महाड - नररत्नांची ऐतिहासिक भुमी
महाराष्ट्राला भुगोलाबरोबरच इतिहास देखील आहे असे आजही अभिमानाने म्हटले जाते. रायगड जिल्ह्यात तर इतिहास व भुगोल खचून भरला आहे. अशा या रायगड जिल्ह्यातले एक सुप्रसिद्ध स्थळ म्हणजे जिल्ह्याच्या दक्षीणेकडील तालुक्याचे महाड शहर.

साक्षात शिवाजी महाराजांचे वास्तव्य या परिसरात असल्याने महाड शहराचे ऐतिहासिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व असले तरी शिवकाळापुर्वी सुद्धा महाड हे महत्त्वाचे ऐतिहासिक केंद्र राहीले असले पाहीजे कारण १५३८ सालीं महाडला भेट देणारा पोर्तुगिज डी कास्ट्रो असें लिहितो कीं महाड व्यापारी वस्तीचें गांव असून येथें गव्हाची फार मोठी घडामोड होते. तसेच १७७१ सालीं जॉन फोर्बस याने महाड चांगल्या तटबंदीचें व भरवस्तीचें शहर असल्याची नोंद केली आहे.
महाड हे शहर रायगड जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नदीच्या म्हणजे सावित्रीच्या तिरावर वसले आहे. या सावित्री नदीस गांधारी, घोड, काळ व नागेश्वरी अशा एकूण चार उपनद्या आहेत. सावित्री नदी ही महाबळेश्वर येथे उगम पावून महाडमार्गे बाणकोट खाडीस मिळते. सावित्री नदीच्या या परिसराचे महत्त्व फार प्राचिन असून तिचा उल्लेख पुराणांत सुद्धा आला आहे. स्कंदपुराणातल्या कथेनुसार सावित्री ही ब्रह्मदेवाची पत्नी. एक दिवस ब्रह्माने ब्रह्मारण्यात यज्ञाचे आयोजन केले मात्र सावित्री आभुषणे परिधान करण्यात गुंग राहिल्याने यज्ञास उशीर होऊन पाहुण्यांची गैरसोय नको म्हणुन ब्रह्माने शंकर, विष्णू इत्यादी देवतांची अनुमती घेऊन आपली उपपत्नी गायत्री हिच्यासोबत दिक्षा घेतली मात्र एवढ्यात सावित्रीची तिथे आगमन होऊन समोरचे दृश्य पाहिल्याने तिचा संताप अनावर झाला व तिने सरसकट सर्वांना तुम्ही जलमय होऊन स्त्रीरुपाने प्रसिद्ध व्हाल व गायत्री नदी होऊन सर्व लोक तिच्याकडे दुर्लक्ष करतील असा शाप दिला मात्र संतापलेल्या विष्णूने सावित्रीसही शाप देऊन जलप्राय केले त्यामुळे त्राग्याने सावित्रीने सह्याद्रीच्या कड्यावरुन उडी टाकून समुद्रास मिळण्याचा मार्ग पत्करला. तिला परत आणण्यासाठी ब्रह्मदेव तिच्या मागोमाग गेले मात्र ती परत आली नाही. आजही सावित्री नदीच्या तिरावर उगमापासून ते समुद्रकिनार्यापर्यंत बारा शिवलिंगे आहेत ते पाहता या परिसराच्या प्राचिनत्वाची प्रचिती येते.
महाड परिसराच्या प्राचिनत्वाचा दुसरा पुरावा म्हणजे शहरापासून फक्त तीन कि.मी. अंतरावर असलेली गांधारपाले लेणी. फार पुरातन काळापासून बाणकोटच्या खाडीचा परिसर हे देश व परदेशांतर्गत दळणवळणाचा प्रमुख मार्ग असल्याने व्यापाराच्या या प्रमुख मार्गावर इसवी सनाच्या पहील्या शतकात कोरल्या गेल्या. या लेण्यांमध्ये अस्तिवात असलेल्या तीन ब्राह्मी शिलालेखांवरुन कुमार कंबोज विष्णूपुलीत, वेदश्री व संघरक्षीत अशी तीन नावे मिळतात. काहींच्या मते या लेण्याची निर्मिती करणारा कंबोज विष्णूपुलीत हा याच परिसरात राज्य करत होता मात्र या लेण्यांची निर्मीती सातवाहन काळातच झाली असून त्यांच्याच काळात सध्याच्या अफगाणीस्थानातील गांधार, पाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, क्रिगिजस्तान इत्यादी प्रदेशावर राज्य करणार्या कंबोज या राजवंशाच्या व्यापारी उद्देशाकरीता मिळालेल्या देणग्यांतून या लेण्यांची निर्मिती झाली असावी. कारण या लेण्याचे गांधारपाले (गांधार-पल्ली) हे नाव पाहता कंबोज हे राजघराणे त्याकाळी अफगाणीस्थानातील गांधार येथेच राज्य करीत होते त्यामु़ळे ही शक्यता अजून दृढावते.
या लेण्यांची निर्मिती कोणीही केली असली तरी या लेण्यांच्या निर्मितीचा काळ पहाता महाडचा इतिहास किती पुरातन आहे हे लक्षात येते. महाड या शहराच्या मुळ नावातही इतिहास द्डलेला आहे. महाड हे महा व हाट या दोन शब्दांचे रुप आहे. महा म्हणजे मोठा व हाट म्हणजे बाजार त्याअर्थी बाणकोट खाडीवरील मोठी बाजारपेठ म्हणुन महाड हे नाव या गावास मिळाले असावे. कालांतराने महाहाट या शब्दाचा अपभ्रंश होऊन महाड हा शब्द तयार झाला असावा कारण असे अपभ्रंश मध्ययुगात प्रामुख्याने झाले जसे कर्हाड पुर्वी करहाट या नावाने व वर्हाड पुर्वी वरहाट या नावाने प्रसिद्ध होते.
