आबाजी विश्वनाथ प्रभू - स्वराज्याचे निष्ठावान सरदार
रोहिडा किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी मोहीम काढल्याची बातमी गेली त्यावेळी किल्ल्यावरील बंदोबस्ताचे लोक जागे होऊन तेथे उभय सैन्यात हातघाईची लढाई झाली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीचे कार्य सुरु केले त्यावेळी त्यांना साथ देणाऱ्या मावळ्यांपैकी एक म्हणजे आबाजी विश्वनाथ प्रभू. आबाजींचा जन्म १६३१ सालचा असून ते मूळचे मुठे खोऱ्यातील देशपांडे होते.
आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी मोसे खोऱ्याचे देशमुख बाजी पासलकर यांच्यासहित केली. बाजी पासलकर यांनी शिवाजी महाराजांना स्वराज्य कार्यात साथ दिली त्यावेळी आबाजी विश्वनाथ सुद्धा या कार्यात सामील झाले.
आबाजी विश्वनाथ यांची कर्तबगारी पाहून शिवरायांनी १९४९ साली त्यांची सरदारपदी नेमणूक केली. जावळीच्या मोहिमेत एका प्रसंगी मोऱ्यांची मोठी फौज मावळ्यांवर चालून आली व या फौजेच्या तुलनेत शिवरायांचे सैन्य संख्येने कमी होते व त्यावेळी आबाजींनी मावळ्यांचे नेतृत्व करून मोऱ्यांच्या सैन्याचा प्रतिकार करून त्यांचा पराभव केला.
रोहिडा उर्फ विचित्रगड हा किल्ला घेण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी आबाजी विश्वनाथ यांना तेथे जाऊन किल्ल्याची माहिती काढण्याचे कार्य दिले होते यावेळी ते फकिराचा वेष घेऊन किल्ल्याची इत्यंभूत माहिती घेण्यासाठी विचित्रगडावर रवाना झाले. यावेळी रोहिडा किल्ला ज्या भागात आहे त्या हिरडस मावळचे देशमुख आणि बाजी प्रभू देशपांडे हे या किल्ल्यावर बंदोबस्तास होते.
आबाजी विश्वनाथ यांनी गुप्तपणे किल्ल्याची सर्व माहिती मिळवून शिवरायांना सांगितली व एका अंधाऱ्या रात्री शिवाजी महाराज स्वतः मावळ्यांना घेऊन रोहिडा किल्ल्याकडे रवाना झाले आणि किल्ल्याच्या तटास शिडी लावून वर चढले, यावेळी त्यांचे सोबत असलेल्या मावळ्यांमध्ये आबाजी प्रभू सुद्धा होते.
रोहिडा किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी मोहीम काढल्याची बातमी गेली त्यावेळी किल्ल्यावरील बंदोबस्ताचे लोक जागे होऊन तेथे उभय सैन्यात हातघाईची लढाई झाली. दाट अंधारी रात्र असल्याने कोण कोणाच्या सैन्यात आहे हे सुद्धा यावेळी समजणे कठीण झाले त्यावेळी आपापले सैन्य ओळखता यावे यासाठी आबाजी विश्वनाथ यांनी गवताची गंजी पेटवली ज्यामुळे त्या उजेडात शत्रूस ओळखता येणे शक्य झाले.
रोहिडा किल्ल्यावर झालेल्या या लढाईत अनेक जण जखमी झाले. स्वतः आबाजी विश्वनाथ घायाळ होऊनही लढत होते. बाजी प्रभू प्रतिकार देशपांडे करत होते मात्र यावेळी आबाजी प्रभू यांनी बाजीप्रभूंना थांबवले आणि म्हणाले की 'आपण सर्व एक असून एकमेकांविरोधात का लढत आहोत? एकमेकांसोबत लढत बसून निरर्थक मारून जाण्यात काहीच अर्थ नाही' असे समजुतीचे बोल सांगून त्यांनी बाजी प्रभूंना व बांदल सेनेस शिवरायांकडे वळवले. शिवाजी महाराजांनीही बाजीप्रभूंचा पराक्रम पाहून त्यांना आपल्याकडे घेऊन सरदार पद दिले आणि बांदल देशमुखांना स्वराज्य कार्यात सामील करून घेतले.
पुढे घोडखिंडीच्या युद्धप्रसंगी बाजीप्रभू व बांदल देशमुखांचे पुत्र रायाजी बांदल व कोयाजी बांदल यांनी आपल्या सेनेसह जो पराक्रम गाजवला तो सर्वज्ञात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाल्यावर छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळातही आबाजी विश्वनाथ प्रभू स्वराज्यासाठी कार्य करीत होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी सेनापती खंडेराव गोमाजी पानसंबळ यांच्या नेतृत्वाखाली मोगलांविरोधात मोठा लढा दिला.
राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत सुद्धा आबाजींनी खूप चांगले कार्य केल्याने राजाराम महाराजांनी त्यांना काही गावे इनाम म्हणून दिली होती. मोगलांच्या हाती गेलेला दाभोळ प्रांत परत स्वराज्यात आणण्यासाठी राजाराम महाराजांनी शंकराजी नारायण यांना व आबाजी विश्वनाथ यांना दाभोळास पाठवले यावेळी आबाजी यांचा पराक्रम पाहून शंकराजी यांनी सुद्धा त्यांचे खूप कौतुक केले.
१६९४ साली मोगलांनी तोरणा किल्ल्यास वेढा घातला होता त्यावेळी आबाजींनी मोगल सैन्याचा शौर्याने प्रतिकार केला व किल्ल्याचे रक्षण केले मात्र तोरण्याची मोहीम जिंकून परत येत असताना वाटेत मोगलांसोबत झालेल्या लढाईत त्यांचा मृत्यू झाला व स्वराज्य एका पुरातन व एकनिष्ठ अशा सरदारास मुकले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६३ वर्षांचे होते. आबाजी विश्वनाथ प्रभू यांच्यानंतर त्यांचे पुत्र जनाजी यांच्याकडे आबाजी यांचे वतन चालू होते.