शिंद - एक ऐतिहासिक गावं

बाजीं प्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथिला त्यांच्या जन्मगावी शिंदला जाऊन त्यांना  अभिवादन करण्याचा काही वर्षापासून मी प्रामाणिक प्रयत्न करीत असतो. यावेळी सुद्धा शिंद येथे या निमित्ताने जाण्याचा योग आला - सुरेश नारायण शिंदे

शिंद - एक ऐतिहासिक गावं

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

महाराष्ट्रातील बहुतेक गावांना तेथे घडलेल्या ऐतिहासिक घटनांमुळे एक वेगळी ओळख मिळाली आहे. ग्रामीण भागात असलेल्या ऐतिहासिक वास्तू ह्या तत्कालीन घटनांचे साक्षीदार म्हणून आपल्या पूर्वजांचा इतिहास नक्कीच कथन करीत असतात. महाराष्ट्राचे ऐतिहासिक वैभव ग्रामीण भागात जागोजाग दिसून येते. इतिहासकाळात ग्रामीण भागात अनेक संत, महापुरुष, कलाकार, पराक्रमी शूरवीर निर्माण झालेले काळपुरुषाने पाहिले आहे. शिवकाळात ज्यांनी राष्ट्र संवर्धन करताना आपले अलौकिक शौर्य, पराक्रम व बलिदान दिलेले आहे अशा गावांची सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात असावी कारण छत्रपति शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरूवात केली ती सह्याद्रीच्या निसर्गसंपन्न डोंगररांगांनी व्यापलेल्या भोर तालुक्यातून. देव, देश व धर्म याचे रक्षणार्थ छत्रपतिंच्या प्रेरणेने आपल्या प्राणांची आहुती देणारे अनेक नररत्न या भूमीत जन्माला आले.   

काल दि.१३ जुलै २०२१ रोजी बांदल सेनेचे नेतृत्व करणारे नररत्न बाजीप्रभू, फुलाजीप्रभू व बांदल सेनेतील अज्ञात नरवीरांची ३६१ वी पुण्यतिथि. बाजींच्या पुण्यतिथिला त्यांच्या जन्मगावी शिंदला जाऊन त्यांना  अभिवादन करण्याचा काही वर्षापासून मी प्रामाणिक प्रयत्न करीत असतो. सुरूवातीला १३ जुलैला शिंद या गावात जन्म घेतलेल्या नररत्नाला अभिवादन करण्यासाठी गेलो होतो ते बाजींचे वंशज असलेल्या निलेश व संदेश देशपांडे यांच्या समवेतच. काही वर्षे झाली आम्ही एकत्रच जात असतो तेव्हा या वर्षी देखील आम्ही सोबतच जाण्याचे निश्चित केले. सकाळी १० वा. जाण्याचे निश्चित केले मात्र सकाळी ६ वाजता देशपांडे कुटुंबियांनी शिंद गावी जाऊन अभिषेक इत्यादी विधी केला व परत भोरला येण्यास काहीसा वेळ झाला. त्यानंतर दोन्ही बंधू सोबत सकाळी ११:३० वा.भोरहून शिंदकडे निघालो.   

शिंद गावात जाऊन छत्रपति शिवाजी महाराज, बाजी,फुलाजी व बांदल सेनेतील नरवीरांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. डोळे मिटून अभिवादन करताना १३ जुलै १६६० ला गजापूरच्या घोडखिंडीतील प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. परिस्थिती पूर्णपणे विपरीत असताना धन्याबद्दल असलेली निष्ठा, साहस व समर्पणाची भावना काय करु शकते हे बाजीप्रभू, फुलाजीप्रभू व बांदल सैन्याने जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदविले. शिंद ग्रामस्थांनी कोरोना काळामुळे सकाळी १० वा. स्थानिक लोक प्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरा केला होता. मग आम्ही बाजींच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करण्यासाठी गेलो. बाजींचा पुतळा गाव प्रवेश करण्याच्या सुरूवातीला एका बाजूस असून त्याच्या समांतर दुसऱ्या बाजूला घडीव कातळातील तत्कालीन देखणे सती स्मारक आहे. अज्ञात असलेल्या सतीस मनोभावे वंदन केले. आपल्या पतीने रणांगणावर पराक्रम गाजवून धन्यासाठी व देशासाठी देह ठेवल्याने ती पतिव्रता पतीसोबत ह्या जगाचा निरोप घेते. नंतर बाजींच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून वंदन केले. 

