आपल्या अवचेतन मनाची शक्ती

डॉ. जोसेफ मर्फी यांचे हे पुस्तक म्हणजे मनाच्या मूलभूत सत्याला सोप्या भाषेत समजून देण्याचा प्रयत्न आहे. जीवन आणि मेंदूच्या मूलभूत नियमांना रोजच्या दैनंदिन सरळ भाषेत समजून सांगणे पूर्णपणे शक्य आहे.

आपल्या अवचेतन मनाची शक्ती
आपल्या अवचेतन मनाची शक्ती

माणूस दुःखी का होतो? दुसरा आनंदी का आहे? एक माणूस सुखी आणि समृद्ध असतो त्याचवेळी दुसरा माणूस गरीब आणि दुःखी का असतो? एक माणूस भयभीत आणि तणावग्रस्त असतो त्याचवेळी दुसरा श्रद्धावान तसेच आत्मविश्वासू का असतो?

एका माणसाकडे सुदंर, अलिशान बंगला असताना दुसरा झोपडीत का असतो? एक माणूस प्रचंड यशस्वी तर दुसरा अतिशय वाईट आस्थेत का असतो? काय आपल्या चेतन किंवा अचेतन मनाकडे याचे एखादे उत्तर आहे ? होय हे उत्तर निश्चितच मिळू शकतं.

हे पुस्तक वाचल्यानंतर आणि या पुस्तकात सांगितलेल्या गोष्टी अमलात आणल्यानंतर आपण या चमत्कारीक शक्तीला ओळखू शकाल, जी आपल्याला द्विधा, दुःख, उदासी आणि अपयशाच्या कुचक्रातून बाहेर पडायला मदत करतील. ही चमत्कारीक शक्ती आपल्या उद्दिष्ट पूर्तीसाठी आपल्याला मदत करील, आपल्या समस्या सोडवील, आपल्याला मानसिक आणि शारीरिक बंधनातून मुक्त करील. ती आपल्याला पुन्हा निरोगी, उत्साही आणि शक्तीशाली बनवू शकते. ज्यावेळी आपण आंतरीक शक्तीचा उपयोग करायला शिकाल, त्यावेळी आपण भीतीच्या कैदेतून मुक्त व्हाल आणि सुखमय जीवनाचा आनंद घ्याल.

पुस्तकाचे लेखक जोसेफ मर्फींचा जन्म आयर्लंडमध्ये झाला आणि नंतर ते अमेरिकेला स्थायिक झाले. मनोविज्ञानशास्त्रामध्ये पीच.डी. केल्यानंतर मर्फींनी त्यांचा जास्तीत जास्त वेळ आशियाई धर्माचं अध्ययन करण्यात व्यतीत केला. या अभ्यासासाठी ते भारतातही येऊन गेले. विश्वातील प्रमुख धर्माच्या अभ्यासानंतर त्यांना असं आढळून आलं की, संपूर्ण विश्वावर एकाच शक्तीचं राज्य आहे, ती शक्ती सर्वांमध्ये स्थित आहे. ही शक्ती म्हणजे अंतर्मनाची ताकद. डॉ. मर्फीवर उत्तर अमेरिकेतील नव विचार सिद्धान्ताचा खूप परिणाम झाला. यानुसार, आपल्या समस्यांचं उत्तर हे आपल्या आतच दडलेलं असतं. बाह्यघटकांमुळे आपले विचार बदलू शकत नाहीत. अधिक चांगलं जीवन जगण्यासाठी बाह्य परिस्थिती बदलण्याची नव्हे, तर तुम्हाला तुमचं मन बदलण्याची आवश्यकता आहे. विकास करण्यासाठी अंतर्मनाचं सामर्थ्य वापरून तुम्ही परिवर्तन घडवून आणू शकता.

डॉ. मर्फींनी तीसहून अधिक पुस्तकं लिहिली. त्यांचं प्रख्यात पुस्तक, द पॉवर ऑफ युअर सबकाँशस माइंड सर्वोत्तम पुस्तकांमध्ये गणलं जातं. इतर काही प्रख्यात पुस्तकं अशी टेलिसायकिक्स, द मिरेकल ऑफ माइंड डायनॉमिक्स, युअर इन्फायनाइट पॉवर टू बी रिच, बिलिव्ह इन युअर सेल्फ हाऊ टू अट्रक्ट मनी, मिरकल्स ऑफ माइंड.

या पुस्तकाच्या निर्मितीमागिल भुमिका स्पष्ट करताना मर्फी म्हणतात की, वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या स्त्री-पुरुषांच्या आयुष्यात चमत्कार घडल्याचं मी स्वतः पाहिलं आहे. तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या जादुई शक्तीचा वापर केलात, तर असे चमत्कार तुमच्याही बाबतीत घडू शकतात. तुमची विचार करण्याची एक विशिष्ट सवय असते. तुम्ही ज्या शब्दांचा वापर वारंवार करता, जी चित्रं मनात रंगवता त्यामुळं तुमचं भाग्य घडतं, भविष्याला आकार मिळत असतो. कारण माणूस अंतर्मनात ज्याप्रमाणं विचार करतो, त्याप्रमाणंच तो बनतो. या गोष्टींचं तुम्हांला ज्ञान व्हावं हाच या पुस्तकाचा मूळ हेतू आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद श्री. संकेत कोरडे यांनी केला असून प्रकाशक मंजुल पब्लिशिंग हाऊस हे आहेत. या पुस्तकाची प्रथम आवृत्ती सन २०१८ मध्ये प्रकाशित झाली.