राजमाता जिजाऊंचं पाचाड

पाचाड गावातील राजमाता जिजाऊंचा राहता वाडा म्हणजे पाचाडचं वैभव. तसा तो भुईकोट किल्लाच. एक हेक्टर जमीनीत दक्षिणोत्तर पसरलेल्या वाड्यात जिजाऊंचे चार पाच वर्षे वास्तव्य होतं. - श्री. रामजी कदम

राजमाता जिजाऊंचं पाचाड

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

राजमाता जिजाऊंचे पाचाड! पाचाड गावाला यापेक्षा वेगळी ओळखच नसावी कारण ज्या महाराष्ट्रकन्येने जिथं अखेरचा श्वास घेतला त्या पावनपवित्र भूमीत राहणारे भाग्यवान. जितका मान श्रीरायगडाला , तितकाच सन्मान आपल्या पाचाडभूमीला.

पाचाड शब्दाची सरळसोपी व्याख्या पाच आड. आजही होळकरबाव, तक्क्याची विहीर, आणखी एक पाचाड कोटातील विहीर अशा पाच सहा विहीरींचं गाव म्हणजे पाचाड. खरं म्हणजे हे गाव अश्मयुगीन कालखंडातील असल्याची खूण म्हणजे वाघबीळात सापडलेली दगडी हत्यारे. ज्या वाघबीळाला ब्रिटिशांनी गन्स ऑफ पाचाड असंही संबोधलं होतं. पाचाडहून रायगडाकडे जाताना खिंडीत 5 ते 7 लाख वर्षापूर्वीच्या अश्मयुगीन मानवांचं निवासस्थान असलेली ही गुहा तीन तोंडाची आहे. नैसर्गिक सुरक्षा लाभल्याने शिवकाळात टेहळणीची चौकी म्हणून वापर केला जात असे.

वाघबीळाकडून पुन्हा पाचाडच्या दिशेने येताना उजवीकडे नकट्याचा माळ पाहायला मिळतो. तिथं भग्न शिवपिंडी, दोणी, देवदेवतांच्या मूर्ती, आहेत. नकट्याच्या माळाबद्दल एक आख्यायिका देखील सांगितली जाते. छत्रपती संभाजी महाराजांना पन्हाळ्यावर अटक करायला जाताना कटकारस्थानी मंत्र्यांनी एका पाईकाला आज्ञा दिली कि जर यदाकदाचित शंभूराजे रायगडी आलेच तर त्यांना गडावर जाण्यापासून रोखायचे. याचवेळी छत्रपती शंभूराजे या माळाच्या ठिकाणी पोहोचताच त्या आज्ञाधारक सैनिकाने त्यांना अडवले. राग अनावर होऊन त्या पाईकाचे नाक कापल्याने त्या जागेला आजही नकट्याचा माळ असे बोलले जाते. एक अनामिक वीराचा समाधी चौथराही तिथं पाहायला मिळतो

आत्ताच्या देशमुख हाॅटेलसमोर पायऱ्यांची विहीर जिला होळकरबाव असं बोलले जाते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कारकीर्दीत महाराष्ट्रात अनेक गावामध्ये बारव  म्हणजेच बांधीव विहिरी बांधण्यात आल्या. त्यापैकी ही इंग्रजी L आकाराची विहीर स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. शेडगे उपहारगृहाच्या शेजारी एक हनुमान मंदिर आहे. शिवकाळातील वेशीवरचा मारूती आहे तो. कारण जिजाऊंचा वाडा, बौध्दवाडी आणि मूळ पाचाड गावाची वेस इथं आहे. परंतु आत्ता हाॅटेल, दुकानं आणि नवीन घरांच्या गर्दीत वेशीवरचा मारूती मात्र दुर्लक्षित झालाय. पाचाडचं शेडगे घराण्यातील व्यक्ती बंजरंगबलीची पूजा करतात.

