाव केला.

१६७४ साली शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला त्यावेळी सुद्धा मुख्य प्रधान या अष्टप्रधानांतील सर्वोच्च अशा पदाचा मान मोरोपंत यांच्याकडेच होता. 

मोरोपंत पिंगळे यांची मुद्रा पुढील प्रमाणे होती, श्री शिवचरणी तत्पर त्र्यंबकसूत मोरेश्वर

छत्रपती शिवाजी महाराजांचे १६८० साली रायगड किल्ल्यावर देहावसान झाल्यावर छत्रपती संभाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील मुख्य प्रधान म्हणून मोरोपंत यांनी काही काळ काम पाहिले मात्र राजद्रोहाच्या कटात सामील असल्याच्या कारणावरून त्यांचे पद काढून घेण्यात आले व त्यांचे पुत्र निळो मोरेश्वर यांच्याकडे हे पद मोरोपंत यांच्या मृत्यूनंतर सोपवण्यात आले.

मोरोपंत पिंगळे यांना निळो मोरेश्वर आणि बहिरो मोरेश्वर असे दोन पुत्र असून निळो मोरेश्वर हे छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात पेशवेपदी होते तर बहिरो मोरेश्वर हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळात पेशवेपदी होते. बहिरोपंत यांच्यानंतर पिंगळे घराण्याकडे असलेला पेशवेपदाचा वारसा श्रीवर्धनच्या भट घराण्याकडे गेला.