ठाणाळे व नाडसूर - सह्यकुशीतली टुमदार गावे | Thanale Nadsur Information in Marathi

रायगड जिल्ह्याच्या पुर्व सिमेकडील भाग ऐन सह्याद्रीच्या कुशीत वसला आहे. जिल्ह्यातल्या ज्या तालुक्यांमध्ये सह्याद्रीच्या रांगा आहेत अशांमध्ये कर्जत, खालापुर, सुधागड, माणगाव, महाड व पोलादपुर या तालुक्यांचा समावेश होतो. रायगड जिल्ह्याचा हा भाग आपल्या वैशिष्ट्यपुर्ण भौगोलिक व पर्यावरणीय वैवीधतेसाठी प्रसिद्ध आहे.

ठाणाळे व नाडसूर - सह्यकुशीतली टुमदार गावे | Thanale Nadsur Information in Marathi

Marathi Buzz Shop

Marathi Buzz Shop

एका बाजुस उत्तुंग प्रस्तर व शिखरे तर दुसरिकडे खडकाळ व सपाट व घनदाट अरण्यांनी वेढलेली खोरी असल्याने हिवाळा, उन्हाळा व पावसाळा या तिनही ऋतूंचा खरा आस्वाद या परिसरातल्या जनतेला अनुभवायला मिळतो.

रायगड  जिल्ह्याच्या सुधागड तालुक्यातील ठाणाळे व नाडसुर हि गावे सुद्धा याच दुर्गम परिसरातली. प्राचिन काळी प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या चौलहून नागोठणेमार्गे मावळात जाणार्‍या प्रमुख व्यापारी मार्गावरील महत्त्वाची केंद्रे म्हणुन ही दोनही गावे ख्यातनाम होती. चौलहून सह्याद्री मार्गे घाटमाथ्यावरिल मावळात जाणार्‍या या रस्त्याचे दोन घाटरस्ते होते एक वाघजाई व दुसरा सवाष्णी हे दोनही घाटमार्ग बोरघाटाचा वाहनमार्ग तयार होईपर्यंत वापरात होते मात्र बोरघाटातुन वाहने नेण्याची सोय झाल्याने हे जिकीरीचे मार्ग मुख्य दळणवळणास बंद झाले मात्र आजही स्थानिक नागरिकांचा व हौशी भटक्यांचाच संचार या मार्गांनी होत असतो. सातवाहन काळात याच मार्गावर ज्या लेण्या कोरण्यात आल्या त्या ठाणाळे-नाडसुर लेण्या म्हणुन प्रसिद्ध आहेत.

ठाणाळे नाडसूर लेण्या सातवाहनकाळात बांधण्यात आल्या असल्या तरी येथे प्राप्त दोन शिलालेखांमध्ये राजवंशाचा उल्लेख सापडत नाही मात्र सभागृहाच्या तीनही आंतरभिन्तींना लागून ८ भिक्षुगृहे कोरलेली आहेत व त्यापैकी एका भिंतीवर ब्राम्ही लिपीतील एक शिलालेख आहे त्यामध्ये शिवगणकपुत्र गोदत्त याने शैलगृहाकरिता देणगी दिल्याचे नमूद आहे तर दुसर्‍या एका टाक्यावरिल लेखात मित्र नामक व्यक्तिच्या देणगीचा उल्लेख कोरण्यात आला आहे याशिवाय संघरक्षीत व स्तुपसखा याचा उल्लेख आहे. पुर्वीच्या प्राचिन व्यापारी मार्गांवर व्यापार्‍यांच्या व भिक्षूकांच्या पावसाळी निवासाकरीता व ध्यानधारणेसाठी लेण्या कोरण्याची परंपरा होती. अभ्यासकांच्या मते लेण्यांच्या बांधणीचा काल इसवी सन पुर्व २ रे शतक असा ठरला आहे. अनादी काळापासून या लेण्या अस्तित्वात असल्या तरी ही लेणी खर्‍या अर्थाने प्रकाशझोतात आली सन १८९० मध्ये.