पाचाड गावातील राजमाता जिजाऊंचा राहता वाडा म्हणजे पाचाडचं वैभव. तसा तो भुईकोट किल्लाच. एक हेक्टर जमीनीत दक्षिणोत्तर पसरलेल्या वाड्यात जिजाऊंचे चार पाच वर्षे वास्तव्य होतं. रायगडावरील थंड बोचरी हवा जिजाऊंना सोसत नव्हती म्हणून महाराजांनी बांधलेला हा वाडा. तीनदा हा कोट उध्वस्त केला गेला तरीही त्याचं मराठेशाहीतील रूप मनात भरतं. हवालदाराची चौकी, सबनीसाचा घरटा, राजसदर, दस्तुरखुद्द जिजाऊंचं निवाससस्थान, लोडबाव, पश्चिमेला असलेली पागा, तलाव हे सारं आजही पाहता येतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकानंतर अवघ्या अकरा दिवसांनी जिजाऊंना इथंच देह ठेवला. कधीही इथं गेलात तर सदरेच्या मागे असलेल्या भव्य इमारतीच्या चौथऱ्यावर अनवाणी जा. तिथलं पावित्र्य राखा. जमलंच तर तिथली माती कपाळी लावा. काही शतकांपूर्वी आमच्या छत्रपतींची माऊली तिथं विसावली आहे. मावळेहो मुजरा करा.

जशी चंपकेशी खुले फुल्ल जाई ! भली शोभली ज्यास जाया जिजाई असं जयराम पिंडे या कवींनी ज्यांचं वर्णन केलं आहे त्या राष्ट्रमातेचं स्मारक वृंदावनही याच पाचाड मध्ये आहे. या स्मारक वृंदावनाच्या समोरील भागात भग्न शिवमंदिराचे अवशेष दिसतात. शिवपिंडी, नागशिळा, गणपती बाप्पाची मूर्ती पाहायला मिळते. या स्मारकाच्या पिछाडीपासून ते थेट कोंझर रस्त्यापर्यंत जो परिसर आहे त्याला स्थानिक लोक घोडधाव म्हणतात शिवकाळात साधारण दहा हजारांचं घोडदळ, पायदळ या परिसरात सज्ज असायचं.

पाचाडचं ग्रामदैवत श्री सोमजाई. शिवकाळापासून या देवतेला मान आहे. मंदिरासमोर काही समाधीशिळा आहेत. मराठा कालखंडातील कुणा तोलामोलाच्या सरदारांची स्मारकशिळा असावी असा अंदाज करता येतो.

पाचाड गावात घाडगे, कदम, पवार, शेडगे, पाचाडकर, गायकवाड,  मुजावर या आडनावाची कुटुंब राहतात. शेडगे घराण्याकडे पाचाडच्या भुईकोटाचं कारभारी पद होतं. श्रीपती शेडगे, तुकाराम शेडगे आणि आत्ता आमचा मित्र मंगेश शेडगे अशा कित्येक पिढ्या रायगडच्या सेवेत रूजू आहेत. पाचाड मध्ये पेठ असल्याचाही उल्लेख कागदपत्रांत सापडतो. पेशवेकाळात गुजर वाणी इथं स्थायिक झाल्याची नोंद सापडते.

पाचाडातून कोंझरगावाकडे जाताना डावीकडे एक चौथरा लक्ष वेधून घेतो. हीच ती मालसावंताची चौकी. गोवेलेच्या मालसावंतानी महाराजांशी एकनिष्ठेने स्वराज्यकार्य केले. याच चौकीपासून पश्चिमेकडील शेताच्या बांधाबांधावरून गेल्यानंतर एका ओहोळाच्या शेजारी अतिशय सुबक, भव्य अशी समाधी दिसते. हीच ती सावंताची समाधी. इतक्या आडरानामध्ये अशी नक्षीकाम केलेली समाधी कशी असू शकते हा प्रश्न  आपल्याला पडतो. रायगडाला जाणारे शेकडा 90 टक्के शिवभक्त हे पाहत नाहीत. समाधीच्या शेजारीच भव्य जोते आणि शिवपिंड दिसते. शिवकाळातील त्या भव्य जोत्यावरून चौकीपहारा किती महत्त्वाचा होतो हे लक्षात येतं. यालाच सावंताचं मेट असंही बोललं जातं. पाचाडच्या या परिसरात पूर्वी अन्नछत्रही चालत असे.

असं हे ऐतिहासिक पाचाड अनुभवण्यासाठी तिथला कानाकोपरा कधीतरी भटकंती करा. नाचणटेपाची गुहा, होळकरबाव, पाचाडचा भुईकोट, वेशीवरचा मारूती, नकट्याचा माळ, सावंतांचं मेट सगळं याची देही याची डोळा नजरेत सामावून घ्या.

- श्री. रामजी कदम  (माणगाव रायगड)