करकरणी माता - कडेकपारीतले दैवत

आई करकरणी देवीचे हे स्थान सुद्धा पेण तालुक्यातच येते. रस्त्यावरून डाव्या बाजूस गाडी वळवून थोडे पुढे गेल्यास एक मोठी कमान दृष्टीस पडते ज्यावर आई करकरणी माता प्रवेशद्वार, ग्रामपंचायत झोतिरपाडा, ता. पेण असे लिहिलेले दिसून येते.

करकरणी माता - कडेकपारीतले दैवत
करकरणी माता

रायगड जिल्ह्याच्या रोहे तालुक्यातील नागोठणे हे तालुक्याच्या उत्तरेकडील गावं. नागोठण्याच्या उत्तरेस रोहे तालुक्याची हद्द संपते आणि पेण तालुक्याची हद्द सुरु होते. नागोठण्याच्या पश्चिम दिशेस अंबा नदी वाहते ती पुढे धरमतर येथे अरबी समुद्रास मिळते. अंबा नदीच्या दोनही बाजूना एक वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक प्रदेशाची निर्मिती झाली आहे ज्यास खारेपाट असे म्हटले जाते.

खारेपाट या नावाचा उल्लेख निजामशाही काळापासून मिळतो कारण पूर्वी हा परिसर एक वेगळा तर्फ अथवा महाल होता. खारेपाट तर्फाचे मुख्यालय नागोठणे येथे होते. पुढे नागोठणे उर्फ खारेपाट हे तर्फ खालसा करण्यात आले व या तर्फातील गावे अनुक्रमे रोहे, पेण व अलिबाग तालुक्यात समाविष्ट करण्यात आली. 

नागोठणे परिसरात केंद्र सरकारचा आय.पी.सी.एल. हा प्रकल्प आला आणि या परिसरास औद्योगिक महत्व प्राप्त झाले. त्यानिमित्ताने नागोठणे ते अलिबाग हा रस्ता सुसज्ज झाला व परिसरातील गावांचा दळणवळणाचा मार्ग सुद्धा मोकळा झाला. नागोठणे ते अलिबाग या रस्त्याच्या उजव्या बाजूस अंबा नदी वाहते आणि डाव्या बाजूस सागरगड डोंगररांगेच्या शाखा आपली साथ देत असतात.

नागोठण्याहून अलिबागच्या दिशेने निघालो की तीन किलोमीटर वर आय.पी.सी.एल. व सध्याचे रिलायन्स पेट्रोकेमिकल यांचा मुख्य दरवाजा दिसून येतो. येथून पुढे जात राहिलो की या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधलेली आद्ययावत अशी टाऊनशिप दृष्टीस पडते. याच टाऊनशिपच्या मुख्य दरवाज्या समोर उभे राहून डावीकडे डोंगरात नजर टाकली असता उंचावर एक देवस्थान दृष्टीस पडते.

हे देवस्थान म्हणजे आई करकरणी देवीचे स्वयंभू स्थान. आय.पी.सी.एल. ही कंपनी रोहे तालुक्यात येत असली तरी टाऊनशिप पेण तालुक्यात आहे. अर्थात आई करकरणी देवीचे हे स्थान सुद्धा पेण तालुक्यातच येते. रस्त्यावरून डाव्या बाजूस गाडी वळवून थोडे पुढे गेल्यास एक मोठी कमान दृष्टीस पडते ज्यावर आई करकरणी माता प्रवेशद्वार, ग्रामपंचायत झोतिरपाडा, ता. पेण असे लिहिलेले दिसून येते.

या कमानीच्या मागून डोंगरात जाणारा पक्क्या पायऱ्यांचा मार्ग दिसून येतो व हा मार्गच आपल्याला देवीच्या मंदिराकडे घेऊन जातो. पूर्वी देवळाकडे जाण्यासाठी फक्त एक पाऊलवाट होती मात्र आता पक्क्या पायऱ्या बांधल्याने वर जाण्याचा मार्ग सोपा झाला आहे. मंदिराच्या चोहो बाजूस सदाहरित वृक्षांची दाटी असल्याने या पायऱ्या चढताना फारसा थकवा लागत नाही. करकरणी देवीचे हे स्थान समुद्रसपाटीपासून १०० मीटर उंचीवर आहे मात्र ज्या डोंगरावर हे स्थान आहे त्याची उंची ३०० मीटर आहे. 

अदमासे २० मिनिटांची चढाई करून आपण मंदिराच्या ठिकाणी पोहोचतो आणि मंदिराची रचना पाहून आश्चर्यचकित होतो. मुळात हे मंदिर कातळकड्यात निर्माण झालेल्या नैसर्गिक गुहांमध्ये आहे मात्र आता या गुहांच्या अलीकडे प्रशस्त असे मंदिर बांधण्यात आले आहे. पूर्वी कातळात कोरलेल्या पायऱ्या चढून देवीचे दर्शन घ्यावे लागत असे जे अतिशय जिकिरीचे होते. आजूबाजूस नजर टाकल्यास अजूनही खडकांत कोरलेल्या जुन्या पायऱ्या दिसून येतात. 

देवीचे स्थान जेथे आहे तिथे कातळकडा खूप मोठा आहे व अनेक छोटया छोट्या गुहा सुद्धा आहेत त्यामुळे सरपटणारे प्राणी या परिसरात विपुल आहेत. अनेकदा येथे सर्पांचे अथवा त्यांनी सोडलेल्या त्वचेचे दर्शन होत असते मात्र रस्त्यात ते केव्हाही येत नाहीत.

नव्या मंदिराचा गाभारा बऱ्यापैकी मोठा असल्याने भाविक देवीचे दर्शन घेऊन नवस करू अथवा फेडू शकतात व चार घटका देवीचे स्मरण करत तेथे बसूही शकतात. मंदिराच्या स्थानावरून पूर्वेकडे नजर टाकल्यास खूप मोठा नजारा दृष्टीस पडतो. प्रचंड विस्तारलेली महलमिरा डोंगररांग, मुंबई गोवा महामार्ग, अंबा नदीचे खोरे, आय.पी.सी.एल. व टाऊनशिप आणि आसमंतातील गावे आपल्याला दिसून येतात. वनभोजनाचा आस्वाद घेण्यासाठी सुद्धा हे स्थळ अतिशय लोकप्रिय आहे.