नागस्थान ते नागोठणे
नागस्थान ते नागोठणे या पुस्तकामध्ये नागोठण्याचे गेल्या पाच हजार वर्षांपासूनचे ऐतिहासिक, भौगोलिक , व्यापारी, आरमारी, भाषिक, सांस्कृतिक, वांशिक, औद्योगिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.
नागोठणे! महाराष्ट्रातल्या कोकण प्रांतातील रायगड जिल्ह्यातील एक मध्यवर्ती गावं, रायगड जिल्ह्याचा नकाशा पहिला तर पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर अशा चारही दिशांनी हे गाव जिल्ह्याच्या मध्यभागी असलेले दिसून येते. मुंबईपासून अदमासे ९५ किलोमीटर आणि पुण्यापासून अदमासे १३५ किलोमीटर अंतरावर असलेले नागोठणे हे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील व कोकण रेल्वेवरील एक स्थानक असून अदमासे तीस वर्षांपूर्वी या गावाच्या परिसरात औद्योगिकरण झाल्याने गावाचा कायापालट झाला.
या औद्योगिकरणाचा किती फायदा नागोठण्यास झाला ते माहित नाही मात्र एक तोटा हा झाला की गावाचे जुने लोभसवाणे रूप बदलून गेले. आज कुणीही नवखा येथे आला तर हे गावं एक ऐतिहासिक महत्व असलेले गावं आहे हे सांगूनही त्यास विश्वास बसणार नाही कारण नागोठण्याच्या इतिहासाच्या पाऊलखुणा आधुनिक काळात लुप्त होऊ लागल्या आहेत. फार तुस्तक वास्तू आजही नागोठण्याचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतात मात्र त्याकडे कुणाचे फारसे लक्ष नसते कारण लोकांना इतिहासापेक्षा वर्तमान व भविष्याची जास्त चिंता आहे.
ज्या नागोठण्याचा उल्लेख जगाच्या पहिल्या नकाशात आहे. ज्या नागोठण्यामध्ये महाराष्ट्रातील आद्य पूल आहे, ज्या नागोठण्यावर छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचे कायम लक्ष असे अशा नागोठण्याचा इतिहास कायमचा विस्मरणात जाण्यापूर्वी जगासमोर आला पाहिजे या भावनेतून या पुस्तकाच्या निर्मितीची बीजे रोवली गेली.
इतिहास अभ्यासकांसाठी सर्वात कठीण गोष्ट असते ती म्हणजे एखाद्या गावाचा इतिहास लिहिणे कारण हा इतिहास शेकडो साधनांमध्ये विभाजित असतो. नागोठण्यावरील हे पुस्तक गावातील पुढील अनेक पिढयांना आपल्या गावाचा वैभवशाली इतिहास कसा होता हे जाणून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल कारण शहरीकरणाच्या अजगराने महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक शहरे ज्याप्रकारे गिळंकृत केली त्या तुलनेत नागोठणे हे गाव खूप लहान आहे मात्र त्याचा इतिहास खूप मोठा आहे. नागोठणे हे गाव भौगोलिक दृष्ट्या उत्तर कोकणात येत असल्याने फक्त नागोठणेच नव्हे तर रायगड जिल्हा आणि उत्तर कोकणच्या इतिहासाची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठीही हे पुस्तक उपयुक्त आहे.