महाराष्ट्रातील एक अद्भुत व ऐतिहासिक शिवलिंग
महाराष्ट्र राज्यातली प्राचीन व मध्ययुगीन राजघराणी ही शिवोपासक होती. या राजघराण्यांच्या शिवभक्तीमुळे आज समस्त महाराष्ट्रात विपुल प्रमाणात जुनी शिवमंदिरे पाहावयास मिळतात.
प्राचीन व मध्ययुगीन महाराष्ट्राच्या शिवभक्तीची ही मंदिरे म्हणजे उत्कृष्ट स्मारके आहेत. ईश्वरभक्ती व वेदांत तत्वज्ञान यांची लाट दक्षिणेतून उत्तरेत गेली की उत्तरेतून दक्षिणेत गेली हा अभ्यासाचा विषय आहे मात्र विष्णू, कुबेर, ब्रह्मा, इंद्र, रावण ईत्यादी शिवभक्तांची यादी पहिली असता प्राचीन काळापासून शिवभक्ती संपूर्ण भारतात व्यापून राहिली आहे असा निष्कर्ष काढता येतो.
शिव या दैवताची उपासना लिंग स्वरूपातच केली जाते आणि शिवाची मूर्ती कुठल्याही शिवमंदिरात सहसा नसते यामागील शास्त्र हा एक वेगळा व मोठा विषय आहे मात्र आपल्या महाराष्ट्रात अशी काही ठिकाणे आहेत जेथे अद्भुत आकाराची शिवलिंगे पाहावयास मिळतात. असेच एक गाव म्हणजे रायगड जिल्ह्यातील गांगोली (गांगवली) हे गाव.
गांगोली हे गाव रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात आहे. माणगावपासून हे गाव आठ किलोमीटर अंतरावर आहे. माणगाव-महाड या रस्त्यावरील ढालघर गावावरून गांगोली गावाला जाण्यासाठी फाटा फुटतो.
या गांगोली गावाचे आणखी एक महत्त्व म्हणजे, येथे शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांचा जन्म झाला आहे.
याच गांगोली गावात एक अतिशय अद्भुत शिवलिंग आहे. गावातील एक अतिशय जुने मंदिर म्हणजे वैजनाथाचे मंदिर. या शिवमंदिराच्या बाह्य स्वरूपाचा जीर्णोद्धार झाला असला तरी अंतरंगात आजही हे मंदिर आपले मूळ रूप टिकवून आहे.
सहसा शिवमंदिरात आपण जेव्हा सभागृहातून गर्भगृहात प्रवेश करतो त्यावेळी गर्भगृहाच्या दरवाज्याच्या दोहो बाजूस गणेश व काळभैरव अशा दोन मूर्ती असतात. मात्र वैजनाथ हे असे मंदिर आहे जेथे एका कोनाड्यात दुर्मिळ असे गणेशलिंग आहे व दुसऱ्या कोनाड्यात नागप्रतिमा आहे.
अर्थात ही दोनही रूपे गणेश व काळभैरवाची आहेत हे स्पष्ट आहे मात्र रचनाकाराने मूळ रूपांतून वेगळी रूपे दाखवून मूर्तींचे वेगळेपण जपले आहे.
गणपती व कालभैरवाच्या या अनोख्या मूर्ती पाहून आपण मुख्य गर्भगृहात उतरतो तेव्हा आपल्या नजरेस एक अतिशय सुरेख व रेखीव असे वैजनाथाचे लिंग दृष्टीस पडते.
अतिशय भव्य असे हे लिंग असून योनिपिठाच्या वर पितळी नाग असून मध्ये शिवलिंग आहे आणि वर तांब्याचे अभिषेकपात्र आहे. आजूबाजूस नजर टाकली असता मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी गर्भगृहाची रचना जुन्या पद्धतीमध्ये जतन करण्यात आली असून आतील भिंतींवर व खांबांवर विविध नक्षीकाम केलेले दिसून येते.
हे झाले मंदिराचे दर्शन मात्र आधी म्हटल्याप्रमाणे अद्भुत शिवलिंग म्हणजे काय असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहील मात्र याचे उत्तर मंदिरात न मिळता मंदिराच्या बाहेर असलेल्या दाट वृक्षांनी व्याप्त अशा परिसरात मिळेल.
वैजनाथ मंदिरातील सध्याचे शिवलिंग हे शिवकाळातच जीर्णोद्धार करण्यात आलेले लिंग असून मुख्य लिंग मंदिराच्या बाहेर आहे आणि हे जे मुख्य लिंग आहे तेच अतिशय अद्भुत असे आहे.
मुख्य लिंगाऐवजी नवे शिवलिंग मंदिरात बसवण्याचे कारण काय तर मुख्य लिंगाचे झालेले नुकसान होय आणि याचा सुद्धा एक इतिहास आहे मात्र तो कुठल्याही कागदपत्रांत नसून मंदिर परिसरात असलेल्या वीरगळींमध्ये आहे.
