तोरणा उर्फ प्रचंडगड - शिवरायांनी जिंकलेला पहिला किल्ला
पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला म्हणून ज्याचे नाव घेतले जाते तो दुर्ग म्हणजे किल्ले तोरणा उर्फ प्रचंडगड.
तोरणा किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला. तोरणा किल्ल्याचा एक जुना उल्लेख १६२७ सालच्या पत्रात पुढीलप्रमाणे सापडतो.
गुंजनमावळ परगणे मुरंबदेऊ (राजगड) मुझापती मामले मजकूर येथील देशमुखी हैबत राऊ कान्होजी व हाबाजी हैबतराऊ चचारे भाऊ हक्कासाठी भांडत व जमेती करून तर्फ मजकूर तसबिस देऊन खराब केला. कान्होजींनी आंबवणे येथे कमीन राहत होता त्यास अर्जोजी गिरराव व हबाजी देशमुख या हाती सांगून पाठविले की रोहिडकर देशमुख आपणास जीवाचे जमान होतील तर आपण हरणसखोरियास जाईन. ऐसे बोलों मुरुंबदेव, तोरणे किल्ले, कोंढाणा ते वाट धरली.
तर या १६२७ सालच्या उल्लेखावरून किल्ल्याचे तोरणा हे मूळ नाव होते हे समजते मात्र महाराजांनी हा किल्ला जिंकल्यावर त्याचा प्रचंड आकार व उंची पाहून त्याचे प्रचंडगड असे नामकरण केले. महाराजांनी स्वराज्य निर्मितीची सुरुवातच तोरणा हा अतिशय उंच किल्ला ताब्यात घेऊन केली यावरूनच महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या निश्चयाची उंची कळून येते.
तोरणा किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून १४०२ मीटर इतकी आहे तर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले वेल्हे हे गाव समुद्रसपाटीपासून ७४० मीटर उंचीवर आहे. वेल्हे हे गाव तालुक्याचे ठिकाण असून वेल्हे गावाच्या मागूनच तोरणा किल्ल्यावर जाण्याची वाट आहे. वेल्हे गावात शिरल्यावरच आपले दोन हात पसरून आकाशात उंचावलेला तोरणा दृष्टीस पडतो आणि आपल्याला किल्ला सर करताना किती कस लागणार आहे याची कल्पना देतो. किल्ला हा खरोखर चढाईस जिकिरीचा आहे हे किल्ला चढायला लागल्यावर समजू लागते. अनेक ठिकाणी कातळात कोरलेले रस्ते आहेत अशावेळी आधारासाठी पूर्वी बाजूस लोखंडी गज ठोकले गेले आहेत त्यांना पकडून वर चढावे लागते.
अशाप्रकारे अदमासे ४००० फूट चढून गेल्यावर लागतो तो गडाचा बिनी दरवाजा. बिनी दरवाज्यातून आत शिरल्यावर गडाचा दुसरा दरवाजा लागतो ज्यास कोठी दरवाजा असे म्हणतात. आत गेलो कि गडाचा बालेकिल्ला सुरु होतो. समोरच मेंगाईचे सुंदर देऊळ आहे व बाजूलाच मेंगाई तळे आहे. सहसा तोरणा किल्ला चढून गेल्यास बालेकिल्ल्यावर अंमळ विश्रांती घेतल्याशिवाय किल्ला पुढे पाहण्याची ताकदच नसते त्यामुळे अनेक जण मंदिरात थोडा वेळ विश्रांती घेऊनच पुढील कार्यास लागतात.
काही काळ विश्रांती घेऊन झाली की वेध लागतात ते गडाच्या झुंजारमाचीचे कारण गडाच्या पायथ्यावरूनच ही तीक्ष्ण स्वरूपाची माची आपले लक्ष वेधून घेत असते झुंजारमाचीलाच झुंजारमल माची असेही नाव आहे. मेंगाई मंदिराच्या उजव्या दिशेने आपण दोन्ही बाजूना दाट झाडी असलेल्या पायवाटेवरून निघालो की समोर हनुमान बुरुज व भेल बुरुज असे दोन बुरुज दिसतात. मेंगाईचे मंदिर व हनुमान बुरुज या दोघांत तसे बरेच अंतर आहे मात्र विशिष्ट वातावरणात म्हणजे पावसाळ्यात मेंगाईच्या मंदिरातील आवाज हा हनुमान बुरुजाजवळ उभे राहिले असता स्पष्ट ऐकू येतो. याच ठिकाणाहून झुंजार मल माचीकडे जाण्याचा कठीण असा मार्ग आहे. रस्ता दारू गोळ्यांनी तोडून टाकला गेल्याने येथे उतरायचे म्हणजे जीवाशी खेळ. दोन्ही बाजूस तीव्र कडे आणि मधून कड्यातील मार्ग असे करत एका खाली एक असलेले दोन कातळकड्याचे टप्पे उतरून मगच आपल्याला झुंझारमाची वर पोहोचता येते.
तोरणा किल्ल्यास झुंजारमाची शिवाय आणखी एक माची आहे जिस बुधलामाची असे म्हणतात. याच बुधलामाचीच्या दक्षिणेकडील एक डोंगर फाटा थेट राजगड किल्ल्यापर्यंत जातो. या परिसरात आणखी दोन दरवाजे आहेत ज्यांची नावे अनुक्रमे कोकण दरवाजा व चित्त दरवाजा अशी आहेत. बुधला माचीवरून सह्याद्रीची मुख्य धार व तिच्या मागील कोकण प्रदेशाचे सुंदर दर्शन होते. रायगड किल्ला सुद्धा येथून स्पष्ट दिसतो. तोरण्यावरून सिंहगड, राजगड, रायगड व लिंगाणा हे किल्ले चांगले वातावरण असेल तर स्पष्ट दिसतात. किल्ल्यावर पाहण्यासारखी इतर स्थळे म्हणजे तोरणेश्वर मंदिर, दिवाणघर व सदर इत्यादींचे अवशेष.
असे म्हणतात की शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला ताब्यात घेऊन त्याची बांधणी करत असताना तटाचे काम सुरु असताना एक मोहोरांचा हंडा सापडला या मोहोरांचा उपयोग महाराजांनी तोरणा व राजगड या दोन किल्ल्यांवर बांधकामे करण्यासाठी केला. तोरणा हा किल्ला नावासारखाच प्रचंड असून डोंगरयात्रींची परीक्षा घेणारा आहे मात्र शिवरायांनी जिंकलेला पहिला किल्ला पाहिल्याचे समाधान काही औरच असते.