करमरकर शिल्पालय सासवणे

अलिबाग येथे येणाऱ्या पर्यटकांनी सासवणे येथील करमरकर शिल्पालयास वेळात वेळ काढून भेट दिली पाहिजे. जगविख्यात शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांच्या दीडशेवर कलाकृतींचा संग्रह सासवणे येथील शिल्पालयात आहे.

करमरकर शिल्पालय सासवणे

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील सासवणे हे गावं आपल्या निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. या गावास सुंदर असा समुद्रकिनारा लाभला आहेच याशिवाय जगप्रसिद्ध शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांच्या शिल्पकृतींचा संग्रह असलेले संग्रहालय हे सासवणे गावाचे प्रमुख आकर्षण आहे. 

सासवणे हे गाव अलिबाग मांडवा रस्त्यावर आहे. अलिबागपासून १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या सासवणे येथे जाण्यासाठी रास्तेवाहतुकीच्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत तसेच मुंबईमार्गे रेवस व मांडवा या दोन गावांतून सासवणे हे गाव अनुक्रमे ८ व १० किलोमीटर आहे. 

अलिबाग येथे येणाऱ्या पर्यटकांनी सासवणे येथील करमरकर शिल्पालयास वेळात वेळ काढून भेट दिली पाहिजे. जगविख्यात शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांच्या दीडशेवर कलाकृतींचा संग्रह सासवणे येथील शिल्पालयात आहे. 

शिल्पालयातील विविध पक्षी, प्राणी, माणसांची शिल्पे मंत्रमुग्ध करणारी आहेत. विशेषतः प्लेमेट्स, शेपर्डबॉय, म्हैस, मोर, आई-मूल ही शिल्पे तर कमालीची जिवंत वाटतात.  सासवणे येथील करमरकर यांच्या बंगल्यासमोरच्या अंगणात आणि पहिल्या मजल्यावर काही कलाकृती ठेवल्या गेल्या आहेत. 

विनायक पांडुरंग करमरकर याना चित्रकला, रंगचित्रकला, प्रतिमाकारण आदींची लहानपणापासून आवड होती. पुढे त्यांनी या क्षेत्रात मोठी कीर्ती संपादन केली. १९२८ मध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचा चार मीटर उंचीचा अश्वारूढ ब्रॉन्झ धातूमध्ये तयार केलेला अखंड पुतळा तयार केला. अशा प्रकारचा एकसंध असलेला हा एकमेव पुतळा आहे.

या पुतळ्याने करमरकर यांना जागतिक कीर्ती प्राप्त करून दिली. याशिवाय त्यांनी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, विठ्ठलभाई पटेल, चित्तरंजन दास व रवींद्रनाथ टागोर यांचे अर्ध पुतळे सुद्धा तयार केले जे सुप्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनेक कलाकृती या सासवणे येथील करमरकर संग्रहालयात जपल्या आहेत. 

धीवर कन्येसारखी त्यांची अनेक शिल्पे इंग्लंड, अमेरिका व जर्मनीतील खाजगी संग्रहालयातही स्थानापन्न आहेत. करमरकर हे अखिल भारतीय शिल्पकार संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष होते. या क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीबद्दल भारत सरकारने १९६४ साली त्यांना पद्मश्री हा मानाचा 'किताब देऊन गौरवले होते.

अलिबाग परिसराची सफर करण्याचा विचार जर केला असेल तर आपल्या प्रवास यादीत करमरकर शिल्पालयाचे नाव आवर्जून असावयास हवे.