प्राचिन काळी महाड हे स्थानिय बाजारपेठेचे ठिकाण असले तरी या ठिकाणी लोकवस्ती तुरळक असावी कारण भौगोलिक दृष्ट्या महाड शहर सावित्री नदीच्या तटास लागून असल्याने असल्याने पावसाळ्यात पाणी भरण्याचे प्रमाण त्याही काळी असावे त्यामुळे कदाचित त्याकाळी मुख्य लोकवस्ती आजुबाजुच्या पंचक्रोशीतल्या गावांत असून व्यापार्यांच्या व नागरिकांच्या सोयीकरीता हे सर्व व्यापारी वर्षातला ठरावीक काळ हा मोठा बाजार भरवत असण्याची शक्यता आहे. कारण मध्ययुगपुर्व प्राचिन साधनांमध्ये महाडचा थेट उल्लेख अजुनपर्यंत मिळाला नसला तरी प्राचिन काळातली एक मोठी बाजारपेठ म्हणुन महाड निसंशय प्रसिद्ध होती.
महाडचे व्यापारी महत्त्व प्राचिन काळापासून कायम असले तरी राजकिय महत्त्व निजामशाही काळापासून मिळाले असले पाहिजे. याच काळापासून येथे लोकवस्ती वाढू लागली असावी कारण सध्याचा जो महाडचा कोट आहे तो आदिलशाही काळात बांधला गेल्याचे सांगितले जाते. पुर्वी निजामशहा व नंतर आदिलशहा यांचा मांडलिक असलेल्या जंजिर्याच्या सिद्दीच्या ताब्यात महाडचा त्याकाळी कारभार असून महाडच्या उत्तरेस मुल्ला अहमदच्या अखत्यारीत असलेला कल्याण सुभा सुरु होत असे.
१६५६ साली जावळीकर मोर्यांचा पाडाव करुन महाराजांनी महाड स्वराज्यात आणले व खर्या अर्थाने या भागाच्या उत्कर्षाचा पाया रचला. महाडपासूनच काही अंतरावर असलेल्या रायगड किल्ला ही शिवरायांनी राजधानीचे ठिकाण केल्याने महाड परिसर मराठी साम्राज्याचा केंद्रबिंदू बनला व महाडचे वैभव हळूहळू वाढू लागले. महाड शहराचे सध्याचे जे रुप आहे ते अर्थात शिवकालीन आहे. येथील पुरातन विरेश्वर मंदीर व इतर मंदीरे, इथल्या वस्त्या, चवदार, वीरेश्वर व हापूस (हबशी) ही तीन तळी तसेच इथली नगररचना ही मुख्यत्वेकरुन शिवकाळातच रचली गेली असावी. एकाअर्थी किल्ले रायगड मुख्य राजधानीचे कार्य पार पाडत असताना दुय्यम राजधानीचे ठिकाण हे महाड होते, शिवाजी महाराजांनी निवासाकरीता महाडास एक वाडा बांधला होता, या अगोदरही समुद्रस्नानाची आवड असल्याने बाणकोट खाडीवर महाडात त्यांनी एक वाडा खास समुद्रस्नानासाठी बांधला होता.
महाड हे ऐतिहासिक स्थळ आहेच मात्र अनेक नररत्नांची भुमी म्हणुनही महाड परिसर प्रसिद्ध आहे, या ठिकाणी एकतर या नररत्नांनी जन्म घेतला अथवा इतर नररत्नांची ही कर्मभूमी ठरली स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज, संभाजी महाराज, समर्थ रामदास, कवींद्र परमानंद, मुरारबाजी देशपांडे, दादाजी देशपांडे, क्रांतीसुर्य नानासाहेब पुरोहीत, काळकर्ते शि.म.परांजपे, त्र्यंबक कारखानीस, हुतात्मा कमलाकर दांडेकर, हु. वसंत दाते, हु. अर्जुन कानू भोई आणि हु. नथू दौलत टेकावला, सुरबनाना टिपणीस अशा अनेक नररत्नांची महाड ही जन्मभूमी व कर्मभूमी आहे. नाना फडणीसांचे महाडचे प्रख्यात राजकिय कारस्थानही प्रसिद्ध आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथेच १९ व २० मार्च १९२७ रोजी चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह केला.
महाडचे श्रद्धास्थान ग्रामदैवत विरेश्वर महाराज यांचा छबीना उत्सव हा येथील पंचक्रोशीतल्या तमाम नागरिकांचे प्रमुख आकर्षण आहे, हा उत्सव पाहण्यासाठी दुरवरुन पर्यटक महाडला भेट देतात याशिवाय दुर्गराज रायगड, पाचाड येथील जिजाबाईंची समाधी, दासबोधाचे जन्मस्थान शिवतरघळ, गांधारपाले लेणी, सव येथील गरम पाण्याचे झरे, ऐतिहासिक चवदारतळे ही महाड शहरातील व परिसरातील प्रमुख प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. प्राचिनता व आधूनीकता यांचा संगम असलेले महाड शहर व परिसर पाहिल्यावर या परिसरास नररत्नांची भुमी असे का म्हटले जाते याची खर्या अर्थाने प्रचिती येते.