मस्तानीचा इतिहास

बाजीरावांच्या मदतीने व पराक्रमाने खुश होऊन छत्रसालाने त्यांचा आपल्या राजधानीत मोठा सत्कार केला व आपली कन्या मस्तानी त्यांस अर्पण केली. याचवेळी छत्रसालने बाजीरावास मानसपुत्र मानून बुंदेलखंडाचा काही भागही दिला होता.

मस्तानीचा इतिहास

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

मराठा साम्राज्याचे पेशवे बाजीराव बल्लाळ उर्फ थोरले बाजीराव पेशवे यांच्या चरित्रातील एक महत्वाची व्यक्ती म्हणजे मस्तानी. इतिहासात ज्या प्रेमकथा अमर झाल्या आहेत त्यामध्ये बाजीराव व मस्तानीची प्रेमकथा एक आहे.

खरं तर मस्तानीच्या इतिहासाविषयी अनेक वेगवेगळे मतप्रवाह असल्याने मस्तानी व बाजीराव यांची पहिली भेट कशी व केव्हा झाली यावर आजही अनेकांचे मतभेद आहेत. पेशवे बखरीत मस्तानीबद्दल अशी कथा आहे की निजामावर जेव्हा सुजायतखान नामक सरदार दिल्लीहून चाल करून आला त्यावेळी निजामाने चिमाजी अप्पांची मदत मागितली. निजामाशी तहाच्या अटी ठरवून चिमाजी अप्पाने सुजायतखानावर हल्ला करून त्यास ठार मारले. या सुजायतखानाची मस्तानी ही रक्षा होती व सुजायतखानाच्या मृत्यूने दुःखी होऊन ती प्राणत्याग करू लागली तेव्हा चिमाजी अप्पानी तिला रोखले व तीस सन्मानाने पुण्यास आणून आपले मोठे बंधू बाजीराव यांना नजर केले.

मस्तानीबद्दल दुसरी हकीकत अशी आहे की मस्तानी ही मूळची हिंदू असून निजामाच्या राज्यात राहणारी होती. पुढे तिचे धर्मांतर करण्यात आले व अपार सौंदर्यवान असल्याने निजामाच्या जनानखान्यात तिचा प्रवेश झाला. बाजीराव पेशवे व निजाम यांच्यात मुंगी पैठणचा तह झाला त्यावेळी निजामाने बाजीरावांना मस्तानी भेट केली.

मस्तानीबद्दल जी तिसरी हकीकत आहे त्यावर अनेकांचे एकमत आहे, ती हकीकत म्हणजे मस्तानी ही बुंदेलखंडाचा छत्रसाल राजा याची अनौरस संतती होती. छत्रसालाची रक्षा ही इराणी असल्याने मस्तानीचा धर्म सुद्धा मुस्लिम होता. अनौरस असली तरी छत्रसालाची कन्या असल्याने तिला दरबारात चांगला दर्जा होता व छत्रसालाची सुद्धा ती लाडकी कन्या होती. छत्रसालाने मस्तानीस लहानपणापासून संगीत व नृत्य आदी कलांचे शिक्षण दिले होते.

मस्तानी ही तिच्या नावाप्रमाणेच अत्यंत रूपवान असून तिच्या सौंदर्याबद्दल व गोरेपणाबद्दल अशाही आख्यायिका आहेत की ती ज्यावेळी विडा खात असे त्यावेळी तिच्या गळ्यातून तांबुलाचा लाल रंग खाली उतरताना दिसत असे.

छत्रसाल त्याच्या वृद्धपकाळात एका संकटात अडकला होता व ते संकट होते उत्तरप्रदेशमधील फारुकाबादचा नवाब मुहंमदशाह बंगशचे बुंदेलखंडावर आक्रमण. यावेळी वयोवृद्ध छत्रसालाने बाजीरावांची मदत मागितली व बाजीरावांनी या युद्धात छत्रसालाची मदत करून बुंदेशला पराभूत केले व बुंदेलखंड वाचवले. बाजीरावांच्या मदतीने व पराक्रमाने खुश होऊन छत्रसालाने त्यांचा आपल्या राजधानीत मोठा सत्कार केला व आपली कन्या मस्तानी त्यांस अर्पण केली. याचवेळी छत्रसालने बाजीरावास मानसपुत्र मानून बुंदेलखंडाचा काही भागही दिला होता. मस्तानीच्या इतिहासाविषयी ही माहिती ग्राह्य धरली तर १७२९ सालानंतर मस्तानी व बाजीराव यांची भेट झाली असावी व यावेळी तिचे वय पंधरा सोळा वर्षे असावे. 

