व्हेल - पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी

व्हेलमध्ये सुद्धा अनेक प्रजाती असून त्यांपैकी ब्लु व्हेल हा सर्वात मोठा मानला जातो.

व्हेल - पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी
व्हेल

पृथ्वीवरील आकाराने सर्वात मोठा प्राणी कुठला असेल तर तो म्हणजे व्हेल. व्हेलला आपल्याकडे देवमासा म्हणून ओळखले जाते. जमिनीवरील आकाराने सर्वात मोठा प्राणी हत्ती हा असला तरी व्हेल हत्तीहूनही भव्य असतो. एक पूर्ण वाढ झालेला देवमासा ३० मीटर लांब असून त्याचे वजन १ लाख ८० हजार किलोग्रॅम एवढे असते व हे वजन चाळीस हत्ती एकत्र केल्यावर जेवढे होते तेवढे असते.

व्हेलचे डोके अत्यंत अवजड असून त्यांचे तोंडही आकाराने एवढे मोठे असते की आतमध्ये एखाद्या कोठडीसारखा अनुभव येऊ शकतो. व्हेलची जीभ तब्बल वीस फूट लांब आणि नऊ फूट रुंद असते.

व्हेलमध्ये सुद्धा अनेक प्रजाती असून त्यांपैकी ब्लु व्हेल हा सर्वात मोठा मानला जातो. व्हेलच्या जबड्यात दात नसतात मात्र आतमध्ये हाडांचे शेकडो पत्रे त्याच्या टाळूस असतात आणि त्यांना केसांचे आवरण असते व याचा वापर ते दातांसारखा करू शकतात.

व्हेलचा जबडा आकाराने खूप भव्य असला तरी त्यातुलनेत त्याचा घसा एवढा बारीक असतो की त्याला आकाराने मोठे मासे गिळणे अशक्य असते त्यामुळे त्यास समुद्रातील लहान माशांवर गुजराण करणे भाग असते आणि आपले हे अन्न मिळवण्यासाठी त्याला भूक लागल्यावर तो आपला अजस्त्र जबडा उघडून ठेवतो. जबडा उघडला की बाहेरील पाण्यासहीत पाण्यातील अनेक जीवही व्हेलच्या जबड्यात शिरतात आणि जबड्यात जे केसांनी वेष्टित असे हाडांचे पत्रे आहेत त्यात अडकतात आणि पाणी व्हेलच्या तोंडातून पुन्हा बाहेर पडते.

व्हेलच्या कातडीखाली चरबीचा दाट थर असल्याने पूर्वी या चरबीपासून तेल काढण्यासाठी याची शिकार केली जात असे. मात्र व्हेलच्या अनिर्बंध कत्तलीमुळे यांची संख्या कमी झाल्यामुळे काही काळापूर्वी याच्या शिकारीवर निर्बंध लावण्यात आले आहेत.

व्हेल हा पाण्यात राहत असला तरी त्यांना मत्स्यवर्गात स्थान मिळलेले नाही कारण त्यांचे रक्त उष्ण असते आणि त्यांच्या शरीरात श्वास घेण्यासाठी फुफ्फुस असते. विशेष म्हणजे व्हेल हा सस्तन असून त्यांची पिल्ले स्तनपान सुद्धा करतात. 

व्हेल मासा हा पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी असला तरी तो स्वभावाने हिंस्त्र नसल्याने मनुष्याला त्यापासून धोका नसतो फक्त त्याच्या आकाराने पाण्यात तो विहार करीत असताना अचानक होड्या व जहाजांची टक्कर त्यास लागून नुकसान होऊ शकते याशिवाय त्यास अनेकदा वर येऊन आपल्या भल्यामोठ्या शेपटीस समुद्राच्या पाण्यावर मारण्याची सवय असते व अर्थातच व्हेल च्या अजस्त्र आकाराने लहान मोठया होड्या व जहाजे उलटण्याची भीती असते मात्र व्हेल हे मुद्दाम करीत नसून तो त्याचा स्वभाव धर्म आहे.  अशा प्रकारे व्हेल हा समुद्री पर्यावरणाच्या रक्षणात मोलाची भर घालणारा एक पर्यावरण रक्षकच आहे.