सरखेल तुळाजी आंग्रे - मराठी आरमाराचे रक्षक

१७४२ साली तुळाजी आंग्रे यांनी सिद्दीपासून अंजनवेल हा किल्ला जिंकल्याने छत्रपती शाहू महाराजांनी तुळाजी यांना सरखेल ही पदवी प्रदान केली.

सरखेल तुळाजी आंग्रे - मराठी आरमाराचे रक्षक
सरखेल तुळाजी आंग्रे

मराठ्यांच्या आरमारी इतिहासात आंग्रे घराण्याचे मोठे योगदान आहे. आंग्रे घराण्याचे सर्वात प्रसिद्ध पुरुष सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची गाथा त्यांच्या पुत्रांनी सुद्धा पुढे सुरु ठेवली व समुद्रकिनाऱ्यावर आपला दबदबा कायम ठेवला.

सरखेल कान्होजी आंग्रे यांना सेखोजी, मानाजी, संभाजी, तुळाजी, येसाजी व धोंडाजी असे सहा पुत्र असून या सर्वांनी मराठ्यांच्या इतिहासात आपले योगदान दिले. सरखेल कान्होजी आंग्रे यांचे चौथे पुत्र तुळाजी आंग्रे यांच्याविषयी या लेखातून जाणून घेऊ.

तुळाजी आंग्रे यांचा जन्म कुठल्या साली झाला याची निश्चित माहिती मिळत नसली तरी त्यांच्या आईचे नाव गहनीबाई असल्याचा उल्लेख आढळतो. सरखेल कान्होजी आंग्रे यांचे निधन झाल्यावर त्यांचे पुत्र सेखोजी यांनी आरमाराची धुरा समर्थपणे सांभाळली मात्र सेखोजी यांचे निधन झाल्यावर १७३५ सालापासून त्यांचे भाऊ मानाजी आणि संभाजी यांच्यात गृहकलह सुरु झाला आणि तुळाजी आंग्रे यांनी संभाजी यांचा पक्ष धरला.

आंग्रे घराण्यात कलह सुरु असताना मानाजी आंग्रे कुलाब्यास, तुळाजी सुवर्णदुर्गास आणि संभाजी विजयदुर्गास अशी व्यवस्था होती. संभाजी आंग्रे यांनी आपले कारभारी म्हणून तुळाजी यांची निवड केली होती.

१७३४ साली तुळाजी आंग्रे संभाजी आंग्रे यांच्यासहित सिद्दीकडून अंजनवेल किल्ला जिंकण्याच्या मोहिमेवर गेले होते. आंग्रे घराण्यातील गृहकलहात पेशव्यांनी मानाजी आंग्रे यांचा पक्ष धरल्याने संभाजी व तुळाजी यांचे पेशव्यांशी वैर उत्पन्न झाले आणि १७४० साली हिराकोट येथे मानाजी आंग्रे आणि पेशवे यांचे संयुक्त सैन्य विरुद्ध संभाजी आंग्रे आणि तुळाजी आंग्रे अशी मोठी लढाई होऊन त्यामध्ये तुळाजी जखमी होऊन कैदेत सापडले मात्र लवकरच त्यांची सुटका करण्यात आली.

१७४१ साली संभाजी आंग्रे यांचे निधन झाल्यावर तुळाजी आंग्रे आणि पेशवे यांच्यात मोठे वैर निर्माण झाले मात्र तुळाजी आंग्रे यांनी आपल्या पराक्रमाने मराठ्यांच्या आरमाराचा दबदबा कायम ठेवल्याने छत्रपती शाहू महाराजांची त्यांच्यावर चांगली मर्जी होती.

१७४२ साली तुळाजी आंग्रे यांनी सिद्दीपासून अंजनवेल हा किल्ला जिंकल्याने छत्रपती शाहू महाराजांनी तुळाजी यांना सरखेल ही पदवी प्रदान केली. 