बाजीराव मस्तानीस घेऊन जेव्हा पुण्यास आले त्यावेळी साहजिकच मस्तानीच्या मुस्लिम धर्मीय असल्याने दोघांना कौटुंबिक व सामाजिक विरोधास तोंड द्यावे लागले. असे असूनही मस्तानीस बाजीरावांच्या कुटुंबातील बाजीरावांनंतर सर्वात जवळची व्यक्ती होती ती म्हणजे बाजीरावांची पत्नी काशीबाई. काशीबाई या मस्तानीस सांभाळून घेत असत व याचा संदर्भ १७३७ सालच्या एका पत्रात पुढीलप्रमाणे आहे. 

"सौभाग्यवती काशीबाई व मस्तानी यांकडे न्यूनता होत नाही. दिवसेंदिवस अधिकताच आहे."

बाजीरावांनी मस्तानीस राहण्यासाठी शनिवारवाड्यात स्वतंत्र इमारत बांधली व त्यास मस्तानी महाल असे नाव दिले. या महालात जाणारा दरवाजा हा पुढे मस्तानी दरवाजा या नावानेच ओळखला गेला. याशिवाय बाजीरावांनी मस्तानीस पाबळ व केंदूर ही गावे इनाम करून दिली होती. धार्मिक रूढींमुळे मस्तानी व बाजीरावांचा विवाह होऊ शकला नसला तरी बाजीरावांनी मस्तानीस कायम पत्नीचाच दर्जा दिला.

कौटुंबिक आयुष्यात मस्तानीस व बाजीरावांना त्यांची आई राधाबाई व बंधू चिमाजी अप्पा यांचा थोडासा विरोध सहन करावा लागला मात्र हा विरोध व्यक्तिगत नसून मस्तानीमुळे बाजीरावांनी राज्यकारभाराकडे दुर्लक्ष करू नये यासाठी होता. बाजीराव पेशव्यांचे थोरले चिरंजीव नानासाहेब हे सुद्धा मस्तानीच्या थोडे विरोधात होते.

बाजीरावांकडून मस्तानीस १७३४ साली पुत्र झाला ज्याचे नाव कृष्णसिंह असे ठेवण्यात आले. हे नामकरण राधाबाई यांनी काशीबाई यांच्या मार्फत सुचवले होते. कृष्णसिंहास समशेर बहादूर हे नाव सुद्धा होते व तेच पुढे प्रचलित झाले. 

पुढील काळात बाजीरावांच्या मनात मस्तानी व समशेर बहाद्दूर बद्दल वाढते महत्व पाहून राधाबाई, चिमाजीअप्पा चिंताग्रस्त झाले कारण जर भविष्यात समशेर बहाद्दराने संपत्तीत वाटा मागितला तर मुलखाचे विभाजन होणे अटळ होते म्हणून बाजीराव व मस्तानी या दोघांमधील संपर्क तोडण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न सुरु झाले. १७३९ साली मस्तानीस राहत्या वाड्यात कैद केले गेले मात्र काही महिने कैदेत काढल्यानंतर मस्तानीने अटकेतून सुटका करवून घेतली व बाजीरावांकडे पळून गेली.

१७४० च्या जानेवारी महिन्यात मस्तानीस पुन्हा एकदा कैद करून पर्वतीस अटकेत ठेवले गेले. या कैदेत मस्तानी तीन महिने होती. पुढे नासिरजंग विरोधातील मोहीम आटपून बाजीराव रावरखेड येथे पोहोचले त्यावेळी पुण्याहून काशीबाई व जनार्दन यांना तेथे पाठवण्यात आले. पुढील दोन दिवसातच बाजीरावांचे वाताच्या झटक्याने रावरखेडीस निधन झाले. 

बाजीरावांच्या निधनाची बातमी पुण्यास पोहोचताच कैदेत असलेली मस्तानी दुःखाच्या सागरात बुडाली व या धक्क्याने १७४० सालीच तिचा मृत्यू झाला. अशा रीतीने इतिहासातील एका प्रेमकथेचा करुणामय अंत झाला. मस्तानीची समाधी तिच्या इनाम गावी म्हणजे पाबळ येथे आजही पाहावयास मिळते. मस्तानीपुत्र समशेर बहादूर यांस उत्तर प्रदेशातील बांदा ही जहागीर प्राप्त होती पुढे हा वंश बांद्याचे नवाब या नावाने ओळखला गेला.