या लेण्या ऐन घाटरस्त्यावरच कोरण्यात आल्या असल्याने पायथ्यापासून लेण्यांची उंची सुमारे १००० फुट आहे. ही सर्व लेणी पश्चिमाभिमुख असून यात एक चैत्यगृह, एक स्मारक स्तुप व एकविस निवासी गृह आहेत. येथील सभागृहाच्या भिंतींवर प्राणी व मनुष्य आकृत्या कोरलेल्या आहेत. सोंडेत कमळ धारण केलेला हत्ती, पाच फण्यांचा शेषनाग, सिंहिण व छावा इत्यादी शिल्पकृती पहावयास मिळतात. या सर्व शिल्पांशिवाय अतिशय दुर्मिळ प्रकारात गणले जाणारे आणखी एक शिल्प सभागृहाच्या छतावर पहायला मिळते ते म्हणजे झुंबराचे कोरीव शिल्प. अत्यंत हुबेहुब असे हे शिल्प पाहताक्षणीच खर्‍याखुर्‍या झुंबराचा आभास निर्माण करते. ठाणाळे-नाडसूर लेण्या येथील ध्वनीशास्त्रीय चमत्कारांसाठीही प्रख्यात आहेत कारण या लेण्यांच्या भिंतींवर थाप मारल्यास मृदूंग वाजवल्याचा ध्वनी येतो.

पालीमार्गे गेल्यास ठाणाळे हे गाव नाडसूर पासून २ किमी अंतरावर आहे. नाडसूर हे गावही प्राचिन असून येथे प्राचिनत्वाचा वारसा सांगणारी अनेक स्थळे आहेत. येथील ग्रामदेवतेच्या मंदीराच्या आवारात काही विरगळी आढळतात ज्यावर विरांच्या मुर्त्या कोरलेल्या दिसून येतात याशिवाय येथिल ठाणाळे मार्गावरिल नागेश्वर हे शिवमंदीर सुद्धा प्रेक्षणीय आहे. मंदीराच्या मागेच एक विस्तीर्ण तलाव आहे जो येथील नागरिकांच्या व सवाष्णी-वाघजाई मार्गे प्रवास करणार्‍या प्रवाशांचा सोयीकरिता खोदण्यात आला असावा. सवाष्णी व वाघजाई ही नावे कशी पडली याचाही इतिहास आहे, सवाष्णी चा अर्थ सुवासिनी असा होतो, प्राचिन काळी कुणी सुवासिनी या मार्गावरुन प्रवास करत असे, तिनेच या मार्गावर प्रवास सुकर व्हावा यासाठी काही ठिकाणी पायर्‍या सुद्धा बांधल्या होत्या याच मार्गावर सवाष्णीची समाधी सुद्धा पहावयास मिळते व वाघजाई हे नाव वाघजाई या देवीवरुन पडले आहे कारण या घाटरस्त्यात वाघजाईचे मंदीर आहे तसेच काही प्राचिन मुर्त्या तिथे पहावयास मिळतात. नागेश्वर शिवमंदीराचा जिर्णोद्धार झाला असुन मंदीराच्या आवारात दोन अज्ञात समाध्या, एक गधेगळ, एक मध्ययुगिन देवनागरी शिलालेख असलेले वृंदावन तसेच काही देवतांच्या प्राचिन मुर्त्या दिसून येतात ज्यांच्यावर खर तर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. ठाणाळे नाडसून परिसराच्या इतिहासात त्यामुळे मोलाची भर पडेल. नाडसुर गावातून पश्चिमेकडे नजर टाकल्यास फार विस्तीर्ण व मोहक नजारा दृष्टीस पडतो यामध्ये उत्तरेकडे लोणावळ्यजवळील नागफणी, कोराईगड, तैलबैला, घनगड हि घाटमाथ्यावरील स्थळे तर रायगड जिल्ह्यातील सुधागड हा किल्ला दक्षीणेकडे दृष्टीपथात येतो, सुधागड येथे जाण्यासाठी जवळच्या धोंडसे गावावरुन रस्ता आहे तर बाकी स्थळे पाहण्यासाठी आपल्याला ठाणाळे गावाहून वाघजाई किंवा सवाष्णी घाटाचा मार्ग पकडून पुणे जिल्ह्यात जाणे भाग आहे. ठाणाळे नाडसूर परिसरास फार प्राचिन असा ऐतिहासिक, व्यापारी, भौगोलिक व सांस्कृतिक वारसा आहे हा वारसा दाखवणारी स्थळे परिसरात अनेक ठिकाणी आहेत मात्र या स्थळांचे सखोल संशोधन होऊन या परिसराचा लिखीत इतिहास जगासमोर आला तसेच विकासाच्या दृष्टीने या परिसरात कामे झाली तर ठाणाळे-नाडसुर परिसरास खर्‍या अर्थाने न्याय मिळेल.