वसुबारस - गोधनाचा सन्मान करण्याचा दिवस
गोधनाचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजे वसुबारस. हा सण कार्तिक मासातील एक महत्वाचा सण असून यास गोवर्धन पूजा या नावानेही ओळखले जाते.
धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी जो सण साजरा केला जातो त्यास गोवत्स द्वादशी अथवा वसुबारस या नावाने ओळखले जाते. भारतात प्राचीन काळापासून गोवंशास महत्व असून त्यास गोधन सुद्धा म्हटले गेले आहे कारण भारत हा कृषिप्रधान देश असल्याने व कृषीच्या निर्मितीत, प्रवास तसेच दूध दुभते इत्यादींसाठी गोवंशाची मदत फार पूर्वीपासून होत असे त्यामुळे पूर्वी घरी गोवंश असणे समृद्धीचे लक्षण मानले जात असे.
या गोधनाचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजे वसुबारस. हा सण कार्तिक मासातील एक महत्वाचा सण असून यास गोवर्धन पूजा या नावानेही ओळखले जाते. या सणाच्या इतिहासाबद्दल जी माहिती मिळते त्याप्रमाणे महाभारत काळात कृष्णाच्या सल्ल्याने गोप लोकांनी इंद्राचा उत्सव न करता गोवर्धन पर्वताची पूजा केली व यानंतर गोवर्धन पर्वताचे प्रतीक म्हणून गायींची पूजा करण्याची प्रथा सुरु झाली.
या दिवशी गोधनास स्नान घालून त्यास सजवले जाते आणि त्यांच्या शिंगांना रंग आणि बेगड लावून त्यांच्या अंगास लाल रंगाचे ठिपके दिले जातात. यानंतर गोधनाची यथासांग पूजा करण्यात येते. पूजा केल्यावर त्यांच्या गळ्यास एक पोळी आणि नारळाची कावड बांधली जाते आणि त्यांच्या दौडीचा उत्सव केला जातो. कर्नाटक राज्यात पूर्वीपासून या दिवशी गोपालकांना धन देण्याची प्रथा आहे.
फार पूर्वी भारतात राजांकडून जी दाने दिली जात त्यामध्ये गोदानाचा सुद्धा समावेश असे. पूर्वी भूदान दिल्यावर ज्या प्रकारे त्या दानाचा अपहार होऊ नये म्हणून गधेगळ उभारण्यात येत त्याचप्रमाणे गोधनाचा अपहार होऊ नये म्हणून जि शिल्प उभारण्यात येत त्यासं गोवत्सशिल्प या नावाने ओळखले जाई व या शिल्पांत गाय आपल्या वासरास दूध प्राशन करीत असल्याचा प्रसंग कोरला जात असे. पूर्वी गोवंश हा गोधन मानला जात असल्याने या गोधनाचा अपहार करण्यासाठी सुद्धा मोठमोठी युद्ध होत असत व या गोधनाचे रक्षण करताना ज्या वीरांस मृत्यू येत असे त्यांच्या पराक्रमाच्या साक्ष देणाऱ्या वीरगळी उभारण्यात येत असत व या वीरगळीत त्यांनी गोधनाचे रक्षण करताना आपले प्राण खर्चीले असे शिल्पाच्या माध्यमातून दाखवण्यात येत असे.
तर असा हा आपल्या गोधनाचा सन्मान करणारा वसुबारस हा उत्सव पोळा या सणाइतकाच महत्वाचा असून या दिवसाच्या निमित्ताने गोवंशाचे जे ऋण प्राचीन काळापासून मानवी समाजावर आहे ते फेडण्याचा प्रयत्न मनुष्य करीत असतो.