कोकणातील लाईटहाउस पर्यटन

महाराष्ट्राला लाभलेला ७५० कि.मी. चा समुद्रकिनारा पर्यटकांना आता भुरळ पाडतो आहे. समुद्र म्हटले की ओघानेच कोकण हा प्रांत आलाच. सागरी महामार्ग, कोकण रेल्वे, कोकणातल्या सड्यावर दिसणारी कातळ खोद-चित्रे, सुंदर समुद्रकिनारे आणि तिथे होणारे साहसी खेळ यामुळे कोकणात पर्यटनाच्या विविध संधी आणि सुविधा निर्माण झालेल्या आहेत. यात अजून एका गोष्टीची भर पडेल ती म्हणजे दीपगृहांचे पर्यटन.

कोकणातील लाईटहाउस पर्यटन
लाईटहाउस पर्यटन

समुद्रातून मार्गक्रमण करणाऱ्या जहाजांना मार्गदर्शन करण्यासाठी ही दीपगृहे (लाईटहाउस) बांधली गेली. ही दीपगृहे पर्यटकांच्या दृष्टीने कायम लांबच राहिली. कदाचित पूर्वी काटेकोर नियमांमुळे यांचे दर्शन फक्त लांबूनच होत असेल. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. ही दीपगृहे सर्वसामान्य लोकांना ठराविक वेळेत बघता येतात. अगदी आतमध्ये वरपर्यंत जाऊन पाहता येतात. त्यांचे कामकाज कसे चालते हे तिथे आपल्याला सांगितले जाते. रत्नागिरी हे कोकणातील देखणे गाव आता पर्यटनाच्या नकाशावर हल्ली अगदी ठसठशीतपणे उठून दिसते. रत्नदुर्ग, आजूबाजूचे देखणे समुद्रकिनारे, हापूस आंबा, स्कूबा डायव्हिंग सारखे साहसी खेळ यासाठी रत्नागिरी प्रसिद्ध होते आहे.

रत्नागिरीचे दीपगृह इ.स. १८६७ साली इंग्रजांनी बांधले. याची उंची ९० फूट असून त्यावर १२ फुटाचा दिव्याचा प्रकाश पाडणारा मनोरा आहे. संध्याकाळी ४ ते ५ या वेळातच हे दीपगृह सर्वसामान्यांना पाहता येते. प्रवेश फी १० रुपये आणि कॅमेऱ्यासाठी २० रुपये आकारले जातात. काळ्या आणि पांढऱ्या आडव्या पट्ट्यांनी रंगवलेला हा मनोरा. याच्यावर जी दिव्याची बत्ती असते तिच्या डोक्यावर केशरी रंगाचीच टोपी असली पाहिजे असे संकेत आहेत. मनोऱ्याची रंगसंगतीसुद्धा ठरलेली असते. काळा, पांढरा आणि केशरी हे रंगच प्रामुख्याने दीपगृहासाठी वापरले जातात. याच रंगांची संगती साधून दीपगृह बांधले जाते. क्वचितप्रसंगी सबंध पांढऱ्या रंगाचे दीपगृह पाहायला मिळते. या रंगांच्या रंगसंगतीवरून त्यांचे ठिकाण दूर समुद्रातून सुद्धा ओळखले जाते.

रात्रीच्या वेळी या दीपगृहातून लांबवर पडणारा प्रकाशाचा झोत फारच आकर्षक दिसतो. त्यासाठी फक्त १५० वॅटचे २ दिवे काम करतात. परंतु त्यांच्या चारही बाजूंनी लावलेल्या काचपट्टी लोलकामुळे (ग्लास प्रीझम्स) प्रकाशाचा झोत तयार होतो आणि तो २५ ते ३० कि.मी. इतका लांबवर पडतो. रत्नागिरीच्या दीपगृहातून प्रत्येक १० सेकंदात २ वेळा याचे आवर्तन होते. ही आवर्तने जागतिक नियमांनुसार ठरलेली असतात. अशा प्रत्येक दीपगृहातून पडणाऱ्या प्रकाशझोताची आवर्तने ठरलेली असतात. समुद्रातून जाणाऱ्या जहाजावरील लोकांकडे या आवर्तनांचा तक्ता असतो. त्यावरून आपण सध्या कुठल्या बंदराच्या जवळून प्रवास करतो आहोत याचे ज्ञान दर्यावर्दी मंडळींना होते.

रात्री किती वाजता ही दीपगृहे कार्यरत होणार आणि सकाळी किती वाजता बंद होणार याचे प्रत्येक महिन्याचे वेळापत्रक ठरलेले असते.

- आशुतोष बापट