त्र्यंबकेश्वर - एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग

त्र्यंबक हे गाव ज्या डोंगराच्या पायथ्याशी आहे त्यास ब्रह्मगिरी असे नाव असून गावाच्या चोहो बाजूना लहान मोठे डोंगर आहेत. यातील एक डोंगर म्हणजे निलगिरी अथवा नीलपर्वत.

त्र्यंबकेश्वर - एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

भारतातल्या प्रसिद्ध अशा बारा ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात जी तीन ज्योतिर्लिंग आहेत ती म्हणजे भीमाशंकर, घृष्णेश्वर आणि त्र्यंबकेश्वर. या पैकी त्र्यंबकेश्वर हे स्थान नाशिक जिल्ह्यात असून ते ज्या तालुक्यात स्थित आहे तो तालुका सुद्धा त्र्यंबकेश्वर या नावानेच प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या मुख्य धारेवर अदमासे ७२० मीटर उंचीवर वसलेले हे स्वयंभू स्थान संपूर्ण देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

भारतातील बारा ज्योतिर्लिंगांची माहिती देणारा जो श्लोक आहे त्यामध्ये त्रंबकेश्वराचे वर्णन 'त्र्यंबक गौतमी तटे' असा आला असून हे स्थान नाशिक या प्राचीन तीर्थस्थानाहूनही पुरातन असल्याचा उल्लेख पुराणांमध्ये येतो. महामृत्युंजय मंत्रात तर सुरुवातीसच 'ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्‌।' या शब्दांत या स्थानाचे महत्व प्रतिपादित करण्यात आले आहे. महामृत्युंजय मंत्रास त्रयम्बकम मन्त्र या नावाने सुद्धा ओळखले जाते. श्रीराम वनवासात असताना त्यांचे वास्तव्य काही काळ या परिसरात झाले होते.

साक्षात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक लिंग या ठिकाणी स्थित असल्यानं पूर्वी अतिशय छोटे असलेले त्र्यंबकेश्वर गावं आता बऱ्याच प्रमाणात विस्तारले आहे. हे गावं तिन्ही बाजूनी सह्याद्रीच्या एका शाखेने वेष्टित आहे व या शाखेस ब्रह्मगिरी, त्र्यंबक डोंगररांग अथवा निलगिरी पर्वत असे म्हटले जाते व या रांगेत दुर्ग भांडार, त्रिंबक आणि नवरा नवरी असे तीन दुर्ग या परिसराचे फार पूर्वीपासून रक्षण करीत आले आहेत.

त्र्यंबकेश्वराचे मंदिर हे येथील मुख्य आकर्षण असून ते अतिशय भव्य आणि सुंदर आहे. काळ्या पाषाणात बांधल्या गेलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार पहिले बाजीराव पेशवे यांच्या काळात करण्यात आला होता. मंदिरातील लिंग हे इतर शिवलिंगांसारखे नसून पाण्याच्या धारेत तीन वेगवेगळ्या मुद्राधारी आकृती दिसून येतात. दर सोमवार देवाची पालखी असते व या पालखीत शिवाची धातूची मूर्ती स्थानापन्न असते. पालखी प्रथम देवालयातून बाहेर पडून कुशावर्त तलावावर जाते व येथे मूर्तीस स्नान घातले जाते व हा सोहळा झाल्यावर पालखी पुन्हा एकदा मंदिरात येते. येथील कुशावर्त हे अतिशय पवित्र तीर्थ असून त्याचे वर्णन 'गंगाद्वारे कुशावर्ते बिल्वके नीलपर्वते, स्नात्वा कनखले तीर्थे पुनर्जन्म न विद्यते' असे करण्यात आले आहे.

कुशावर्त चा अर्थ होतो दर्भांनी झाकले गेलेले तीर्थ. याचा आकार चौकोनी असून याची रचना अशा पद्धतीने केली गेली आहे की आजूबाजूच्या कुंडातून येथे पाणी घेता येईल व प्रसंगी या कुंडातील पाणी बाजूच्या कुंडांना देता येईल. पाषाणांनी युक्त अशा या कुंडाच्या चारही बाजूना बसण्यास जागा असून याठिकाणी दान, स्नान आणि श्राद्ध ही पवित्र कार्य केली जातात.

कुशावर्त तीर्थाच्या बाजूस आणखी एक कुंड आहे ज्यास कनखल तीर्थ असे नाव आहे. श्राद्ध केल्यावर यात पिंड दान केले जाते त्यामुळे या कुंडाचा वापर स्नानासाठी न होता फक्त आचमन व मार्जन यासाठी केला जातो.

त्र्यंबक हे गाव ज्या डोंगराच्या पायथ्याशी आहे त्यास ब्रह्मगिरी असे नाव असून गावाच्या चोहो बाजूना लहान मोठे डोंगर आहेत. यातील एक डोंगर म्हणजे निलगिरी अथवा नीलपर्वत. या ठिकाणी नीलदेवीचे एक सुंदर मंदिर आहे. या देवालयाकडे जाताना एक तलाव लागतो व यात्रेकरू येथे स्नान करतात. या डोंगरावर जाण्यासाठी एक मार्ग आहे व येथून दर्शन घेऊन लोक ब्रह्मगिरी आणि चक्रतीर्थाकडे प्रयाण करतात. श्रावणात या परिसराच्या एकूण दोन पायी परिक्रमा असतात व हजारो भाविक या परिक्रमा करतात.

त्र्यंबक म्हणजे ज्यास तीन नेत्र आहेत ते म्हणजे शंकर. या लिंगाची स्थापना कशी झाली या विषयी एक पौराणिक कथा आहे की, एके काळी ब्रह्मदेवाने शंकरास शाप दिल्याने शंकर या ठिकाणी येऊन राहिले. शंकर येथे आले त्यामुळे यांच्यासहित इतर देवता सुद्धा येथे आल्या. कालांतराने ब्रह्मदेवास आपली चूक समजली व शंकरास मानवण्यासाठी तो येथे आला व त्याने ज्या टेकडीवर तपश्चर्या केली तीस ब्रह्मगिरी या नावाने ओळखले जाऊ लागले.

अशा प्रकारे शिव, ब्रह्म आणि इतर देवतांचे वास्तव्य या ठिकाणी असल्याने तसेच गंगेचा एक स्रोत या ठिकाणी असल्याने हे स्थळ अत्यंत पवित्र मानले जाते. महाराष्ट्राच्या धार्मिक वैभवाचा अनुभव घ्यावयाचा असल्यास त्र्यंबकेश्वर येथे एकदा तरी भेट द्यायलाच हवी.