पुतळ्याच्या मागील बाजूस असलेल्या पूर्वाभिमुखी शंभू महादेवाचे मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मग मंदिराच्या बाहेरील बाजूला अस्ताव्यस्त स्थिरावलेल्या घडीव शिल्पांना पाहू लागलो. एका भव्य दगडावर पिंडी कोरल्याचे दिसून आले. बाजूला वीरगळ, समाधि शिल्प व इतरहि काही पाषाण शिल्प आपल्याला काहीतरी सांगतायेत असे जाणवू लागले. पर्जन्यकाळ सुरू झाला असल्याने मंदिर परिसरात हिरवीगार झुडुपे व गवत वाढले आहे, त्यामुळे त्या शिल्पांचे नीटसे अवलोकन करता येत नाही. मंदिराच्या पाठीमागील बाजूस सुमारे चार फूटाचा कोरीव काम केलेला दगडी स्तंभ विसावला होता. अप्रतिम कलाकारी केलेला तो अखंड स्तंभ हा पुरातन शिवमंदिराचा असल्याचे शिंद गावातील स्थानिक जेष्ठ नागरिक सांगतात. पूर्वीचे शिवमंदिर लहान असल्याने स्थानिक दानशूर नागरिकांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून हे मंदिर काही वर्षापूर्वी निर्माण केले. त्या काळातील लहान असलेले मंदिर किती शिल्पकलेने तयार केले असेल याची प्रचिती तो कलाकुसर केलेला दगडी स्तंभ पाहिल्यावर आपल्या सहजच लक्षात येईल. 

लोक संस्कृतीचा विकास हा जलसाठ्यांच्या बाजूला प्रामुख्याने होत असतो असे नागरीवस्तीच्या स्थानांवरून लक्षात येते. तलाव, नदी किंवा ओढा यांच्या काठावर नागरीवस्ती निर्माण झालेल्या आहेत. शिंद गावच्या शेजारून एक ओढा वाहतो, त्याच्या शेजारीच सती स्मारक, शिवमंदिर आहे. ओढा काठावर स्मशानभूमी, जवळच शिवमंदिर व समाधिस्थळ असणे असा ग्रामीण जिवनशैलीचा पायंडा असतो, त्यास शिंद देखील अपवाद नाही. शिवमंदिर परिसरातील पाषाण शिल्पापैकी काही पुरातन मंदिराची असतील मात्र उर्वरित पाषाण शिल्प पराक्रमी योद्ध्यांच्या समाधिची असल्याची शक्यता आहे. वीरगळ, सती स्मारक व अन्य शिल्पांचा इतिहास अपरिचित असला तरी त्यांचे कर्तृत्व ते शिल्प नक्कीच कथन करीत असणार !     

परतीच्या वाटेवर असताना मनात अनेक विचार सुरू होते त्यातील काही व्यक्त केले तर काही अव्यक्त राहिले. गवडी गावात रस्त्याच्या कडेला समाधि वास्तू समान काहीसे दृष्टीस पडले आणि मनात विचार आला की, शाहजी महाराजांनी बाल शिवबासोबत बंगलूरहून पाठविलेल्या तुकोजी व भैरोजी चोर, यापैकी कोणत्यातरी योद्ध्यांची समाधि तर नाही ना ? मी मात्र अनभिज्ञ असलो तरी इतिहास नक्कीच नाही.   

- © सुरेश नारायण शिंदे, भोर ([email protected])