पुस्तक परिचय - मुंबईचा अज्ञात इतिहास

हॅप्टेनेशिया, पुरी, कपर्दीद्विप, बिंबस्थान, भिमपुरी, मानबाई, यमपुरी, बॉम्बे आणि मुंबई... काळानुरूप बदलत गेलेली ही मायानगरीची नावे. देशाची आर्थिक आणि ग्लॅमरची राजधानी असलेली मुंबईच प्राचीन कोकणाची राजधानी ‘पुरी’ असल्याचा दावा अभ्यासक सिद्धार्थ सोष्टे यांनी केला आहे.

पुस्तक परिचय - मुंबईचा अज्ञात इतिहास

हॅप्टेनेशिया, पुरी, कपर्दीद्विप, बिंबस्थान, भिमपुरी, मानबाई, यमपुरी, बॉम्बे आणि मुंबई... काळानुरूप बदलत गेलेली ही मायानगरीची नावे. देशाची आर्थिक आणि ग्लॅमरची राजधानी असलेली मुंबईच प्राचीन कोकणाची राजधानी ‘पुरी’ असल्याचा दावा अभ्यासक सिद्धार्थ सोष्टे यांनी केला आहे. सोष्टे यांनी ‘मुंबईचा अज्ञात इतिहास’ या पुस्तकाच्या माध्यमातून दावा केला आहे. त्यासाठी मुंबईच्या प्राचीनत्वाचे दाखले देणाऱ्या पुराव्यांची संदर्भासह मांडणीही पुस्तकात केली आहे.

प्राचीन कोकणची राजधानी ‘पुरी’ या नावाने ओळखली जात होती. ही ‘पुरी’ नेमकी कोणती यावर अभ्यासकांचे आजही एकमत नाही. त्याबाबत विविध मतमतांतरे आहेत. मुंबई शहर हीच ‘पुरी’ असल्याचा निष्कर्ष या पुस्तकात मांडण्यात आला असून, त्यासंबंधीचे ऐतिहासिक व भौगोलिक संदर्भ देण्यात आले आहेत. मुंबईतील प्राचीन वारसास्थळांची शहानिशा या पुस्तकात करण्यात आली आहे. परकीय राजवटींमध्ये या वारसास्थळांचे नुकसान अथवा स्थलांतर कशाप्रकारे करण्यात आले आणि त्यामुळे मुंबईची प्राचीन ओळख कशी नष्ट झाली हे मांडण्याचा प्रयत्न सोष्टे यांनी केला आहे. प्राचीन ते आधुनिक प्रवासात मुंबई बेटाला मिळालेली विविध नावे आणि त्या नावांमागील कारणे स्पष्ट करणारी माहितीही त्यांनी दिली आहे.

‘इसवी सनाच्या सुरुवातीपासून ते मुंबईची बेटे ब्रिटिशांच्या ताब्यात जाईपर्यंत ज्या ऐतिहासिक घडामोडी घडल्या त्या सर्वांचा परामर्ष या पुस्तकात घेतला आहे. प्राचीन ते आधुनिक मुंबईची अनेक स्थित्यंतरे यात संक्षिप्तपणे दिली आहेत. पुरी या ठिकाणाची ठाम स्थलनिश्चिती अजूनही झालेली नाही. पुरीचे संदर्भ जसजसे मिळत गेले तसतसे स्पष्ट होत गेले की, मुंबई हीच पुरी आहे. हाच धागा पकडून पुस्तकाची निर्मिती केली आहे.’

मुंबई शहर भौगोलिक व ऐतिहासिक दृष्ट्या ज्या उत्तर कोकणात येते त्या उत्तर कोकणच्या प्राचिन राजधानीचे अर्थात पुरीचे तुटक उत्तर कोकणविषयक संदर्भ साहित्यांमध्ये आढळतात. मात्र पुरीची स्पष्ट ओळख आजही पटलेली नाही. पुरीची स्थान निश्चीती करण्याचे प्रयत्न यापुर्वी नक्कीच झाले आहेत कारण अनेक अभ्यासकांनी पुरीची स्थलनिश्चीती करण्याचा प्रयत्न या पुर्वी केला आहे मात्र या विषयास मध्यवर्ती रुप देऊन त्याचा सोक्षमोक्ष लावण्याचा प्रयत्न ठोस साधनांच्या अभावी करण्यात आला नाही. तसेच ज्या स्थळांना प्राचिन पुरी म्हणुन ग्राह्य धरण्याचा प्रयत्न झाला (उदा. दंडाराजपुरी, घारापुरी इ.) ती स्थळेही लेखकाच्या दृष्टीकोनातून पुरीशी साधर्म्य न दर्शवणारी होती.