छत्रपती शाहू महाराजांचे निधन झाल्यावर मात्र पेशव्यांना तुळाजी यांच्याविरोधात पाऊल उचलण्याची संधी प्राप्त झाली. तुळाजी यांनी आपल्या कार्यकाळात इंग्रजांवर मोठा वचक ठेवल्याने इंग्रज सुद्धा तुळाजी यांच्या विरोधात चांगल्या संधीची वाट पाहत होते आणि पेशव्यांच्या मनात तुळाजी यांच्याविषयी एवढा दुराग्रह होता की त्यांनी मागील पुढील विचार न करता तुळाजी यांच्याविरोधात इंग्रजांची मदत घेऊन संयुक्तपणे त्यांच्या आरमारावर हल्ला केला.

सुरुवातीस पेशव्यांनी तुळाजी यांच्याकडे रत्नागिरी आणि सुवर्णदुर्ग हे दोन किल्ले मागितले त्यावेळी तुळाजींनी 'सुईच्या अग्राइतकी पण जमीन देणार नाही' या शब्दांत पेशव्यांची मागणी धुडकावून लावली यानंतर १७५५ साली पेशवे आणि इंग्रज यांनी संयुक्तपणे तुळाजी यांच्या आरमारावर हल्ला केला आणि तुळाजी यांचे काही किल्ले ताब्यात घेऊन तुळाजींच्या आरमाराचे बरेचसे नुकसान केले.

या घटनेनंतर तुळाजी यांनी पेशव्यांसोबत तह करून त्यांना ठराविक खंडणी देणे सुरु केले मात्र काही काळाने खंडणी आली नाही म्हणून १७५६ साली पेशवे आणि इंग्रज यांनी मोठ्या शक्तीनिशी तुळाजी आंग्रे यांच्या आरमारावर हल्ला करून ते आरमार पूर्णपणे जाळून टाकले व ही घटना मराठ्यांच्या आरमारी इतिहासातील अतिशय दुर्दैवी घटना मानली जाते कारण या घटनेनंतर मराठ्यांच्या आरमाराचे सुवर्णयुग खऱ्या अर्थी समाप्त झाले व दुर्दैवाने ही घटना मराठी राज्याचे पंतप्रधान असलेल्या पेशव्यांकडून घडली होती.

तुळाजी आंग्रे यांचा पराभव झाल्यावर त्यांना कैद करण्यात येऊन चंदन वंदन, सोलापूर, राजमाची, विसापूर, नगर, चाकण, देवगिरी इत्यादी किल्ल्यांमध्ये कैद भोगावी लागली. कैदेत असताना तुळाजी आंग्रे यांचा संपूर्ण परिवार सुद्धा यांच्यासहित कैदेत होता. १७८७ तुळाजी आंग्रे यांचा सोलापूरच्या किल्ल्यात कैदेतच मृत्यू झाला आणि आंग्रे घराण्याच्या पराक्रमाचा वारसा जपणारा एक दर्यावर्दी स्वकियांविरोधातील लढाईमुळे अस्तंगत झाला.

समकालीन इंग्रजांनी तुळाजी आंग्रे यांचे पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे, तुळाजी निमगोरे, उंच, भव्य, देखणे आणि अतिशय रुबाबदार असून त्यांना पाहिल्यावर मूर्तिमंत धैर्याची कल्पना मनी येते. तुळाजी यांचा पराक्रम सुद्धा त्यांच्या रूपास साजेसा होता. कोणतेही जहाज त्यांच्या तावडीतून सुटत नसे. इंग्रज त्यांना थरथर कापत. तुळाजी अत्यंत संपन्न आणि कुशल होते.

आरमार म्हणजे स्वतंत्र येक राज्यांगच आहे. जैसे ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे... तसेच ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र... याकरीता आरमार अवश्यमेव करावे. या शब्दात छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराचे महत्व सांगून हिंदवी स्वराज्याच्या आरमाराची उभारणी करून समुद्रावर मराठ्यांचा वचक बसवला होता आणि छत्रपती संभाजी महाराजांनंतर आंग्रे घराण्यातील पुरुषांनी हा वारसा तुळाजी आंग्रे यांच्यापर्यंत समर्थपणे चालवला. मराठ्यांच्या आरमाराचे अखेरचे रक्षक म्हणून तुळाजी आंग्रे यांचे नाव अजरामर आहे.