वैजनाथ मंदिर परिसरात असंख्य वीरगळी असून जुन्या काळी परिसरात झालेल्या युद्धांची ती स्मारके आहेत. गांगोली हे गाव शिवकाळात व शंभूकाळात अत्यंत महत्वाचे ठिकाण होते.
याचे मुख्य कारण म्हणजे हे गाव रायगड किल्ल्याच्या आसमंतातले एक महत्वाचे गाव असून या गावातून रायगड किल्ल्यास जाणारा जुना रस्ता आहे. या परिसरातून राजधानी रायगडाचे जे दर्शन होते ते डोळ्यांचे पारणे फेडणारे असते.
महाराणी येसूबाई जेव्हा गर्भवती होत्या तेव्हा संभाजी महाराजांनी त्यांना रायगड किल्ल्यावर न ठेवता गांगोली येथे ठेवले होते व बाळंतपणासाठी त्यांच्यासाठी याच वैजनाथ मंदिराच्या शेजारी एक इमारत तयार करवून घेतली होती.
येसूबाईंचा बाळंत काळ येथेच गेला याशिवाय छत्रपती शाहू महाराजांचा जन्म सुद्धा याच गांगोली गावामध्ये सन १६८२ मध्ये झाला.
मात्र १६८५ साली एक घटना या परिसरात घडली जिचा उल्लेख इतिहासामध्ये फारसा केला जात नाही. १६८५ साली मुघल सरदार शहाबादी खान पुण्याहून बोरघाट उतरून आपल्या सैन्यसह थेट गंगोलीस आला यावेळी रायगडाहून कवी कलश खासे गांगोलीस गेले यावेळी घनघोर युद्ध झाले आणि या युद्धात कवी कलशांनी मावळ्यांच्या साथीने शर्थ करून शाबादी खानास परत पुण्यास पिटाळून लावले या प्रसंगाचा उल्लेख पुढीलप्रमाणे येतो.
शाबदीखान पुण्याहून दौड करून बोरघाटाने उतरून गांगोलीस आला. तेथे कवी कलशाने जाऊन भांडण दिले. फिरोन घाटावरी घातला.
मात्र ज्यावेळी शाबदीखान याने गांगोलीस हल्ला केला त्यावेळी मोगल सैन्याने येथे प्रचंड नुकसान केले व या नुकसानामध्ये वैजनाथ मंदिराचाही समावेश होता. शत्रूंनी मूळ मूर्ती भग्न करून टाकली व मंदिरासही नुकसान केले. मूळ मूर्तीच्या रक्षणासाठी अनेक मावळे झुंजले त्यांची स्मारके वैजनाथ मंदिराच्या आसमंतात आहेत.
यामधील एक वीरगळ अशी आहे ज्यामध्ये दोन सैनिक दोन बाजूनी शिवलिंग पकडून आहेत व यापैकी एक सैन्य संभाजी महाराजांच्या सैन्यातील असून दुसरा मोगल आहे. स्वराज्यातील सैनिक शिवलिंगाचे मोगल सैनिकांपासून रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहे हे तत्कालीन दृश्य या वीरगळीवर पाहिल्यावर डोळ्यासमोर शंभूकाळात झालेला तो संग्राम जसाच्या तसा उभा राहतो.
मावळ्यांनी ज्या लिंगाचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला होता तेच हे अद्भुत असे लिंग जे तूर्तास भग्न झाल्याने मंदिराबाहेर ठेवण्यात आले आहे. या लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे योनिपिठावरील लिंगाच्या भोवती असलेल्या जागेत अकरा मानवी चेहरे वर्तुळाकृती काढले आहेत.
या मधील तीन चार चेहरे स्पष्ट दिसून येतात आणि एक चेहरा इतका स्पष्ट आहे की त्यावरील डोळे, नाक, मुख व कान अजूनही शाबूत आहेत. खरोखर या लिंगाच्या निर्मात्याच्या कलेस प्रणाम करायला हवा की त्याने शिवलिंगाचे एक अद्भुत रूप निर्माण केले.
गांगोली गाव पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे अनेक गोष्टींसाठी आहे कारण येथे येसूबाईंचे बाळंतपण झाले होते, शाहू महाराजांचा जन्म झाला होता, संभाजी महाराजांच्या काळातील दुर्धर संग्रामही येथेच झाला होता.
याशिवाय वैजनाथ शिवमंदिर, नदीचा घाट, अद्भुत शिवलिंग, दुर्मिळ गणेशलिंग व नागमूर्ती, विपुल वीरगळी व समाध्या असलेले रायगड किल्ल्याच्या आसमंतातील हे सुंदर गाव प्रत्येक इतिहास व पर्यटनप्रेमी व्यक्तीने पाहावयासच हवे.