मुंबई शहर हेच प्राचिन पुरी असावे हा निष्कर्ष लेखकाने आपल्या पहिल्या पुस्तकामध्येच लिहीला होता कारण यावेळी त्यांची ९० टक्के खात्री झाली होती की मुंबईशिवाय कोकणातील दुसरे कुठलेच स्थळ पुरीच्या वर्णनाशी मेळ खाऊ शकत नाही मात्र ही बाब तत्कालिन साधनांमध्ये लक्षात न येण्याची कारणे शोधली असता माझा निष्कर्ष हा निघाला की मुंबईस आजतागायत पुरी म्हणुन ग्राह्य न धरण्याचे कारण म्हणजे मुंबईच्या निर्मितीविषयी असलेले पाश्चात्य लिखाणावर अवलंबून असलेले ज्ञान. आपण आजवर हेच ऐकत अथवा वाचत आलोय की मुंबई ही एकेकाळी सात बेटांमध्ये विभागली गेली होती व कालांतराने पोर्तुगिजांनी येथे येऊन वसाहत केली व नंतर मुंबईस इंग्रजांस आंदण देऊन आपला हक्क सोडला. इंग्रजांनी मग ही सातही बेटे एकत्र करुन येथे वस्ती वसवली व सध्याचे एकसंध मुंबई शहर तयार झाले या थेअरी च्या पलिकडे जाऊन विचार करण्याचा दुर्दैवाने प्रयत्न न झाल्याने मुंबईचा इतिहास हा आपण काही शतकांपासूनच धरुन त्या पुर्वीच्या इतिहासाची गाळलेली पानेच दुर्लक्षित केली व अशाप्रकारे मुंबई व त्यायोगे पुरीच्याही प्राचिन इतिहासाचे दुर्लक्षित स्मारक केले.  या पुस्तकात लेखकाने वेगवेगळ्या प्रकरणांद्वारे मुंबईच्या अज्ञात इतिहासामागील गुढ मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या प्रकरणामध्ये सद्यस्थितीस सर्वांना माहित असलेल्या ज्ञात इतिहासा अगोदरचा अज्ञात इतिहास सलग मांडून मग त्याची छोट्या छोट्या प्रकरणांद्वारे फोड केली आहे व ही फोड करताना तत्कालीन संदर्भाचा आधार घेऊनच या निष्कर्षांची मांडणी केल्यामुळे या निष्कर्षांस बळकटी आली आहे.  

मुंबई शहरासारखे श्रीमंत शहर संपुर्ण भारतात सापडणार नाही व म्हणुनच या शहरास भारताच्या आर्थिक राजधानीचा मान मिळाला आहे. असे म्हणता की लक्ष्मीचा निवास हा समुद्रामध्ये असतो व मुंबई शहर हे लक्ष्मीहून कमी नाही. ऐहोले प्रशस्तीमध्ये पुरीस लक्ष्मीची उपमा देण्यात आली आहे. तिथपासून ते इथपर्यंत या शहराने अनेक संकटे झेलून आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे व या शहराच्या आश्रयास आलेल्यास भरभरुन दिले आहे त्यामुळे या शहराचे ऋण फेडणे हे इथल्या व या शहरावर अवलंबून असलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. जी शहरे स्वयंभू असतात त्यांना एक आत्मा असतो व मुंबईसही तो आहे व या आत्म्याशी जो समरस होतो तो खरा मुंबईकर आणि अशा मुंबईकरांच्या हृदयात जे स्पिरीट आहे ते म्हणजे स्पिरीट ऑफ मुंबई.

पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा